मुसळधार कोसळलेल्या परतीच्या पावसाने भातशेतीचे नुकसान झाले असून शेतक-यांनी घेतलेल्या मेहनतीवर पाणी पडले आहे. भात कापणी व्हायच्या आतच काही ठिकाणी भात आडवे होणे, त्याला कोंब येणे असे प्रकार घडल्याने भविष्यात तांदुळ आणि गुरांचा चारा कमी पडणार असल्याची शक्यता शेतक-यां -मधून वर्तविली जात आहे.

    कोकणात काही अपवाद वगळता येथील कुटुंबांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. त्याला अनुसरुनच काहीजण शेती माध्यमातून जोडधंडाही करतात. भाताची शेती झाल्यानंतर एकाच जमिनीत शेतकरी बाराही महिने विविध प्रकारचे उत्पादन घेत असतो. मात्र, इतर पिकांपेक्षा भात हा जास्त प्रमाणात पिकविला जातो. हा भात पिकविल्यानंतर वर्षभर आपल्या कुटुंबाला पुरेल अशाप्रकारची बेगमी करुन उरलेल्या भाताची विक्री करतो. तसेच काही भात हे पोह्यांसाठी सुद्धा वापरले जाते. दिवाळीच्या सणाला अशा भातांपासून बनविलेल्या गावठी पोह्यांना बाजारपेठेत भरपूर मागणी असते. अशा या भातपिकाचा उपयोग विविध कारणांसाठी केला जातो. भात कापल्यानंतर मिळणारे गवत हे गुरांसाठी चारा म्हणून वापरले जाते. तसेच ज्या शेतक-यांकडे मोठ्या प्रमाणात शेती होते, ते शेतकरी या चा-याची पण विक्री करतात. त्यामुळे भातपिक हे शेतक-याची आर्थिक पत सुधारण्यास मदत करते.

         शेती-बागायती ही सर्रास हवामानावर अवलंबून आहे. त्या त्या पिकाला साजेसं असं हवामान मिळाले नाहीतर शेतक-याला किवा बागायतदाराला तोटा सहन करावा लागतो. अलिकडे शेतीमध्ये आमुलाग्र बदल झाला आहे. शेतीसाठी सर्रास यांत्रिकीकरणाची पद्धत वापरली जाते. परंतु काही शेतकरी हे पारंपरिक पद्धतीनेच शेती करतात. यावर्षी कोरोनाच्या सावटातही शेतक-यांनी उपलब्ध मनुष्यबळ व साधनसामुग्री यांचा वापर करुन नांगरणी, पेरणी, लावणी आदी शेतीची प्रक्रिया पूर्ण केली. या कालावधीत शेतीपुरक पाऊस पडल्याने भातपिकही जोमदार आले होते. त्यामुळे शेतकरी वर्ग आनंदीत होता. परंतु, अलिकडे पडलेल्या परतीच्या पावसाने शेतक-यांना चितेत टाकले आहे. सतत पडलेल्या मुसळधार पावसाने शेतामध्ये पाणीच पाणी झाले. काही ठिकाणी भातपिक पाण्याखाली गेले. पावसाच्या मा-याने भातपिक आडवे झाले. भाताला पाणी लागल्याने त्यावर कोंबही फुटले. काही शेतामध्ये प्लॅस्टिक कापड टाकून भात सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकरी प्रयत्न करीत होते. कापणीयोग्य झालेल्या पिकाची अशाप्रकारे स्थिती झाल्याने हातातोंडाशी आलेले पिक वाया गेले आहे. आतापर्यंतच्या मेहनतीवर पाणी पडले आहे. हे उत्पादन घेताना बि-बियाणे, खते, कामगार मजूरी, यांत्रिक शेतीसाठीचे भाडे यावर केलेला खर्च वाया गेला आहे. पिकलेल्या भाता नुसार अपेक्षित अशाप्रकारचे उत्पादन येणार अशी शेतक-यांना खात्री होती. परंतु, या पावसाने झालेल्या नुकसानामुळे केलेला खर्च कसा भरुन काढायचा असा यक्षप्रश्न शेतक-यांसमोर निर्माण झाला आहे. अशा नुकसानामुळे भविष्यात तांदुळ कमी पडणार आहे. तसेच गुरांना मिळणारा चाराही अत्यल्पच मिळणार असल्याची शक्यता शेतकरी वर्तवित आहेत.

Leave a Reply

Close Menu