आज बऱ्याचदा शेतकरी म्हटलं की आकाशाकडे डोळे लावलेला, भेगाळ जमीनीकडे बघणारा , आत्महत्या करणारा असे निराशावादी चित्र डोळ्यासमोर येते. परंतु प्रत्यक्षात शेती हा खूप व्यापक व्यवसाय आहे. निसर्गाची साथ, कुशल नियोजन आणि  कष्टाची जोड असेल तर शेती नक्कीच फायद्याची आहे .रत्नागिरी जिल्हयातील रीळ  मधील सुवर्णा आणि मिलिंद वैद्य यांनी जाणीवपूर्वक शेतात केलेले यशस्वी प्रयोग प्रेरणादायी आहेत.

          नमस्कार मी सुवर्णा मिलिंद वैद्य (रा.रीळ रत्नागिरी) पूर्वाश्रमीची सुवर्णा विश्वास गोड बोले( रा. जंगली महाराज रोड पुणे )लौकीक अर्थाने पुणे ते रीळ हा साडेतीनशे किलोमीटर चा वळणावळणांचा आणि चढ-उतारांचा प्रवास हा माझ्यासाठी मोठा जीवन परिवर्तनाचा प्रवास होता पुण्यातल्या टिपिकल मध्यमवर्गीय सुखवस्तू कुटुंबात माझा जन्म झाला लहानपणापासून मला अभ्यासाची आवड असल्याने पुस्तकातला किडा असे सर्वजण चिडवायचे शाळेतला पहिला नंबर कॉलेजमध्येही कायम राहिला दहावीच्या परीक्षेत बोर्डात येण्याचं माझं स्वप्न थोडक्यात चुकले ते मी बारावीला बोर्डात सातवी येऊन पूर्ण केलं आणि माझ्या गुरूंमुळे राज्यशास्त्र या विषयात महाराष्ट्रात प्रथम येण्याचा बहुमान  मला मिळाला  तत्वज्ञान विषयात पीएचडी करण्याची इच्छा होती पण त्याच सुमारास माननीय डॉक्टर अविनाश धर्माधिकारी यांच्या विचारांच्या प्रभावाखाली येऊन मी प्रशासकीय सेवेसाठी अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा अभ्यास सुरू केला सुदैवाने पहिला प्रयत्नात मी एमपीएससीची पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झाले आणि मेंन्स ची तयारी करत असतानाच नेहमीप्रमाणे माझ्या आयुष्यात अचानक वेगळेच वळण आले

           आम्ही मे महिन्याच्या सुट्टीत फिरायला म्हणून माझ्या मैत्रिणीकडे सुमेधाकडे कोकणातल्या गणपती पुण्याजवळच्या रीळ या गावी आलो तेथील निसर्गसंपन्न वातावरण मला खूप आवडले समुद्रकिनारी माडपोफळीच्या आणि हिरव्यागर्द झाडीच्या कुशीतले इवलेसे रीळ गाव आणि तिथली  कष्टाळू माणसं त्यांची साधी राहणी मला खूपच आवडली तिथल्या मुक्कामात  सुमेधाने त्याच गावातील  मिलिंद वैद्य यांच्याशी आमचा परिचय करून दिला ज्यांनी अत्यंत गरीब  परिस्थितीतून जिद्दीने आणि चिकाटीने  आपले पदव्युत्तरशिक्षण पूर्ण केले घरात वैद्य परंपरेचा वारसा असल्याने त्यांनाही डॉक्टर बनण्याची खूप इच्छा होती परंतु परिस्थिती अभावी कमवा आणि शिकवा हे तत्त्व खऱ्या अर्थाने जगून त्यांनी आपले एम ए चे शिक्षण पूर्ण केले आणि नॅचरोपॅथी चा डिप्लोमा केला हा त्यांचा सर्व जीवन प्रवास आम्हा पुणेकरांना फारच आदर्शवत होता.

         रिक्षा किंवा बसशिवाय कधीही न फिरलेले आम्ही एक मुलगा शिक्षणासाठी कोणतीही मूलभूत सुविधा नसलेल्या दुर्गम खेडेगावात राहून रोज दहा किलोमीटरवरील मालगुंड गावा पर्यंत चालत जातो आणि चालतपरत येऊन आपले घर, शेती उत्तम सांभाळतो हे सर्व आमच्या कल्पनेच्या पलीकडचे होते  खरं म्हणायचं तर डोळ्यात अंजन घालणारे होते कमी गरजा आणि साधन सुविधा नसूनही ही माणसं सुखी कशी हा प्रश्न मनात ठेवून आम्ही पुण्याला आलो आणि लगेच काही दिवसात हे वैद्यांचे स्थळ आम्हाला सुचवले गेले ‘मी  आणि कोकणात अशक्य ‘या मताशी  ठाम असल्याने तात्काळ नकार दिला पण लग्नाच्या गाठी यावरती जुळलेल्या असतात या उक्तीप्रमाणे एकदा भेटून तरी बघ या घरच्यांच्या  आग्रहामुळे मी मिलींदची चाळीस प्रश्नांची प्रदीर्घ मुलाखत घेतली होती हे आज आठवले की हसू येते त्यात मला त्यांचा कष्टाळू, जिद्दी स्वभाव आणि जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन खूप भावला आपल्या भावी जोडीदारामधेजे गुण मला हवे होते ते मला त्यांच्या मधे  दिसले.

        थोड्याशा असुविधेने तळमळणारे आम्ही शहरी लोक आणि  दुर्गम अशा खेडेगावात कोणतीही मूलभूत सुविधा नसतानाही स्वतःची रडकथा न सांगता अत्यंत आशावादी पद्धतीने जीवनमान बदलण्यासाठी धडपडणारी मिलिंद सारखी माणसं हे विरोधाभासी चित्र मनाला चटका लावून गेले त्यानंतर बरेच विचार मंथन, चर्चा,आदरणीय स्वामीजींचे मार्गदर्शन यानंतर खूप विचार करून मी लग्नाला होकार दिला पण माझा हा माझा होकार आमच्या पुण्यातल्या बऱ्याच नातेवाईकांसाठी मानसिक धक्का होता अगदी माझ्याआत्यानेही त्यामुळे आमच्याशी अबोला धरला होता अशा अनेक गमतीजमती घडत आमचे लग्न पार पडले

       लग्नानंतरचे पहिले काही महिने तर माझ्यासाठी परीक्षेचा काळ होता घरापर्यंत जायला रस्ता नाही गुडघाभर पाण्यातून नदीओलांडायची नाही तर साकवावरून जीव मुठीत धरून जाण्याशिवाय पर्याय नव्हता.धो धो पावसाळा ,अवती भोवती फिरणारे असंख्य जीवजिवाणू ,जंगली श्वापदे ,काळोख ,क्वचित असणारे लाईट यामुळे मी अक्षरशः अनेकदा रडवेली  व्हायचे त्यावेळी जर मला मिलिंदनी भक्कम साथ दिली नसतीआणि माझी तिथली भिती घालवली  नसती तर मी पुण्यालाच पळाले असते नंतर हळूहळू मला या सर्वांतली मजा अनुभवायला येऊ लागली शेती फक्त सिझनल व्यवसाय नाही तर यात किती वैविध्य, नवनवीन आव्हाने आणि नवे प्रयोग यांना वाव आहे हे मला कळायला लागले आणि मी या अनोळखी दुनियेत कधी सरावले ते माझे मलाच कळले नाही अगदी चूल पेटवणे, सारवण करणे, दूध काढणे यापासून आंबा सोरटींग पर्यंत असंख्य कामांची यादी, त्यातले वैविध्य व त्यातली वेगवेगळी कौशल्ये यामुळे कामाचा कधी कंटाळा आला नाही उलट कामात मजा वाटायला लागली

        आमची तोट्यातील शेती फायद्यात आणण्यासाठी काही वेगळा प्रयोग करायला हवा अशी आमची दोघांची इच्छा होती त्यासाठी आम्ही आमच्या शेतीत वेगवेगळे प्रयोग करायचे ठरवले पारंपारिक शेतीमधे मिलिंदनी हळूहळू बदल करायला सुरवात केली होतीच ट्रॅक्टर घेतला, गांडूळ खत प्लान्ट सुरू केला ,गोबर गॅस आणि त्यातील स्लरीचा शेतीसाठी वापर, जैविक शेतीसाठी कंपोस्ट खड्डा ,जमिनीची प्रत सुधारण्यासाठी जीवामृताचा वापर, नवनवीन बियाण्यांचा वापर, विविध प्रकारच्या लावणी च्या पद्धती जसे श्री पद्धत, जपानी पद्धत ,एक काडी ,एस आर टी अशा अनेक पद्धतींचा प्रयोग केला त्यामुळे अभ्यासपूर्ण शेती करता आली त्यातून आमचे भाताचे उत्पादन  तिप्पटीने वाढले हे बघून एकदा सहजच शिवार फेरीला  आलेल्या कृषी अधिकाऱ्यांना आमची शेती आवडली आणि त्यांनी भात पीक स्पर्धेसाठी आमचा प्लॉट निवडला त्याच वर्षी आम्हाला भात पीक स्पर्धेत तालुका जिल्हा आणि राज्य या तिन्ही पातळीवर सलग तीन वर्षे पहिला क्रमांक मिळाला त्यामुळे आम्हाला अनेक वृत्तपत्रे आणि मासिके यात प्रसिद्धी मिळाली यानंतर एस आर टी पद्धतीचे तांदळाचे सर्वाधिक उत्पादन घेण्यात आमचा जगात दुसरा क्रमांक आला पहिला क्रमांक मिळवलेल्या चीनच्या शेतकऱ्याचे तांदळाचे उत्पादन १९.४० क्विंटल पर हेक्टर आणि आमचं १९.२४ क्विंटल पर हेक्‍टर असे आले आणि  थोडक्यात आमचा पहिला क्रमांक गेला याची आम्हाला खूप हुरहुर लागली पण यामुळे आमचं नाव सर्वदूर झाले आम्हाला खूप प्रसिद्धी मिळाली, अनेक चांगले पुरस्कार, मानमरातब मिळाले या सर्वांमुळे अधिक चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळाली.

         यानंतर  आम्ही सेंद्रिय शेती चा प्रयोग केला, देशी गायीचे संगोपन, अझोला निर्मिती, कातळावर चिरेखाणी चे शेततळ करून आंबा झाड लागवड ,ड्रिप इरिगेशन चा वापर ,गावठी बियाण्यांचे संवर्धन असे विविध प्रयोग करायला सुरुवात केली कोकणात भात पिकानंतर जमिनी ओसाड ठेवतात पण आम्ही त्यात सूर्यफूल ,भुईमूग, मका , मूग, नाचणी कुळीथ, उडीद ,चवळी, अनेक वेगवेगळ्या भाज्या अशी विविध पिके पीकफेरपालट पद्धतीने घेतो त्यामुळे जमिनीचा पोत सुधारून सुपीकता वाढली आम्ही धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालो आणि आम्हाला घरी वर्षभर पुरेल एवढे घरचे धान्य, घरच्या भाज्या, घरचे तेल हे सर्व करण्यातली आणि खाण्यातली मजा काही औरच असते नाही का ?

            या सर्वप्रयत्नांचे चीज म्हणून मिलिंद ला जिल्हा पातळीवरचा आदर्श शेतकरी पुरस्कार आणि राज्य पातळीवरचा शेतीनिष्ठ शेतकरी हा पुरस्कार मिळाला त्यामुळे आमच्या कामाची प्रसिद्धी सर्वत्र झाली अनेक वृत्तपत्रे, मासिकातून आमचे लेख छापून आले पण हे सर्व चालू असताना आमचा देशभरातील अनेक शेतकऱ्यांशी संपर्क आला देशाच्या एका कोपऱ्यात राहून छोट्याशा खेडेगावातून अशिक्षित असलेले अनेक शेतकरी आपल्या शेतामध्ये जे नवनवीन प्रयोग करत होते त्याची माहिती ते स्वतः जेव्हा आम्हाला सांगत तेव्हा आमचे हवेत जाणारे पाय जमिनीवर यायला खूप मदत झाली आपल्यापेक्षाही प्रतिकूल परिस्थितीत राहूनही संकटांवर मात करून शेतीत अभिनव प्रयोग करणारी ही सर्व सुज्ञ शेतकरी माणसे आम्हाला खूपच आदरणीय वाटतात त्यामुळे आम्ही त्यांचा आदर्श घेऊन आजही नवीन नवीन प्रयोग करण्यासाठी  नवी उमेद घेऊन प्रयत्न करत असतो.

       शेती महासागरआहे त्यात प्रयोग करायला जेवढा वाव आहे तेवढा दुसऱ्या कुठल्या क्षेत्रात नाही असं माझं मत आहे  आम्ही जे करतोय ते म्हणजे समुद्रातून तांब्याभर पाणी काढण्यासारखे आहे.आम्हाला अजून बरेच काही काम करायचं आहे सध्या आम्ही भाताच्या पारंपारिक जातींचे संवर्धन करण्याचं काम करत आहोत त्यातली एक जात म्हणजे लाल कुडा म्हणजे लाल तांदळाची जात आणि बासमती सारखा सुगंध असलेली सुगंधा ही देशी वाणाची जात विकसित करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे आंब्यांच्या ही विविध जाती चा अभ्यास करून अमृत पायरी हे पायरीच्या मोठ्या आणि अत्यंत गोड फळाची नवीन जात तयार करण्याचं काम चालू आहे.

       आजही आपल्याला असं चित्र दिसतं की शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही परंतु जर आपला माल दर्जेदार असेल तर बाजारात आपल्या मालाला नक्की चांगला भाव मिळतो याची आम्हाला प्रचिती आली आहे.आमच्या सर्व धान्य ,भाज्या, आंबे यांना चांगली मागणी असते त्यामुळे आमचा ते पिकवण्याचा उत्साहही वाढतो पुणे आणि मुंबई येथे आम्ही हा सर्व शेतमाल योग्य दरामध्ये विकतो आम्हाला अजून बराच मोठा टप्पा गाठायचा आहे हे सर्व करताना आम्हाला सर्व काही अत्यंत सुरळीत पणे मिळालं असं अजिबात नाही अनेकदा संकटे आली निराशेचे प्रसंग आले पण आम्ही आमचं काम चालू ठेवण्याचा निर्धार केला आहे.

       पूर्वी पासून उत्तम व्यापार आणि कनिष्ठ शेती असं तत्व होतं पण आज करोनाच्या काळामध्ये शेती हे सर्वोत्तम उत्पन्नाचे साधन आहे हा विचार अधोरेखित झाला आहे आज मुंबईत नोकरी गेल्याने परतआलेल्या दहा जणांना आम्ही आमच्या शेतीत सहभागी करून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी सक्षम बनवले आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

        आज बऱ्याचदा शेतकरी म्हटलं की आकाशाकडे डोळे लावलेला, भेगाळ जमीनीकडे बघणारा , आत्महत्या करणारा असे निराशावादी चित्र डोळ्यासमोर येते परंतु प्रत्यक्षात शेती हा खूप व्यापक आणि समृद्ध व्यवसाय आहे. शेती नक्कीच फायद्याची आहे परंतु त्यासाठी उत्तम काटेकोर नियोजन, भविष्यातील संधी ची उपलब्धता याचाअभ्यास करण्याची अत्यंत गरज आहे तरच शेती फायद्यात आहे असे म्हणता येईल. ज्याला काही जमत नाही तो नाईलाज म्हणून शेती करतो हे चित्र आजच्या तरुण पिढीने बदलण्याची खूप गरज आहे असे मला वाटते कारण या क्षेत्रामध्ये काम करण्याची व्यापक संधी ,अभ्यास पूर्ण नियोजन करून सहज यशस्वी करून दाखवता येईल यात काही शंका नाही शेतीकडे एक व्यवसाय म्हणून आपण बघत नाही तोवर आपली मानसिकता बदलणं खूप कठीण आहे परंतु  सध्या थोडे आशावादी चित्र समोर यायला लागले आहे अनेक सुशिक्षित तरुण तरुणी या  क्षेत्रामध्ये अभ्यास पूर्ण पाऊल टाकून नवनवीन प्रयोग करताना दिसत आहे हीआपल्या देशासाठी खरोखरच खूप आनंदाची गोष्ट आहे आपणही आपापल्या परीने या सर्वांना मदत केली पाहिजे आणि प्रोत्साहन दिले पाहिजे तरच येत्या काही काळात आपल्याला अनेक आदर्श शेतकरी खेडोपाडी आनंदाने काम करताना दिसतील यात काहीच शंका नाही आणि शेवटी मी एवढंच सांगेन की  मी एक शेतकरी आहे याचा मला खूप अभिमान आहे.                                   सुवर्णा मिलिद वैद्य (०२३५७) २४३०४८

Leave a Reply

Close Menu