दीपावलीचा फराळ पार अंगावर आला होता. एकदम सुस्तावलो होतो. अश्या रीकामटेकडेपणाच्यावेळी सोशल मिडीयाचा आधार असतो. जो तो व्हाटसअप वर दिवाळीच्या फराळाचे फोटो पाठवत होता. लाडू, करंज्या, चकल्या, कडबोळ्या, चिवडा एकापेक्षा एक विविध पदार्थांनी भरलेल्या थाळ्यांचे मस्त फोटो काढून व्हाटसअप, फेसबुक, इन्स्टाग्राम वर शेअर केले जात होते. त्याची चव न घेताच अंदाजे “वा..मस्त” अशी कमेंट टाकायची, म्हणजे नक्की त्या गृहिणींना आपल्या कष्टाचे चीज झाल्याचे समाधान लाभत असेल. यावेळी कोरोनामुळे दिवाळीचे फराळ बनवायला बायांना (सोबत बाप्यांनाही ) मस्त फुरसत मिळाली होती. त्यामुळे यंदा फराळांची रेलचेल अंमळ वाढल्याचेही जाणवत होते. मीही आमच्या सौभाग्यवतीने आठवडाभर अथक मेहनतीने बनविलेला फराळ व्हाटसअप/फेसबुकवर शेअर केला. त्यात वेगळेपण होते ते कांदापोहे, गोडेपोहे, उसळ आणि रताळ्याचा (कणगी शोधू होतय पण मुंबयक खय गावाक नाय). मुंबईतल्या आमच्या वेंगुर्लेकर / सिंधुदूर्गकर मित्र मैत्रीणींना याचे काही अप्रुप वाटले नसले तरी जुन्या आठवणी नक्की जाग्या झाल्या असतील. मात्र इतर लोकांनी मेसेज करुन, फोन करुन विचारले.. “अहो तुमच्या फराळामध्ये हे पोहे, ऊसळी आणि रताळी कशाला?” म्हटले “बाबारे आमच्या कडे फराळात पोहे आणि ऊसळीला खूप महत्व आहे. आम्ही या दिवसाला चांवदिस म्हणतो आणि आग्रहाने फाँव खावक ये म्हणून निमंत्रण देत असतो”.

                 तशी लहानपणी दिवाळी साजरी करण्याची आमची परीस्थिती नव्हती. परंतु चावदिसाच्या पहाटे उटण्याची आंघोळ करुन पोहे आणि ऊसळीवर आवर्जून ताव मारला जायचा. सर्वत्र फराळाच्या ताटाची देवाणघेवाण तर व्हायचीच, पण ज्यांच्या घरी फराळ बनत नाही त्यांच्या घरी दिवाळीचा फराळ ताट भरुन पाठवण्याची कोकणातली परंपरा. त्यामुळे परिस्थिती कीतीही गरीब असली तरी दिवाळीच्या फराळाची कधी कमतरता भासली नाही. फराळानंतर महत्वाचा भाग म्हणजे दिवे लावणे. रेशनवरच्या पाम तेलाचे दिवे लावले की झाली दिवाळी. पण अजूनही आठवते, चाळीत राहणारे सर्वधर्मीय दिवाळीला दारात, अंगणात दिवे लावायचेत, त्या मंद दिव्यांचा श्रुंगाराने चाळीचे रुप फारच मोहक दिसायचे. कंदिलही घरीच बनवले जायचे. काड्या आणि रंगीत फोली (कागद) कापून आकाशकंदिल किंवा चांदणी बनवली जायची. यात प्रकाशासाठी विजेच्या दिव्याऐवजी पणती ठेवली जायची. मला वाटते भगभगीत वीजेच्या दिव्या ऐवजी तेलाच्या दिव्यात प्रकाशमान होणारे कंदिल अधिक मोहक दिसायचेत.

            नरकासूर ही अजून एक आगळी परंपरा आपल्याकडे आहे. बालगोपाळ मंडळी दिवाळी जवळ आली की नरकासूर आणि किल्ले बनविण्यात गुंग व्हायचीत. बालगोपाळांबरोबर घरातील मोठ्यांचाही यात सहभाग असायचा. आपले कलाकौशल्य पणाला लावून बीनखर्चात नरकासून आणि देखणे किल्ले उभे रहायचे. अलीकडे नरकासूर मिरवणूक आणि स्पर्धा यामुळे या नरकासूर बनविण्याच्या कलांना मोठे व्यासपीठ मिळू लागले आहे. चांवदिवसाच्या आदल्या रात्री या नरकासूरांची मिरवणूक वाजतगाजत निघते, ती बघण्यासाठी रस्त्यावर दुतर्फा गर्दी होते. चांवदिसाच्या भल्या पहाटे उठून या नरकासूराचे दहन करण्यात येते. ही आगळीवेगळी परंपरा मी मुंबईत रंगवून सांगत असतो. दिवाळीत यंदा कोरोनामुळे वेंगुर्ल्याला जाण्याचा योग आला नाही, परंतु गेले कित्येक वर्ष काही अपवाद वगळता वेंगुर्ल्याची वारी होत असली तरी चांवदिवसाचा मुहूर्त बरेचदा चुकतो.

        आमच्या बालपणी वेंगुर्ल्यात बऱ्याच ठिकाणी पौराणिक देखावे उभे केले जायचे. ही परंपरा अजूनही चालू आहे. फार सुंदर असायचेत हे देखावे. सर्वच देखावे सुंदर असायचेत परंतु खरे आकर्षण असायचे ते रामेश्वर तलावातील देखावा. पाण्यावर तरंगता देखावा बघायला मी आवर्जुन रामेश्वर तलावाजवळ जायचो. तलावाच्या कठड्याजवळ उभे राहून गर्दीत टाचा ऊंच करुन बऱ्याच महतप्रयासानंतर हा देखावा व्यवस्थित नजरेच्या टप्प्यात यायचा. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी बत्ताशे आणि साखरेचे फुटाणे गोळा करायला बच्चे कंपनी घरातून पीशव्या घेऊनच बाहेर पडायचीत. वेंगुर्ल्यातील व्यापारी मंडळी पांढरी टोपी, लेंगा आणि सदरा या आपल्या टिपीकल पेहरावात लक्ष्मी पूजनाच्या दिवशी दुकानात आलेल्या प्रत्येकाच्या हातावर साखरेचे फुटाणे वा बत्ताशे ठेवताना अजूनही नजरेसमोर येतात.

         लक्ष्मी पूजनाला वेंगुर्ल्याचा बाजार फुलून गेलेला असायचा. अपवाद फक्त एका वर्षाचा. त्यावर्षी दूरदर्शनवर (त्याकाळी अजून इतर वाहिन्यांचा दूरचित्रवाणी माध्यमात प्रवेश झाला नव्हता) “मैने प्यार किया” हा चित्रपट संध्याकाळी दाखविण्यात आला होता. लोकं टि.व्ही. समोरुन चित्रपट संपेपर्यंत हलली नव्हती. चित्रपट संपताच मात्र बाजारात लोकांनी गर्दी केली होती. पण हा एकमेव अपवाद वगळता लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वेंगुर्ले बाजार गर्दीने फुलून गेलेला असायचा. अजून एक खास आकर्षण असायचे ते कॅलेण्डरचे. व्यापारी त्यांच्या दुकानाची जाहीरात असलेली कॅलेंडर छापून वाटायचेत, देवदेवीकांचे चित्र असलेली कॅलेण्डर घराघरात भिंतीवर विराजमान व्हायचीत.

           नानाचे थेटर (नटराज चित्र मंदिर) हेही एक दिवाळीच्या दिवसातले खास आकर्षण असायचे. दिवाळीत एखादा हिट चित्रपट प्रदर्शित करण्यावर भर दिला जायचा. चित्रपट बघायला गर्दी तर व्हायचीत पण दिवाळीचे खास आकर्षण असायचे ते त्या चित्रपटाचे पोष्टर. दिवाळीच्या काळात चित्रपटाच्या पोष्टरची खास सजावट असायची. मला अजूनही दिवाळीच्या काळात नानाच्या थेटरात प्रदर्शित झालेल्या “कर्मा” या चित्रपटाचे पोष्टर आठवतेय. चित्रपटातील कलाकारांचे कट आऊट बनवून लाईटचा वापर करुन पोष्टरला थ्रीडी स्वरुप दिले होते.

          मी मात्र दिवाळीची वाट बघायचो ते दिवाळी अंकासाठी. विकत घेऊन वाचायची ऐपत नव्हती. पण त्याची कधी गरजच भासली नाही. वेंगुर्ल्याच्या नगरवाचनालयात अगदी मोफत वाचायला मिळायचे दिवाळी अंक. वाचनालयात नेहमीच्या सर्व दैनिके, साप्ताहिके, मासिके यांचे दिवाळी अंक वाचायला मिळायचे तेही अगदी मोफत. विनोदी लेखन आणि व्यंगचित्रे याकडे माझा कल असल्याने आवाज, जत्रा हे माझे त्यावेळी आवडते दिवाळी अंक. इतरही सर्व दिवाळी अंकात मी पहिले व्यंगचित्रे बघायचो नंतर इतर गोष्टी. आवाज, जत्रा हे अंक वाचनालयात कितीही लवकर जाऊन बसलो तरी व्यस्तच असायचेत. जरा चावटच असायचीत व्यंगचित्रे पण मांडणी छान असायची. त्यावेळी कधीकाळी मीही व्यंगचित्रे काढेन, त्यांना अमेरीकेमधून प्रसिध्द होणाऱ्या दिवाळी अंकात प्रसिध्दी मिळेल अशी मी कल्पनाही केली नव्हती.

         किरातचा दिवाळी अंक वाचताना आपल्या आसपाससुध्दा प्रतिभावंत लेखक/कवी/साहित्यीक आहेत हे कळायचे. किरातने त्यांच्या दिवाळी अंकाची दैदिप्यमान परंपरा अजूनही कायम राखली याचा किरातबद्दलचा आदर अजूनच वाढतो. वेंगुर्ला आणि आसपास हा अंक फेवरेट तर आहेच शिवाय मुंबई/पुण्यात आणि इतरत्र स्थायीक झालेले किरात आणि त्यांचा दिवाळी अंक आवर्जुन वाचतात.

           हा लेख वाचत असताना दिवाळीचा फराळ संपला असेल. एवढे दिवस घरातील भरलेल्या फराळाचे डबे बघून नकोसा वाटणारा फराळ, डबे रिकामे झाल्यावर हवाहवासा वाटू लागला असेल. पण समारेच्या रॅकवरील दिवाळी अंक तुम्हाला कालही हवावासा वाटत होता आणि उद्याही हवाहवासा वाटणार आहे हे मात्र नक्की.

– संजय गोविंद घोगळे (8655178247)

Leave a Reply

Close Menu