काल रात्री तब्बल ‘‘अकरा वर्षांनी‘‘ अकरा वाजता तिचा फोन आला. तशी खुप जुनी मैत्री..वॉटस अॅपवरुन क्वचित कधी हाय‘, ‘हॅलोव्हायचं. परंतु हल्ली तसा संफ कमीच झाला होता. काल फोन आला. नुसती धो धो बरसत होती.

      ‘सुम्या..ओळखलंस? मी कौशिकी. खूप वर्षांनी बोलते आहे. पण लिस्टमधे पहिलं नाव तुझंच होतं. ११ वाजलेत तसा उशीरच झालाय. पण म्हटलं फोन करुयाच. अगं तुझे लेख वाचते मी नेहमी. पण मनात असूनही फोन केलाच गेला नाही कधी. खरंच यार..सॉरी. सॉरी म्हणायचयं तुला त्यासाठी.

       ‘अगं, काय हे..सॉरी कशाला? आता केलास ना फोन..

      ‘हो अगं..पण किती वर्षांनी..लेख वाचला की वाटायचं आज फोन करायला हवा. परत कुणी हाक मारली, काही काम निघालं की राहीलं फोन करणं. असं असंख्य वेळा झालं. म्हणून आज उशीर झालाय तरीही आता पहिला फोन तुला लावला.

        ‘हो अगं…होतं असं धावपळीत..

       ‘हो. पण तेच तर चुकतं आपलं. मृत्यूजवळून पाहिला ना की काय करायला हवं ते उमजतं. जे मला इतक्या वर्षांनी कळलंय.

       ‘म्हणजे?‘     

       ‘सांगते. तब्बल अडीच महिने कोरोनाशी झुंज सुरु होती. डॉक्टरांचे, नव-याचे अथक परिश्रम, माझी जगण्याची जिद्द, आई वडिलांचा सपोर्ट आणि परमेश्वराची कृपा यामुळे मी यातून बाहेर पडले. पण फार जवळून मृत्यु पाहिला. वास्तव पाहिलं, काही काळ जगले ही.

       सुम्या..तेव्हा मला काय आठवायचं माहितेय? मला कदाचित स्वार्थी म्हणशील तू. पण माझी मुलं, संसार यापेक्षा..लग्न झाल्यापासून मनात असूनही ज्या गोष्टी केल्या नाहीत, आता ही प्रायोरीटी आहे म्हणून हेच करुया. ते बाजूला ठेऊ. असं करत करत जे करायचं राहून गेलं ना तेच आठवायचं.

       तुला आठवतय. तु एकदा सर्व मैत्रिणींना भेटायला एकत्र बोलावलं होतसं. तुम्ही दोघी-तिघीच भेटलात बाकी सर्वांचंच येणं बारगळलं. त्यात मीही होते. ते ही आठवतं होतं..कधी मैत्रिणींसोबत जावं फिरायला, कधी तरी स्वतःसाठी वेळ काढावा, किचनला चार दिवस दांडी मारावी, मस्त बॅचलर सारखं हिडावं, खळखळून मैत्रिणींसोबत हसावं, बागाडावं..किती छोट्या छोट्या गोष्टी सुम्या..पण आपण त्या आता हे आहे, ते आहे करत मागे सारत जातो. कधी मागे पडत जातात. कधी मुलं लहान आहेत, कधी मुलांची शाळा, परीक्षा, कधी नव-याच्या मिटींग, त्याचे व्याप, कधी सासू-सासरे आजारी आहेत, कधी पाहुणे यायचेत, कधी सासरची फंक्शन. मग ती चुकवायची कशी..? करायलाचं हवं ना..आपल्या आईने तसंच केलय..ते संस्कार..तडजोड..ते मोल्ड होणं..कुणाला काय वाटेल? कोण काय म्हणेल? कोण दुखावल जाईल..किती विचार गं..पण हरएक वेळी ‘‘त्यागमूर्ती‘‘ व्हायच्या या खटाटोपात स्वतःचा विचार आपण करतच नाही. नुसतं चालत रहायच. काय मिळवतो यातून? खरंतर काहीच नाही..

       अगं, या आजारपणात नवरा आणि माझे आई वडिल या व्यतिरीक्त कुणीही माझ्यासोबत नव्हतं. कारणं काहीही असोत. ज्यांच्यासाठी मी वीस वर्ष जीव घालवला, ज्यांना जीव लावला, (असं मला वाटत होतं) ते आठ दिवसात कंटाळले..हे वास्तव आहे.

       कुणाचाच अनुभव सार्वत्रिक सत्य असू शकत नाही हे ही ठाऊक आहे मला. परंतु ९५ टक्के ठिकाणी हेच चित्र पाहिलं, अनेकींच्या बाबतीत जवळून अनुभवलं. हे भयाण वास्तव!!!

       आत मात्र ठरवलं बस्स..पूर्ण बरं झाल्यावर आता ‘‘त्यागमूर्ती‘‘, आदर्श वगैरे गोष्टी, ते टिपिकल ओझं न बाळगता मनसोक्त जगायचं. तेव्हा जे जे आठवत होतं ते लिहून काढलं. काही जवळच्या माणसांजवळ बोलायचं राहिलं ते सगळे नंबर लिहिले..शोधून काढले..पहिला फोन तुला केला.

       सुम्या, चाळीशीच्या पुढे गेलो आपण. आता स्वतःकडे पहायला हवं, जेव्हा जे वाटेल ते ‘‘कारणेरीया‘‘ होऊ न देता करायला हवं. तसं नाही केलं वा उद्या संसाराच्या रामरगाड्यात माझं अमुक करायच राहिलं म्हटलं आणि ती खंत बोलून दाखविली तर बाकीचे एवढंच म्हणतात, ‘‘करायच ना,.आम्ही कुठे अडवलं होतं?‘‘

       त्यामुळे दुस-या कुणाच्याही जा हो तु..कर हो..अशा परवान्याची वाट न पहाता आपणच आपला मार्ग शोधायला हवा. स्वतःचा विचार करायला हवा. गृहीत धरलं जाण्याची बहुतांश वेळा आपणच लावलेली सवय प्रयत्नपूर्वक मोडायला हवी. सांस्कृतिक नाती वगैरे सर्व ठिक; आपआपल्या जागी. पण कुणी स्वार्थी म्हटलं तरी चालेल, थोडा वेळ स्वतःसाठी काढायला हवाच. मला जे जाणवलं ते मला माझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगायचय..त्यागमूर्ती, मग ती कसं सर्वांसाठी करते, ती किती ग्रेट असतेच्या पोस्ट. तु कशी ग्रेटआहेसची तयार केलेली हवा‘. मग ते ग्रेटपण ऐकायचा आपल्याला होणारा मोह‘. त्यापायी परत परत ते त्यागमूर्ती होण्याचे व्यसन, ते टिपिकल आदर्श हे सगळं आपणचं टाळायला हवं. निदान आता तरी शहाणं व्हायला हवं.

       आता दोन महिन्यांनी मीच भेट ठरवणारे. तु येशील. मला खात्री आहे.

       , बाईक वरुन हिडायचय मला.. रिळ, गणपतीपुळे..अगदी चिपळूण पर्यंत हिडून येऊ..खूप बोलायचंय..खूप पेंडींग आहे गं.

      माझी ‘‘पेंटींगची आवडही‘‘ मागे पडली आहे. पडलीय कसली. मीच मागे सारली आहे म्हण. ती सुरुवातही केली आहे. फोटो पाठवेन तुला.

 ‘हो, अवश्य.

आणि एक. ज्या स्त्रीया मनसोक्त जगतात ना. त्यांना नावं ठेवणंही आपणच बंद करायचं आता. म्हणजे हे मी ठरवलय. अर्थात तुझी साथ असेलच. मला त्याबाबत कोणतीच शंका नाही.

       ‘हो गं. हो. नक्की. थोडक्यात काय.. ‘‘बकेटलिस्ट‘‘ ठेवायची नाही.तिच्या पूर्वीच्या स्टाईलनी ती खळखळून हसली. एकदम करेक्ट..शेवटच्या क्षणी.. ‘‘तो येतो‘‘ तेव्हा बाय बाय म्हणताना ती पूर्ण झालेली, जगलेली असायला हवी..

    हे कैक वर्षानंतरच तीचं बरसणं.विचार करायला लावणारं होतं. कोरोना जवळ तिला करावी लागलेली लढाई मोठ्ठी होती. तिच्या भाषेत सांगायचे तर यमराजांचे थोडे घुमजाव झाले आणि ते परत गेले. खरंच जीवावरच्या संकटातून ती बाहेर आली आणि नव्याने उलगडलेली आयुष्याची सफर करायला सज्ज झाली. ती सफर तिच्या पद्धतीने ‘‘विचारांचे रुजवण‘‘ घालत ती पूर्ण करेलच…!!

डॉ.सुमेधा देसाई (९४२२६११५८३)

Leave a Reply

Close Menu