‘‘डॉक्टर,पुन्हा पुन्हा आग लावण्याच्या प्रवृत्तीला तुमच्या मनोविकृतीशास्त्रात काही नाव आहे का?‘‘ माझ्या एका मित्राने विचारले.

      ‘‘हो. त्याला पायरोमॅनिया म्हणतात. पण तू हा प्रश्न का विचारलास? असा रोगी क्वचितच आढळतो. तुझ्या बघण्यात कोणी आहे का?‘‘ मी विचारले.

      ‘‘डॉक्टर, तुम्ही असा रोगी क्वचित आढळतो म्हणताय, पण मला तर असे भरपूर लोक दिसताहेत, ज्यांना तुमचा पायरोमॅनिया झालाय‘‘, तो म्हणाला.

      त्याच्या म्हणण्याचे मला हसू आले. ‘‘कुठे पाहिलेस तू असे लोक?‘‘ मी विचारले.

      ‘‘आपल्या आजूबाजूला सगळीकडे‘‘, तो म्हणाला. मला त्याच्या म्हणण्याचा अर्थ समजेना. माझ्या चेह-यावर माझा संभ्रम स्पष्ट दिसत होता.

      ‘‘डॉक्टर, लोक तुम्हाला सतत कचरा जळताना दिसत नाहीत का? कचरा जाळणे योग्य की अयोग्य?‘‘ त्याने विचारले.

      कचरा जळताना मी सतत बघत आलोय, मी देखील तो जाळलाय. पण या मित्राच्या प्रश्नाने मी त्यावर विचार करु लागलो. प्लास्टिकसारखा कचरा जाळणे तर पूर्णपणे चूकच, पण पालापाचोळ्याच्या कच-याचे काय करावे? तो जाळावा का?

      ‘‘याबद्दल तुझी पर्यावरणीय बुद्धिमत्ता काय सांगते?‘‘ त्याने प्रश्न केला.

      ‘‘पालापाचोळा जाळणे चूक. असे करणे दोन प्रकारे चूक आहे. एक म्हणजे असे जाळून आपण झाडांच्या हिरव्या पानांनी हवेतील कार्बन डाय ऑक्साईड हवेतून काढून स्वच्छ केलेली हवा आपण पुन्हा प्रदूषित करतो आणि दुसरे म्हणजे सूर्याकडून आलेली ऊर्जा जी हिरव्या पानांनी आपल्यात साठवली होती, ती योग्य त-हेने वापरायची सोडून फुकट घालवतो.‘‘

      पण झाडांना राख ही खत म्हणून देता येते ना, असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. इथे आपण दोन गोष्टींची तुलना करु शकतो. एक अख्खा पालापाचोळा कुजून खत होऊ देणे आणि दुसरे पालापाचोळा जाळून त्याची राख खत म्हणून वापरणे. या दोनपैकी कोणत्या प्रक्रियेत आपण जास्त पदार्थ जमिनीला देतो? अर्थातच अख्खा पालापाचोळा कुजवून! दर पावसात झाडेझुडपे नैसर्गिकरित्या वाढून खूप मोठ्या प्रमाणात बायोमास तयार करतात. तो जमिनीत कुजवून जमिन समृद्ध बनवायची सोडून आम्ही तो जाळून फुकट घालवतो.

      माझा मित्र म्हणाला, ‘‘डॉक्टर, मला आणखी एका प्रश्नाचे उत्तर द्याल का? पर्यावरणीय बुद्धिमत्ता वापरुन मला सांगा की पर्यटन करणे योग्य की अयोग्य?‘‘

      माझ्या मित्राने असे विचारुन माझ्या पुढ्यात यक्षप्रश्न उभा केला. मी म्हणालो, ‘‘पर्यटन ही गोष्ट पूर्वापार चालत आलीय. लोक तीर्थयात्रा करायचे. यंत्रयुगा आधी जेव्हा लोक कुठेही जात तेव्हा ते पायी जात. त्यामुळे त्या फिरण्याला एक तर मानवी मर्यादा होत्या आणि दुसरे म्हणजे पेट्रोल-डिझेल जाळून हवेचे प्रदूषण करण्याचा प्रश्न नव्हता. पण आज कुठेही जायचे म्हणजे पेट्रोलियम पदार्थांच्या जळण्याचे प्रदूषण होते. शिवाय प्रवास सुलभ झाल्यामुळे खूप लोक प्रवास करतात. त्यामुळे तुम्ही जिथे फिरायला जाता तिथली गर्दी वाढते. तिथे हॉटेल बांधली जातात. कोणतेही बांधकाम म्हटले की, त्यासाठी लागणा-या वस्तू आल्या. चिरे हवे, सिमेंट हवे, लोखंड हवे. हे सगळे निसर्गावर ताण दिल्याशिवाय मिळणार नाही. काही वर्षांपूर्वी उत्तराखंडामध्ये प्रचंड पाऊस पडला. पुर आला. इमारती पडल्या. त्यावेळी लक्षात आलं की असंख्य इमारती पर्यावरण संबंधीचे सर्व नियम गुंडाळून ठेऊन नदीपात्रातच बांधण्यात आल्यात.‘‘

      ‘‘मग याचा अर्थ लोकांनी पर्यटन करुच नये का?‘‘

      ‘‘माणसे पर्यटन का करतात?‘‘ मनोरंजनासाठी! नव्या गोष्टी बघण्यासाठी! तुमच्या आजूबाजूचा निसर्ग रोज बदलत असतो, त्याचा तुम्ही आस्वाद घेता का? तुमच्या आजूबाजूची गावे जिथे तुम्ही चालत एखाद्या रविवारी सहज फेरफटका मारु शकता, ती कितीशी बघितलीय? मी कोकणात राहतो, माझ्या अवतीभवतीचा निसर्ग इतका सुंदर आहे की, तो बघत असताना मन समृद्ध होऊन जातं. पण लहान असताना मला वाटे की, मुंबई बघितली पाहिजे. तिथली राणीची बाग, गेटवे ऑफ इंडिया, म्हातारीचा बूट, मरिन ड्राइव्ह बघितले पाहिजे. माझे बाबा एक दिवस मला म्हणाले, ‘आज जे मुंबईत असलेले पाहायला तुला मुंबईला जावेसे वाटते ते ना छत्रपती शिवाजी महाराजांनी बघितले, ना संत तुकाराम महाराजांनी. म्हणून त्यांचे आयुष्य समृद्ध व्हायचे राहिले का? आपल्या बागेइतकी सुंदर गोष्ट दुसरी नाही.मला त्यांचे म्हणणे त्यावेळी पटले नाही. त्यावर ते म्हणाले, ‘तुझ्या डोक्यातल्या कल्पना तुझ्या नाहीत. इतरांनी केलेल्या वर्णनांमुळे तू लालचवला आहेस.बाबांना काय म्हणायचे होते ते मला त्यावेळी समजले नाही. पण जेव्हा मी पहिल्यांदा विमान प्रवास केला (एका पेशंटला डॉक्टर म्हणून सोबत करण्यासाठी), तेव्हा मला बाबांच्या म्हणण्याचा अर्थ कळला. मला विमान प्रवासाचे खूप अप्रुप वाटत होते आणि आपण केव्हा तो करु याची उत्कंठा होती. पण आता जेव्हा मी पहिला प्रवास केला तेव्हा मला जे अप्रुप पूर्वी वाटत होतं, त्यातलं काहीही अनुभवायला आलं नाही. खरं म्हणजे कामानिमित्त रोज घडणारा प्रवास हेच पर्यटन नव्हे का? मी सुमारे एक वर्ष गोव्यातील पणजी येथे बातमीदार म्हणून नोकरी करत असताना, ‘दिवाडीनावाच्या बेटावर राहत असे. या बेटावर जायला कुठच्याच बाजूने पूल नसल्यामुळे कामावर येता जाता फेरीबोटीशिवाय पर्याय नसे. याला माझी बायको कंटाळे. मी तिला म्हणालो, ‘‘नौकानयनाची मौज लूटण्यासाठी लोक कुठेकुठे फिरायला जातात आणि आपल्याला तर दिवसातून दोनवेळ (आणि तेही फुकटचे) नौकानयन घडते.‘‘

      मला असे वाटते की ब-याचशा गोष्टी आपण इतरांच्या सांगण्यामुळे किवा इतरांशी तुलना म्हणून करतो. त्यात खरोखरच मजा आहे का? किवा मला ती गोष्ट खरोखरच गरजेची आहे का, हे आपण तपासात नाही. पण मुळात हेदेखील समजायला हवे ना की आपल्याला वाटणा-या गरजा किवा आवडीनिवडी या आपल्या डोक्यात घालण्यात आल्यात की, त्या ख-याच आहेत.‘‘

      लोक तुमच्यावर कसा दबाव आणतात, याचा मला वारंवार अनुभव येतो. मी डॉक्टर असून देखील माझ्याकडे चारचाकी गाडी नाही, याचे आश्चर्य वा दुःख अनेकजण व्यक्त करतात. ते अशाप्रकारे व्यक्त करतात की, मला माझ्याकडे चारचाकी नाही याचे वैषम्य वा लाज वाटली पाहिजे. मी जेव्हा याला दाद देत नाही असे त्यांच्या लक्षात येते, तेव्हा मग ते उपयुक्ततेचा सिद्धांत मांडू लागतात. माझ्या आरोग्यासाठी चारचाकी कशी आवश्यक आहे हे ऐकवतात. मुळात हे त्यांच्या लक्षात येत नाही की, मी इतका शहाणा तर आहे की माझ्या गरजा मी ठरवू शकतो. ज्याअर्थी मी डॉक्टर होण्याइतकी हुशारी बाळगून आहे, त्याअर्थी माझ्या जीवनाबाबतचे निर्णय घेण्याचे कौशल्य माझ्यात असणार. पण हे लोकांना समजत नाही म्हणून मी मला स्वतःला बदलण्याची आवश्यकता नाही. जे आपल्याला पटत नाही, ते मान्य न करण्यासाठी एक धैर्य लागते. इंग्रजीत त्याला ऍसर्टीवनेसम्हणतात. ते जर स्वतःत बाणवले नाही तर आपण इतर जे करतात तेच करतो, मग ते बरोबर असो वा नसो. लोक काय म्हणतील ही भीती, मग आपल्याला खर्चात टाकणा-या गोष्टी करायला भाग पाडते. माझे लग्न ठरले तेव्हा मी माझ्या बायकोला म्हणालो होतो, ‘आपण संध्याकाळच्या मुहूर्तावर लग्न करु, म्हणजे लग्नाला येणा-यांना जेवायला घालायचा खर्च टळेल.ती म्हणाली, ‘‘लोक काय म्हणतील?‘‘ मी म्हणालो, ‘‘कंजूस म्हणतील! मला काही वाटणार नाही. तुला त्याबाबत कोणी विचारले तर माझे नाव सांग.‘‘ ऍसरटीव होण्यासाठी मुद्दाम प्रयत्न करावे लागतात. अल्बर्ट एलिस नावाचा एक महान मानसशास्त्रज्ञ होऊन गेला. त्याने यासाठी शेम अटॅकिंग टेक्निकची शिफारस केली आहे. लाजेवर मात करण्याचे तंत्र शिकून आपण इतरांच्या प्रभावाला निष्फळ करु शकतो.

      पर्यावरणासाठी काम करणारे माझे अनेक मित्र आहेत, त्यात उडूपीच्या डॉ. श्रीकुमार यांच्यासारखे कमालीचे साधे जीवन जगणारे आहेत तर काही इतर सामान्य (पर्यावरणीय बुद्धिमत्ता नसलेल्या) लोकांसारखे जगणारे आहेत. त्यांच्या गाडी बंगला वगैरे गोष्टीकडे बघून माझ्या बायकोने मला प्रश्न केला, ‘‘तुझे पर्यावरणप्रेमी मित्र चंगळी जीवन जगत आहेत. त्यांनी स्वतः पर्यावरणपूरक जगले पाहिजे.‘‘ मला तिच्या मुद्याचे हसू आले. मी तिला म्हणालो, ‘‘पर्यावरणप्रेमींनी कसे वागावे हे तू कशी काय ठरवतेस? आणि जर त्यांनी कसे जगायला हवे हे जर तुला ठाऊक आहे तर तूच का नाही तुझ्या जीवनाला ते निकष लावत?‘‘

      ती म्हणाली, ‘‘मी काही पर्यावरणवादी नाही.‘‘

      ‘‘पर्यावरणपूरक जीवनशैली बाळगणं ही काही ठराविक लोकांची जबाबदारी नाही. आपण प्रत्येकानेच हा विचार केला पाहिजे की माझ्या कृतीचा निसर्गावर किती दबाव येणार? माझ्या गरज नसताना नवे घर बांधण्याने किती निसर्ग ओरबडला जाणार? मी घराला रंग लावल्यामुळे निसर्ग किती विद्रुप होईल?‘‘ मी म्हणालो.

      ‘‘तुमच्यासारखा त्यागी विचार कोणी नाही करत,‘‘ ती वैतागत म्हणाली.

      ‘‘पर्यावरणपूरक जीवनशैलीचा विचार हा त्यागी विचार नाही. उलट हा अत्यंत स्वार्थी विचार आहे,‘‘ मी म्हणालो. माझ्या या अनपेक्षित उत्तराने ती गोंधळली.

      मी पुढे म्हणालो, ‘‘मी फक्त आजचा विचार करत नाहीये. मी माझ्या नातवंडांचा, पतवंडांचा विचार करतोय. एका पिढीऐवजी पुढच्या सात पिढ्यांचा विचार करणं हे अतिस्वार्थीपणाच नव्हे का? मला सांग, समजा तीनशे वर्षांपूर्वीच्या आपल्या पूर्वजांनी आज ज्या प्रकारे आपण पृथ्वी ओरबाडून वापरतोय, तशी वापरुन टाकली असती तर आज आपली काय हालत झाली असती. कदाचित, आपण जन्माला येण्यापूर्वीच ही पृथ्वी निर्मनूष्य झाली असती.‘‘

      माझ्या बालपणी परवाचेच्यावेळी माझे बाबा एक श्लोक म्हणायचे,

      समुद्र वसने देवि पर्वत स्तनमंडले!

     विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्षम क्षमस्व मे!!

      हा श्लोक मला पर्यावरणीय बुद्धिमत्तेचे सूत्ररूप वाटते.

अतिथी-डॉ.रुपेश पाटकर, मोबा. ९६२३६६५३२१

 

Leave a Reply

Close Menu