एकटेपणा आणि आपण…

      कोविड-१९ हा जरी शारीरिक आजार असला तरी त्याचे मानसिक आरोग्यावर होणारे परिणाम कोविड-१९ चा प्रादुर्भाव न झालेल्या लोकांनादेखील भोगावे लागत आहेत. एक तर आजार होण्याची भीती आणि दुसरे म्हणजे या आजाराची साथ केव्हा संपेल याची अनिश्चितता. या आजाराच्या नियंत्रणासाठी लॉकडाऊन करण्यात आले, त्या लॉकडाऊनचेदेखील भावनिक परिणाम आहेत. लॉकडाऊनचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे एकटेपणाची जाणीव!

       गंमत म्हणजे मी आरोग्य खात्यात फारशी नोकरी कधी केली नाही, पण कोविड-१९साठी लॉकडाऊन जाहीर व्हायच्या फक्त १२ आठवडे आधी मी गोव्यातील आरोग्य संचनालयाच्या सरकारी नोकरीत आलो. माझे कार्यालय म्हापशात म्हणजे माझ्या बांदा गावापासून केवळ २८ किमीवर. त्यामुळे लॉकडाऊन होईपर्यंत मी घरुन रोज येऊन-जाऊन काम करायचो. पण लॉकडाऊन झाले आणि माझे घर पार सीमेपलिकडे गेले. पत्रादेवीची सीमा म्हणजे जणू भारत-पाकिस्तानची सीमा असल्यासारखी झाली. माझी बायको आणि मुलगी सीमेच्या पलिकडे महाराष्ट्रात आणि मी गोव्यात. मी जेव्हा अनिश्चित काळासाठी घरुन निघालो तेव्हा माझ्या ७ वर्षांच्या कन्येने मला मिठी मारत डबडबलेल्या डोळ्यांनी म्हटले, ‘बाबा, तू आम्हाला सोडून जाऊ नकोस ना.काही क्षण मलाही जाऊ नये असे वाटले. खरं म्हणजे माझी मुलगी आणि बायको घरी सुरक्षित राहणार होती आणि मी देखील नोकरीसाठीच बाहेर जात होतो. पण अनिश्चतकालीन विरहाची वेदना मला त्याक्षणी भयंकर वाटली. मी कामावर आल्यावर सुरुवातीच्या काही दिवसात अशी भीती मनात अधूनमधून डोकावे की समजा मला कोविडची लागण झाली तर? ९०टक्के लोकांना कोविडची लागण झाली तरी गंभीर धोका नाही, पण ज्यांना मधुमेह वा इतर आजार आहेत त्यांना धोका जास्त व मी तर हृदयविकाराचा पेशन्ट.

      मी सुरुवातीच्या दिवसात जुन्या आझिलो हॉस्पिटलच्या गेस्टरुममध्ये राहत असे. दुपारनंतर फारसे काम नसे आणि पूर्ण लॉकडाऊन असल्यामुळे कामाव्यतिरिक्तचा सगळा वेळ एकट्याने खोलीत बसून काढावा लागे. एकटेपणामुळे मनात विचारचक्र फिरत रहायचे. अशावेळी कोविडची लागण होण्याच्या भीतीपासून मला निलकंठ गायातोंडे यांचा मानसिक आधार मिळाला. कोण निलकंठ गायतोंडे? खरं म्हणजे हा शंभर सव्वाशे वर्षांपूर्वी होऊन गेलेला माणूस. जर त्याचा उल्लेख आचार्य धर्मानंद कोसंबीच्या निवेदनात आला नसता तर तो मलाही माहीत झाला नसता. तो धर्मानंदांसारखा कर्तृत्ववान देखील नव्हे. त्याचे ध्येयही धर्मानंदांसारखे उदात्त नव्हते. तो कवळेमठाच्या आधारे वेदाभ्यास करण्यासाठी काशीला गेला होता. काशीतच त्याची धर्मानंदांशी ओळख झाली. त्याला कवळे मठाचा आधार होता, पण धर्मानंदाना असा कोणताच आधार नव्हता. त्यामुळे त्यांना काशीत राहण्यासाठी जागी मिळवताना नाकीनऊ आले. शेवटी या निलकंठने त्यांना आपल्या खोलीत राहायला जागा दिली. ते निलकंठसोबत रहात असताना प्लेगची साथ आली. प्लेगने माणसे पटापट दगावू लागली. प्लेगने मरण्याचे प्रमाण कोरोनाच्या तुलनेत खूपच प्रचंड होतं. निलकंठची खोली जिथे होती त्याच्याजवळच स्मशान होते. प्लेग सुरु झाल्यापासून तिथे सतत प्रेते जळत असायची. अशात एक दिवस धर्मानंदाना सपाटून ताप भरला. आज जसे प्रत्येक सर्दीचे लक्षण म्हणजे कोरोनाचा संशय, तसाच त्याकाळात प्रत्येक ताप म्हणजे प्लेगचा संशय. धर्मानंदनी नीलकंठला आपल्यापासून दूर जायला सांगितलं. पण एरव्ही भित्र्या स्वभावाचा असणारा निलकंठ म्हणाला, ‘मी तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही. मरायचे असेल तर सोबत मरुआणि त्याने धर्मानंदाशेजारी असलेले आपले अंथरूण हलवलेदेखील नाही. मी जेव्हा हा प्रसंग पहिल्यांदा वाचला तेव्हा मला निलकंठच्या वागण्याचे अप्रुप वाटले होते.

      कोविडच्या सुरुवातीच्या दिवसात मला निलकंठ आठवला. निलकंठसारखा सामान्य माणूस इतके उच्च वर्तन दाखवत असेल आणि मला ते कौतुकास्पद वाटत असेल तर डॉक्टर म्हणून काम करताना मला भीती का वाटावी? थोडक्यात, निलकंठच्या आठवणीने मला माझ्या परिस्थितीतदेखील अर्थ दिसू लागला. मला जरी कोरोना झाला आणि त्यात मरण जरी आले तरी ते उदात्त असेल याची जाणीव झाली.

       गंमत म्हणजे जीवनात अर्थ शोधण्याची गरज निलकंठबाबतच्या या घटनेनंतर ४०-५० वर्षांनी डॉ. व्हिक्टर फ्रँकल यांनी मांडली. डॉ.फ्रँकल हे व्हिएन्नाचे म्हणजे डॉ.सिगमंड फ्राईडचे गाववाले. डॉ.फ्राईडनी सुखाचा शोध ही माणसाची प्रेरणा मानली. तर त्यांच्यानंतर डॉ.अडलर यांनी सत्तेचा हव्यास ही प्रेरणा मानली. डॉ.फ्रँकल या दोघांना गुरु मानत. ते म्हणत की, ‘मी या दोघा गुरुंच्या खांद्यावर उभा आहे, त्यामुळे मला अधिक स्पष्ट दिसतेय.फ्रँकल म्हणाले, जीवनाच्या अर्थाचा शोध ही प्ररणा आहे.

      माणसाच्या जीवनाला अर्थ असतो, त्याच्या जीवनातील वेदनेलादेखील अर्थ असतो. अगदी दुःख आणि मृत्यूलादेखील अर्थ असतो. त्यांच्या सिद्धांतावर आधारित उपचार पद्धतीला लोगोथेरपी म्हणतात. डॉ. फ्रँकल यांची ही लोगोथेरपी त्यांच्या स्वानुभवातून विकसित झाली. मनोविकारतज्ज्ञ असलेल्या डॉ. फ्रँकलना हिटलरच्या नाझी फौजांनी ऑस्ट्रिया जिंकल्यानंतर एक कैदी म्हणून छळछावणीत धाडण्यात आले. या छळछावणीतून जीवंत परत येण्याचे प्रमाण २९ माणसांमागे १ इतके अत्यल्प होते. अशा ठिकाणी एक कैदी म्हणून (डॉक्टर म्हणून नव्हे) तब्बल ३ वर्षे काढून ते जीवंत परतले. ते जेव्हा जिवंत परत आले तेव्हा त्यांचे आईवडील, पत्नी, भाऊ भावजय हे सर्व नातेवाईक मारले गेले होते.ते म्हणतात, ‘छळछावणीत पाठवण्यात आलेले लोक तीन टप्प्यातल्या मानसिक अवस्थांतून गेले. पहिली कैद झाल्यानंतर सुरुवातीची अवस्था, दुसरी कैदेत असतानाची अवस्था आणि तिसरी सुटका झाल्यानंतरची अवस्था.या तिन्ही अवस्था भयानक क्लेशदायक होत्या. अगदीच अपुरे अन्न, अपुरी झोप, भयानक अस्वच्छ राहायची जागा, सततची मारहाण, बर्फाळ थंडीत अपुरे कपडे ही शारीरिक परिस्थिती तर होतीच, पण मानसिक क्लेशतर त्याहून भयानक होते. तेथून मृत्यूशिवाय सुटकेचा मार्ग दिसत नव्हता. सोबतचे कैदी एकतर शारिरीक हालाखीने मरत होते किवा गॅस चेंबरमध्ये पाठवून मारले जात होते. शारिरीक मारापेक्षा जास्त त्रास होई तो पदोपदी जाणीवपूर्वक केलेल्या अपमानाचा. अनिश्चितताहा सर्वात मोठा मानसिक क्लेश तिथे होता.

       या सर्व परिस्थितीवर मात करण्याचा कोणता प्रयत्न डॉ. फ्रँकल करत होते? ते या सगळ्याकडे थोडेसे तटस्थ होऊन लोक कुठल्या मानसिक अवस्थांतून जात आहेत याचे अवलोकन करीत. काहीवेळा ते कल्पना करीत की ते या छळछावणीतून सुटलेत आणि त्यांना ‘‘छळछावणीचे तेथील लोकांवर झालेले मानसिक परिणाम‘‘ या विषयावर भाषण करायला बोलावले आहे, अशावेळी आपण कसे भाषण करु याचे चित्र ते मनात रंगवीत. आणखी एका कल्पना चित्रात ते मनाला रमवित. ते म्हणजे आपल्या सर्वात प्रिय व्यक्तीसोबत, पत्नीसोबत बोलत असल्याची कल्पना करुन. छळछावणीत त्यांना दोन प्रकारची माणसे पाहायला मिळाली. काही क्रूर तर मोजकी काही दयाळू. कैद्यांपैकी काही जेव्हा कैद्यांवर लक्ष ठेवण्यासाठी कापो बनवले जात तेव्हा ते नाझी सैनिकांपेक्षादेखील क्रूर वागत. तर काही नाझी (अगदीच मोजके का असेना) दयाळूपणा दाखवत. एका नाझी अधिका-याने इतर अधिका-यांपासून लपवून स्वतःच्या पैशांनी कैद्यांसाठी जादा औषधपाण्याची सोय केल्याचा अनूभव डॉ. फ्रँकलनी नोंदवला आहे. जुन्या आझिलो हॉस्पिटलच्या गेस्टरुममध्ये जे एकमेव पुस्तक मी दोनवेळा वाचून काढले ते म्हणजे डॉ. फ्रँकलचे.      

       खरे म्हणजे हे पुस्तक मी या आधीदेखील वाचून काढले होते. पण त्याचे महत्व आणि त्याचा गंभीर अर्थ मात्र मला गेस्टरुममधल्या एकाकीपणात जाणवला. मी काही छळछावणीत नव्हतो, पण अनिश्चितता, जवळच्या लोकांचा विरह, एकाकीपणा आणि मुख्य म्हणजे आपले स्वातंत्र्य मर्यादित करण्यात आल्याची भावना यांना मी तोंड देत होतो. अशावेळी डॉ. फ्रँकल यांचे एक वाक्य माझ्या मदतीला येत राहिले, परिस्थिती जरी आपल्या नियंत्रणापलीकडची असली तरी परिस्थितीला मानसिक प्रतिसाद कसा द्यायचा याचं स्वातंत्र्य मात्र कुणीच हिरावून घेऊ शकत नाही.

अतिथी-डॉ.रुपेश पाटकर, मोबा. ९६२३६६५३२१

Leave a Reply

Close Menu