२३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावी शाळा सुरु म्हणजे परत शाळा गजबजण्याचे पडघम वाजू लागलेत महानगरांव्यतिरिक्त. महानगरांमध्येही एक दोन महिन्यांमध्ये शाळा पुन्हा गजबजतील. पण आमची सगळी छोटी पाखरं शाळेत येतील का परत, शिक्षणाच्या या प्रवाहात सामील होतील का याबाबत अनेक शंकाकुशंका मनात येतात अगदी सगळ्यांच्याच, शिक्षकांच्या, शिक्षणतज्ज्ञांच्या, शिक्षणक्षेत्रातील संबंधित सर्वांच्याच. कारण गेले अनेक दिवस जेवढी जमेल तेवढ्या ठिकाणी शाळाच घरात आलीय आणि ६८ टक्के मुलांना ती बरी वाटायला लागली आहे असं जयवंत कुलकर्णी सरांचं सर्वेक्षण सांगतंय.

     ऑनलाईन श‍िक्षण ही तात्पुरती मलमपटटी होती. ते काही कायमचं शक्य नाही हे आता सगळ्या पालक शिक्षकांच्या लक्षात येऊ लागलंय. कारण शेवटी माणसांचा माणसांशी प्रत्यक्ष संवाद ही खूप महत्तवाची गोष्ट आहे जी या ऑनलाईन शिक्षणातून साधता येणार नाही. वाढता स्क्रीन टाईम त्यातून निर्माण होणाऱ्या समास्या या एकंदर समाजाच्या आता लक्षात येत आहे. पौगंडावस्थेतील स्वकेंद्रितता किती घातक आहे आणि त्यातून किती भयानक समस्या उभ्या राहत आहेत हे आता बारकाईने विचार करणाऱ्या प्रत्येकालाच जाणवत आहे. कोण बोलून दाखवतो कोण नाही एवढंच.

     शाळा थांबली आणि शिक्षण घराघरांत जाऊन पोहोचलं म्हणजे ते अगदी १०० टक्के घरांमध्ये गेलं नाहीच. अनेक घरं अशी आहेत की तिथली मुलं शिक्षणाच्या प्रवाहातून पार बाजूला फेकली गेली कोण शेतीत काम करू लागला, कोण रोजंदारीवर जाऊ लागला, कोणी दुकानांवर किंवा छोट्या कारखान्रूांमध्ये कामाला जाऊ लागले तर काही मुलींना चक्क बोहल्यावर चढवलं गेलं. या भीषण वास्तवाचा विचार आता सर्व समाजाने करण्याची वेळ आली आहे आणि यावर एकच उपाय आहे जिथे जसं, ज्याप्रकारे शक्य आहे त्याप्रकारे शाळांचं कुलूप उघडणं आणि त्याचीच सुरुवात २३ नोव्हेंबरपासून झाली आहे.

     जरी शाळा सुरु झाल्या तरी पहिल्या दिवासापासून अगदी सगळं सुरळीत होऊन वर्गअध्यापन सुरु होईल आणि सगळं मार्गी लागेल अशी अपेक्षा ठेवणं अगदीच अस्वाभाविक ठरेल कारण कितीतरी मोठ्ठा सुट्टीचा काळ घरी गेल्यावर मुलांना परत शाळेच्या वातावरणात रुळणं आणि रुळवणं हे खूप गरजेचं आहे. आम्हा अनेक शिक्षकांना वाटतंय की मुलांना पहिले काही दिवस शाळेच्या भिंतीशी, तिथल्या दगड मातीशी बोलून रुळू द्यावं, त्यांना परत तिथल्या वातावरणाची सवय होण्यास वेळ द्यावा. मूल हे माणूस आहे हे विसरून उपयोगी नाही. गेल्या आठ नऊ महिन्यांत मूल मग ते कोणत्याही इयत्तेती त्याची शाळेची सवय सुटलीच आहे. त्यामुळे कुटुंबापासून लांब जाण्याची सवय त्याला लावणं गरजेचं आहे बरोबरच शाळेचं वातावरण, तिथ्ज्ञली शिस्त, तिथल्या वेगळ्या सवयी यांचीही पुन्हा सवय लावणं गरजेचं आहे. काही मुलं काहीही चाळा न करता, काहीही न खाता पिता तीस मिनिटं एका जागी स्थिर बसायचंही विसरली असतील याचीही जाणीव पालक व शिक्षकांनी ठेवून त्याच प्रकारे त्यांना वागणूक द्यावी आणि तशीच अपेक्षा ठेवावी म्हणजे आपल्याला अपेक्षाभंगाचं दु:ख नको आणि त्यांची समायोजनासाठीची त्रेधाही नको.

     हा असा काळ आहे की जो पालक शिक्षकांच्या समन्वयाची कसोटी पाहणारा आहे. आज पालकांनी प्रथमत: शाळा ही मुलांच्या विकासातील महत्त्वाचा घटक आहे हे मान्य केलं पाहिजे बरोबरच शाळेवर पूर्ण विश्वास दाखवला पाहिजे आणि शाळेमध्ये मुलांच्या जपणुकीसाठी जे काही कार्यक्रम, उपक्रम किंवा उपाय योजले जातील त्यासाठी मदतीचा हात पुढे करण्याची सकारात्मकता दाखवली पाहिजे. यासाठी प्रामुख्याने समजून घेतलं पाहिजे की शाळा ही आपल्या पाल्याला उद्दिष्टाधिष्ठित अनुभूती देणारी जागा आहे.  जीवनाच्या शाळेत अनुभव तर जागोजागी मिळत असतात पण शाळेत दिले जाणारे अनुभव हे सहेतूक आणि आपल्या बाळाला योग्य दिशा दाखवणारे असतात. गेल्या काही वर्षांमध्ये पालकांनी शाळेबाबत अविश्वास दाखविण्याच्या वृत्तीमध्ये वाढ झालेली दिसत होतीच आता जर का तसं केलं तर त्यामुळे मुलं त्याचंच अनुकरण करतील आणि ते त्या मुलाच्या शिक्षणात नकळत बाधा आणू शकतं. कारण ऑनलाईन शिक्षण आता जरी सुंदर वाटत असेल तरी कला, क्रीडा, विज्ञान, कार्यानुभव, गणित यांसारख्या विषयांमध्ये कृतीयुक्त आणि गटांमधील शिक्षणावर भर असतो आणि हे काही ऑनलाईन शिक्षणातून साधलं जाणार नाही बरोबर माणूस हा समाजशील प्राणी आहे आणि मूल हे माणूस आहे म्हणून त्याला समवयस्कांचा सहवास, त्यांच्याशी भावबंध यांचीही गरज असते ती योग्यरितीने भागवण्याचे काम शाळा करते. यांतील योग्यरितीने हा शब्द खूप महत्तवाचा आहे. कारण समाजातही टोळकी निर्माण होतीलच की शाळा नसेल तर किंबहुना तशी होताहेतच आणि ती घातक ठरताहेत हे दुर्दैव नाकारून चालणार नाही.

     कोरोना काळात माणूस हा समाजशील प्राणी आहे हे पुन्हा एकदा नव्याने अधोरेखित झाले अगदी विलगीकरणातही समाजाची मदत लागलीच आणि समाजापासून दूर घरात बसा असं म्ळटल्यावर लोक घुसमटून गेले हेही आठवावं लागेल आणि सामाजिकरण हे महत्त्वाची गोष्ट आहे हे मान्य करून शाळा हे सामाजिकरणाचं महत्त्वाचं केंद्र आहे हे जाणून घेत मुलांना परत नव्याने शाळेशी जोडण्यासाठी सर्व समाजानं एकत्रितपणे प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे.

     शाळा सवयीची आणि सरावाची बनण्यासाठी आता शिक्षक पालक यांनी कसोशीने आणि असोशीने प्रयत्न करणं गरजेचं आहे. पहिल्यांदा शाळेत मन रमवणं आणि बरोबरच सामाजिक अंतरासारखे नियम पाळण्याची सवय अंगी भिनणं ह्या दोन्हीबाबत दोघांनीही दक्ष असलं पाहिजे तरच ते साध्य होईल. आता काय करायचं आहे याबाबत माझ्या एका शिक्षक मित्रांनी सांगितलेली एक छोटीशी गोष्ट मार्गदर्शक आहे. एक आई आपल्या मुलाला बरोबर घेऊन रस्त्यावरुन निघालेली होती. ती त्याला वागणुकीच्या बाबतीतल्या काही सूचना देत होती पण त्याचं त्याकडे लक्ष नसल्याचं तिला दिसतं. मग ती एक उपाय करते जाताजाता सहज रस्त्याच्या बाजूचं अगदी छोटं रोपटं दाखवत मुलाला म्हणते अरे, ते उप्टून टाक बरं, मुलगा ते चटकन उपटतो. जरा पुढे गेल्यावर त्यापेक्षा थोडं मोठं रोपटं दाखवत म्हणते, हे उपट. मुलगा थोडा जोर लावत ते उपटतो. अजून पुढे गेल्यावर अजून थोडं मोठं रोप उपटायला सांगते, मुलगा पूर्ण ताकद लावत अर्धवट उपटतो अजून जरा पुढे गेल्यावर मुलाला म्हणते अरे, ते समोरचं झाड उपट जा. तो म्हणतो अग आई कसं शक्य आहे तो तर वृक्ष आहे मुळं रोवून उभा राहिलेला. तेव्हा आई म्हणते की सवयींचंही असंच आहे नको त्या सवयी पूर्ण रुजण्याआधीच काढून टाकायच्या. तेच आपल्या पाल्य आणि विद्यार्थ्रूांबाबत करण्यासाठी ……गेट, सेट….रेडी……..

  • – मेघना जोशी, 9422967825 

Leave a Reply

Close Menu