थकले रे…!

      कोरोना महामारीच्या काळात आपल्या सगळ्यानांच नवनवीन आव्हानांना सामोरं जावं लागलं. काहींना प्रत्यक्ष आजाराचा सामना करावा लागला तर काहींना बेरोजगारीचा. मात्र ह्यात एक गट असाही आहे की, ज्यांचं काम हे सगळे महिने चालू होतं. काहींचं तर वाढलही. मग ते आरोग्य सेवेतील, शासकीय सेवेतील कर्मचारी असतील, काही शिक्षक असतील किवा आयटी क्षेत्रात काम करणारे लोक असतील. ह्या लोकांसमोर नव्याने कामांचा डोंगर उभा राहिला. अशा काळात कामाचा ताण अतिशय वाढणं आणि त्यामुळे पूर्णतः थकून जाणं हे खूपच साहजिक आहे. मात्र काहीवेळा हे गंभीर असू शकत. यालाच इंग्रज Burnout असं म्हणतात. आजच्या लेखात याच्याविषयी थोडंसं…

        हर्बर्ट फ्रॉईडनबर्गर या मानस शास्त्रज्ञाने साधारण १९७० मध्ये ही संकल्पना मांडली. Burnout होणे म्हणजे शारिरीक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या पूर्णपणे थकून जाणे. जेव्हा एखादी व्यक्ती दीर्घकाळासाठी आणि तीव्र अशा तणावाखाली वावरत असेल तर ती व्यक्ती Burnout  व्हायची शक्यता वाढते. खरंतर हा Burnout आयुष्याच्या कुठल्याही क्षेत्रात होऊ शकतो. पण ब-याचदा तो कामाच्या बाबतीत होताना दिसतो. आता जागतिक आरोग्य संघटनेने देखील Burnout Syndrome  असं म्हणून त्याचा स्वतंत्र उल्लेख केलाय. म्हणजे ह्याचं प्रमाण आणि तीव्रता किती वाढली असेल याचा अंदाज करा. नुसत्या कामाच्या लांब वेळा किवा अति काम याने व्यक्ती Burnout होते असं नाही. त्या कामातून सुद्धा जर व्यक्तीला विश्रांती घ्यायला वाव मिळत असेल किंवा त्या कामातून समाधान मिळत असेल तर अशी व्यक्ती Burnout व्हायची शक्यता कमी असते. ह्याची सुरुवात खरंतर सतत स्वतःला सिद्ध करत राहण्याच्या गरजेतूनहोते. यामुळे व्यक्ती अधिकाधिक काम ओढवून घेते, स्वतःच्या गरजांकडे दुर्लक्ष करायला लागते आणि मग त्यात गुरफटत जाते. मग मग ह्या कामाचा ताण वाढत जातो, एकटेपणा, निराशा वाढत जाते आणि हे सगळं असह्य होऊन व्यक्ती Burnout होते. कोलमडून पडते. आजूबाजूच्या परिस्थितीवर आपलं काहीच नियंत्रण नाही असं वाटणं, स्वतःला न पटणारं न आवडणारं काम करावं लागलं, कामामागे काहीच उद्देश न सापडणं किवा पुरेसा पाठींबा, आधार नसणं ही कारणसुद्धा व्यक्तीला Burnout पर्यंत पोचवू शकतात.

स्वतःभोवती घेता गिरक्या, अंधपणा की आला

तालाचा मज तोल कळेना, सादही गोठून गेला

अंधारी, मी उभी आंधळी जीव जीवना भ्याला

            असंच काहीस या Burnout मध्ये होतं. कमालीचा मानसिक आणि शारिरीक थकवा, कामात रुची न वाटणं उलट कामाचा तिटकारा / धिक्कार वाटणं, सतत चिडचिड होणं, कार्यक्षमता कमी होणं, निराश वाटणं, इतरांपासून स्वतःला तोडणं, कामाचा अतिशय कंटाळा येणं, सतत काम सोडण्याविषयी किवा काम नसत तर ह्याविषयी विचार करत राहणं, झोप आणि भूकेवर परिणाम होणं ही Burnout ची काही प्रमुख लक्षणं आहेत. आपल्यापैकी ब-याच जणांना शनिवारी रात्री हे सगळं वाटतं असतं पण त्याला Burnout म्हणता येणार नाही. Burnout झालेली किवा त्या टप्प्याजवळ पोचलेल्या व्यक्तीला हे असं दीर्घकाळ वाटतं असतं. तात्पुरते उपाय करुन हा थकवा कमी होत नाही आणि ह्या सगळ्याची तीव्रताही अधिक असते.

            सध्याच्या काळात व्यक्तीला सतत बदलत्या आव्हानांना सामोरं जावं लागतंय आणि याचा वेग खूप जास्त आहे. कधी घरी बसून काम करावं लागणे, कधी वेळा बदलणे, कधी पगार कपात होणे तर कधी व्यक्ती सतत कामासाठी उपलब्ध असण्याची अपेक्षा केली जातेय. जे लोक घरुन काम करतायत त्यांना घर हीच कामाची जागा बनल्यामुळे कामाच्या बाबतीतल्या काही मर्यादा किंवा सीमारेषा पाळणं अवघड होऊन बसलंय. ह्या सगळ्यात ज्या गोष्टींनी एरवी थोडा विरंगुळा मिळतो किवा इतर सहका-यांशी बोलून मोकळं करता येत त्याचेही फारच थोडे पर्याय उपलब्ध आहेत. या सगळ्यामुळे एरवीच्या परिस्थितीत केलेल्या कामाने येणा-या ताणापेक्षा सध्या जास्त ताण येतोय. मात्र त्यामुळे सध्या Burnout होणं टाळता येणार नाही किवा त्याचा सामना करता येणार नाही असं अजिबातच नाही.

     Burnout च्या टप्प्याच्या आपण खूप जवळ आलोय हे जर वेळीच ओळखता आलं तर त्याहून उत्तम काही नाही. त्यामुळे अशी कुठली लक्षण आपल्यात किंवा आपल्या प्रियजनांमध्ये दिसतायत हे ह्यावर थोडं लक्ष ठेऊया. अशावेळी प्रतिबंधात्मक उपाय करणं सोपं जातं. पण तसं लक्षात आलं नाही तरीही  Burnout मधून बाहेर पडणं शक्य आहे. अशावेळी कामाच्या बाबतीत काही कडक नियम स्वतःला घातले गेले पाहिजेत आणि त्याचा अवलंब केला गेला पाहिजे. उदा. दिवसातून तास ठरवून विश्रांतीचा वेळ घेणं किंवा रात्री अमुक एका वेळेनंतर फोन, मेल्स न बघणं. आता आपण म्हणाल हे करणं सोपं नसतं आणि मला ते मान्यही आहे. पण त्यातल्या त्यात आपल्याला काय शक्य आहे ते करायला सुरुवात करायला हवी आणि (अशी लक्षण दिसायला लागल्यावर तरी) आपला प्राधान्यक्रम नेमका काय आहे याचा थोडा विचारही केला गेला पाहिजे. स्वतःची मानसिक आणि शारिरीक काळजी घेण्यासाठी झोप, खाणं याकडे लक्ष देणं, व्यायाम, ध्यान करणं, विरंगुळ्याच्या, मनाला आनंद होतील अशा गोष्टी करणं.

          कुटुंबियांसोबत-मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवणं, त्यांच्याशी शक्य असल्यास बोलून मन मोकळं करणं व आवश्यकता वाटल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणं. या गोष्टी केल्या गेल्या तर Burnout रोखणं किंवा त्यातून बाहेर येणं सहज शक्य आहे. आपल्या धावत्या आयुष्यात आपण सगळ्यांनीच कधीतरी काही काळासाठी तरी आपला वेग थोडा कमी करायला कधीतरी वेगळ्याच गाडीतून प्रवास करायला आणि वेगळ्याच स्टेशनवर उतरून निवांतपणे भटकायला शिकायला हवंय. असं झालं तर आपल्यावर थकण्याची वेळच येणार नाही!      -अतिथी-भक्ती करंबेळकर,  मोबा. ९९२०८१५४०७

 

Leave a Reply

Close Menu