कॉमनमॅनचा साधा प्रश्न!

        पूर्वीच्या काळी एक म्हण प्रचलित होती, ‘पावसाने झोडपले, राजाने मारले तर दाद मागणार कोणाकडे?‘ त्यावेळी फक्त हाच प्रश्न होता. आज प्रश्नांची मालिका तयार झाली असून परिस्थिती मात्र तशीच आहे. पूर्वीच्या राजाच्या जागी आता लोकशाहीतील सरकार आले आहे इतकेच.

    आज समाज जीवन अस्वस्थ आहे. एकीकडे कोरोनाचा आजार ६ महिन्यांपासून हैदोस घालतो आहे. जगभरात लाखो लोकांचा बळी गेला. हे थैमान सुरुच आहे. याचा परिणाम लॉकडाऊन, सर्व व्यवहार बंद, बाजारपेठा बंद, कंपन्या बंद, रोजगार गेला. नोक-या गेल्या, महागाईने जनता त्रस्त. अन्याय, अत्याचार यांची मालिका सुरुच. शेतकरी आत्महत्ये पाठोपाठ बेरोजगारीमुळे तरुणांच्या आत्महत्या सुरु आहेत. एकीकडे बेटी बचाओ, बेटी पढाओअभियान दुसरीकडे स्त्रीभ्रूण हत्येपासून ते बलात्कारासारख्या घृणास्पद संतापजनक घटनामुळे देशभर आक्रोश, या जोडीला बळीराजा सुगी हंगामात म्हणजे शेतातील धान्य काढण्याच्या कामात असताना पावसाची हजेरी, शिक्षण बंद, मोबाईलवर हवे तर शिक्षण घ्या, यातून गरीब कुटुंबातील मुलेही आत्महत्येच्या वाटेवर अशी प्रश्नांची मालिका तयार झाली आहे. अशा अवस्थेत कॉमनमॅनम्हणतो जगायचे कसे? दाद मागायची कुणाकडे? याचे उत्तर आजमितीस कोणाकडेच नाही. राज्यकर्त्यांकडे तर नाहीच नाही. योजना येतात, घोषणा होतात. पॅकेजीसची कोटी-कोटी उड्डाणे सामान्य माणूस पहातो आहे, ऐकतो आहे. पण योजना आणि योजनेचा पैसा सामान्यापर्यंत पोहचत नाही. अशी सार्वत्रिक तक्रार ऐकायला मिळते.

        स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली. पण सामान्य माणसाच्या मूलभूत गरजा जागच्या जागी आहेत. अवकाशाला गवसणी घालायला आपण निघालो आहोत. तंत्रज्ञानाने प्रगती केली, जग जवळ आले. मोबाईलने जगाच्या कुठल्याही कोप-यात सेकंदात संफ-संवाद होऊ शकतो. पण याचवेळी माणूस माणसापासून दूर चाललाय. एकाच इमारतीत चार पावले जाऊन थेट संवादा ऐवजी आपण मोबाईल डबडे घेऊन विचारतो, कसे काय ठीक आहे? जेवण झाले? आज कोरोनाने तर माणसा माणसात अंतर पाडले आहे. संसर्ग येऊ द्यायचा नाही. हस्तांदोलन नाही. गळाभेटी नाही. यामधील प्रेम, जिव्हाळा या भावना पूर्ण कोरड्या विहिरीसारख्या झाल्या आहेत. जनावरे पीक खातात म्हणून त्यांच्या तोंडाला मुस्के बांधले जायचे. तोच मास्क आता आपल्या, तुमच्या तोंडावर आला आहे. किती प्रगती झाली पहा. माणसाच्या तोंडावरील मास्क पाहून मुकी बिचारी जनावरे हसत असतील. देशभरातील वातावरण पहिलेवर केंद्र शासनाने शेतीविषयक आणलेल्या तीन कायद्याच्या विरोधात देशभर आक्रोश सुरु आहे. पंजाब, हरियाणा आणि अन्य राज्यात हिंसक आंदोलन होते आहे. यातच उत्तर प्रदेशमध्ये बलात्काराच्या घटनेचे तीव्र पडसाद देशभर उमटले आहेत. पोलिसांची, प्रशासनाची मगरुरी समोर आली आहे. पिडीतेच्या कुटुंबाला घरात डांबून थेट अंत्यसंस्कार करण्यापर्यंत मजल गेली आहे. उत्तरप्रदेशात अशा दोन घटना पाठोपाठ मध्यप्रदेशातही अशीच संतापजनक घटना घडली आहे. कायदा, घटना, प्रशासन, शासन या गोष्टी आहेत की नाही असा प्रश्न निर्माण होत आहे. पीडित कुटुंबाला २५ लाख, घर, नोकरी आणि घटनेची सीबीआय चौकशी अशा घोषणा झाल्या. पण तपास यंत्रणांवर विश्वास ठेवायला कुटुंब तयार नाही. विश्वासार्हतेलाच धक्का पोहोचलाय. न्यायालयातर्फे चौकशी व्हावी, अशी मागणी आहे. तपास यंत्रणांवरील विश्वासाला धक्का ही खरी चिंतेची बाब आहे. ७० वर्षात आपण मिळवले तरी काय? असा सामान्यांचा प्रश्न आहे.

       महात्मा गांधी म्हणाले होते, राजकीय स्वातंत्र्य मिळून उपयोगी नाही. राज्याचे सुराज्यात रुपांतर होईल तो सुवर्ण दिवस तो येणार कधी? ७० वर्षानंतर हा प्रश्न विचारावा लागतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील जाती अंताचा लढा कधी यशस्वी होईल? असे प्रश्न आज ऐरणीवर आले आहेत. याचा आपण गांभीर्याने विचार करुन सामान्यांच्या जीवनात चांगले दिवस आणणार आहोत की केवळ घोषणा पुरतेच हे विषय अजून राहणार आहेत? याचे उत्तर कॉमनमॅनला हवे आहे. कॉमनमॅनच्या साध्या प्रश्नाचे उत्तर मात्र खूप अवघड आहे एवढे नक्की!

-सुभाष धुमे, ज्येष्ठ पत्रकार (०२३२७) २२६१५०

Leave a Reply

Close Menu