पुलं चा विनोदः आता होणे नाही ?

      विनोदाचे प्रयोजनच मुळात , अनेकविध कारणांनी समाजमनावर येत असणारा ताण हलका करून आयुष्यात आनंद निर्माण करणे हा आहे . समाज सशक्त असण्यासाठी , अगदी प्राथमिक गरजांप्रमाणेच विनोद हे सुद्धा आयुष्याचे अविभाज्य अंग असले पाहिजे ही अत्यावश्यक आणि कालातीत गरज आहे . भाषिक , अभिनीत व साहित्यिक असे ढोबळ मानाने विनोदाचे प्रकार मानले तर काही प्रमाणात एक अभिनीत विनोद ( पुलंचे दैवत – चार्ली चॅपलीन , लॉरेल अँड हार्डीज वैगेरे ) सोडला तर इतर विनोद त्या काळच्या सामाजिक चालीरीती , भाषेचा बाज , तत्कालीन व्यावहारिक कक्षा व रीतीरिवाज यावर आधारित असतो .

           पु.ल. किंवा इतर भाषिक दिग्गजांचे विनोद त्या त्या भाषा व प्रांतिय समाजाला अमाप आनंद भरभरून देऊन गेले . समाजाच्या सर्व स्तरांवरील वाचक , श्रोते व प्रेक्षक तो आनंद मनमुराद उपभोगू शकले . एवढेच नव्हे तर किमान तीन पिढ्या त्यांच्या विनोदाच्या सूत्राने सांधल्या गेल्या . पु.लं.नी तर राष्ट्रपिता महात्मा गांधी (त्यांच्या पंचाचे कौतुक रत्नागिरीस नाही), सावरकर ( हिंदु महासभा : परदास्याच्या शृंखलांनी …. ) ह्यांच्यापासून ते रत्नागिरीच्या अंतू बर्वा पर्यंत सर्व स्तरातील व्यक्ती त्यांच्या विनोदाच्या कक्षेत त्यांनी लीलया सामावून घेतल्या . तेही कोणाच्याही भावना न दुखावता , कोणाच्याही व्यंगावर बोट न ठेवता , आणि गरिबीचा विनोदनिर्मितीसाठी मतलबी उपयोग न करता ! असाच संयम त्यांच्या अभिनीत विनोदात सुद्धा त्यांनी सहजपणे अवलंबला होता. त्यांच्या काल्पनिक वल्ली आणि समाजातील प्रत्यक्ष व्यक्ती , तसेच अनेक चित्रपट – नाटकांबरोबर , पूर्वरंग – अपूर्वाई अश्या अनेक लेखनातून, अनेक थोर व्यक्तींच्या चरित्र – चित्रणाबरोबरच , कुमारजी गंधर्व , लता मंगेशकर यांच्याबरोबर केलेला पत्रव्यवहार, अनेक उद्घाटनांची भाषणे , या सर्व पुलदर्शनात निखळ विनोदाचे एक अत्यंत सुखावणारे अंग सतत डोकावताना दिसते . अगदी मोठ्या राजकारणी व्यक्तीवरही कोणताही उद्वेग न दाखवता संयमित विनोदाने टीका करणे हे फक्त पु . ल . च करू शकले . त्यांच्या विनोदाला कोणत्याही व्यक्ती , पक्ष किंवा अधिकाराच्या पदाचे , म्हणजे अगदी दिल्ली आकाशवाणीवर पंतप्रधान नेहरूंच्या समोर प्रत्यक्ष कार्यक्रम सादर करतानाही कधी दडपण आले नाही . १ ९ ८ ९ च्या मुंबई येथील जागतिक मराठी परिषदेत त्यांनी केलेले आभार प्रदर्शनाचे भाषण हा , नैतिकतेशी तडजोड न करता , रागाचा उद्वेग न दाखवता विनोदाच्या माध्यमातून योग्य संदेश परिणामकारकरित्या योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचे एक उत्तम उदाहरण आहे . (आम्हाला एक लामण दिवा भेट म्हणून दिला आहे , पण तो सतत तेवत ठेवण्यासाठी तेवढे तेलाचे भाव कमी करावेत ‘ , किंवा राजारामभाऊ गोंधळी असा गोंधळ घालतात कि राजकारणी माणसेही घालू शकणार नाहीत ) हे मुख्यमंत्र्यांच्या समोर बोलणे , असे अनेक दाखले देता येतात . त्यांच्या विनोदाला जशी दुसऱ्याचे वर्म काढण्याची जशी धार होती तशीच कोणाच्या दुःखाने हेलावून जाणारी कारुण्याची झालर सुद्धा होती .

           थोर व्यक्ती बद्दल किंवा , त्यांच्या समोर बोलताना जसे प्र के अत्रे , अटल बिहारी वाजपेयी , स्वातंत्र्यवीर सावरकर , बाबा आमटे यांच्या समोर स्वतःचे उणेपण मोकळ्या मनाने मान्य करून , स्वतःचाच विनोदाने उपहासाने उल्लेख करून मनमोकळेपणाने अशा व्यक्तीचे थोरपण ठळकपणे दाखवणे ही किमया पु . लं . सारख्या फारच थोड्या व्यक्तींना जमते. हे थोरपण फक्त वयाने जेष्ठच नाही पण वयाने लहान , पण कर्तृत्वाने महान असलेल्या व्यक्ती जसे लता मंगेशकर , आशा भोसले , माणिकवर्मा , यांचे व्यक्ती चित्रण करताना पण दिसून येते . अशा चतुरस्त्र अंगे असलेल्या बहुरंगी व बहुढंगी व्यक्तिमत्वाचा विचार करताना त्यांच्या फक्त विनोदी पैलूंचा विचार करणे म्हणजे सर्वांगीण विचार ठरणार नाही . आपले म्हणणे समाजात परिणामकारक रित्या प्रसारित करण्याचे साम , दाम , दंड यासारखे अनेक प्रकार आहेत. एखादी व्यक्ती अधिकारांचा वापर करेल , तर दुसरी व्यक्ती दमदाटीची भाषा किंवा काही जण अश्लील भाषा वापरतील . रामदास स्वामींसारख्या विभूती रोखठोक , तर ज्ञानेश्वर शांतरस किंवा गदिमा सौंदर्यपूर्ण भाषा वापरतील पण विनोदाच्या माध्यमाने समाज रंजनाबरोबर प्रबोधन करणारे लोक फारच तुरळक असतात आणि त्यापैकी पु . ल . देशपांडे होते . हा गुण शिकता येत नाही तो उपजतच असावा लागतो .

                संगीत नाट्यछटा लेखन , चित्रपट – आकाशवाणी वरील भाषणे , उत्तम हार्मोनियम वादन , संगीतदिग्दर्शन , व्यक्तिचित्रे , चरित्रचित्रण अशी चौफेर मुशाफिरी करण्यासाठी समाजातील सर्व स्तरांतील व्यक्तींचेच नाही तर त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचे व पेशाचे पण बारकाईने निरीक्षण करत राहावे लागते . त्याशिवाय अशी अष्टपैलू साहित्य आणि विनोद निर्मिती होऊच शकत नाही.

             पु.लं. ची कारकीर्द बरीचशी स्वातंत्र्यपूर्व काळातील पण आहे . त्यामुळे ऐन उमेदीच्या काळात त्यांना स्वातंत्र्य लढा हा प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला . त्या काळात लोकांनी सोसलेला त्रास ब्रिटिशांच्या सत्तेचे फायदे ( साहेबाने पोस्ट व तारखाते आणून दहाव्या व बाराव्याची सोय केली कि नाही ? – असामी असामी ) . तसेच ब्रिटिश सतेचा जुलूम आणि बेफिकिरी ( तिकडे साहेब झोपलाय आपापल्या मडमेस कुशीत घेऊन आणि तुम्ही कसले रे गिरगावातून धसवाडी पर्यंत डि घेऊन लैंगे स्वराज्य लेंगे म्हणत हिंडताय ? तुमच्या त्या लेग्याचा साहेबाच्या पँटीवर काहीही परिणाम होणार नाही ) याचा अनुभव जवळून होता . बालगंधर्व , दिनानाथ मंगेशकर , तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर हे चमत्कार पुलंना प्रत्यक्ष बघायला मिळाले . त्यांचा सहवासही लाभला . तर आधुनिक वाल्मिकी गदिमा , संगीत विद्यापीठ सुधीर फडके तसेच वसंतराव देशपांडे , कुमारजी , पंडित भीमसेन जोशी यांच्याबरोबर काम करायला मिळाले . त्यामुळे त्यांच्या प्रतिभेला समकालीन अनेक प्रज्ञावंत यांची सुयोग्य संगत फारच पोषक ठरली होती . त्यांचे व्यक्तिमत्व रुजायला व फुलायला नि : संशय पणे खतपाणी मिळाले होते .

               स्वातंत्र्योतर काळात देशातील परिस्थिती फारच झपाट्याने बदलली . सतेसाठीची जीवघेणी धडपड सुरु झाली . नाटक साहित्य बरोबरच चित्रपट माध्यम जोमदारपणे फोफावू लागले . दळणवळण क्षेत्रात क्रांती झाली . दूरदर्शन माध्यम १ ९ ६५ ( दिल्ली ) -७२ ( मुंबई ) पासून सुरु झाले . अनेक शतकांमध्ये झाली नव्हती अशी आमूलाय क्रांती सर्व क्षेत्रात होत होती . पण पु.लं.ची प्रतिभा व विनोद या चक्रावून टाकणाऱ्या स्थित्यंतरामधूनही केवळ टिकलीच असे नाही तर नवनवोन्मेषाने जास्तच फुलत गेली .

          चार्ली चॅप्लिन, पी.जी.वुडहाऊस यांसारखे प्रतिभावंत अनेक शतकातून क्वचितच उदयाला येतात तसेच पु . लं . सारखे प्रतिभावंत असतात . स्वयंभू अशी प्रतिभा व त्याला प्रफुल्लित करणारी सामाजिक परिस्थिती , समांतर क्षेत्रांमधील तोलामोलाची सुसंवादी तसेच स्वतेजाने तळपणारी व्यक्तिमत्वे , तसेच उत्स्फूर्तपणे फुलणाऱ्या व्यक्तिरेखेला अपायकारक ठरणाऱ्या व्यापारीकरण दिखाऊपणा आणि बाजारीकरण यांचा वाराहीन लागल्यानेच अशी व्यक्तिमत्वे उदयास येऊ शकतात.

                अलीकडे मात्र भाषेचे झपाट्याने होणारे विद्रुपीकरण इंग्रजी व इतर भाषांची घुसखोरी यामुळे मराठीची मूळ गोडी कलुषित झाली आहे . अनेक अस्सल पण सोप्या मराठी शब्दांचे अर्थ नवीन पिढीला कळणे बाजूलाच पण साधे उच्चारता पण येणार नाहीत . त्यातून वाचनसंस्कृतीचा झालेला हास , सरकारी पातळीवर मराठीची एकूण सुरू असलेली अनास्था , समाजातील मुद्दाम ओढून ताणून इंग्रजी बोलण्याची प्रवृती यामुळे यापुढे विनोद असेल तर तो अभिनीत किंवा मित्रभाषेत आणि फार संक्षिप्त स्वरुपात असेल . कारण हल्ली फफ ( म्हणजे फास्ट फॉरवर्ड ) अशी जीवनपद्धती लोकप्रिय होत चालली आहे . त्यामुळे पहिल्या मिनिटामध्ये पकड घेणारे भाषण किंवा लेखन नसेल तर वाचक किंवा श्रोता लगेच थांबेल . तेव्हा लेखनकाराची तशी कुवत लागेल .

               त्यामुळे अगदी पु.लं. च्या पातळीची नाही तरी जवळपास जाणारी साहित्य आणि विनोद निर्मिती जमण्यासाठी स्वयंभू प्रतिभेबरोबरच सामाजिक परिस्थिती , स्वातंत्र्य – पारतंत्र्य असा दुहेरी अनुभव , तुल्यबल साथसांगत , भाषेची समाजात असलेली मान्यता , जाण व राजाश्रय , विकली न गेलेली प्रसारमाध्यमे अश्या अनेकविध परिमाणांचा योग एकत्र यावा लागतो आणि तो तसा जुळून येणे फार दुर्मिळ आहे .

           त्यामुळे पु.लं. सारखी असामी पुन्हा होणे म्हणजे साहित्य प्रायोगिक कला ललित कला संगीत कला क्षेत्रांचा एकाच वेळी येणारा सुवर्ण कस्तुरी योगच ठरेल .

-अरुण गजानन मराठे , कोथरुड पुणे: ९९ – २२-५२१-७९९

Leave a Reply

Close Menu