अशा लाल मातीत जन्मास यावे
जिचा रंग रक्तास दे चेतना
इथे नांदते संस्कृती भारताची
घरातून दारात वृंदावना
एक सुखद अशी पहाट. पाखरांचा चिवचिवाट. दुरून जाणाऱ्या बैलगाडीच्या घुंगरांचा खुळखुळाट. गोठ्यातून ऐकू येणारी गाईच्या दुधाची चुळ्ळ… अशी धार. ताज्या शेणानं सारवलेलं सुंदरसं खळं आणि त्यावर रेखाटलेला ‘कणा’. खळ्यात जावून पहावं आणि दंग होऊन जावं, अशी काश्मिरातल्या बर्फवृष्टीची जाणीव करून देणारं इथलं मंद गहिरस धुकं आणि धो धो पाऊस. असा हा स्वर्गीय अनुभव घ्यायचं म्हटलं, तर क्षणार्धात एकमेव ठिकाण डोळ्यासमोर उभं राहतं. ते म्हणजेच कोकण. आणि जर जन्मच कोकणात झाला असेल, तर दुधात साखरच. आपण इथे अशा जगात वावरत असतो जिथे संस्कृती नांदते. माणुसपण ओसंडून वाहत असतं. खरंतर कोकण म्हणजे धरतीवरला स्वर्गच जणू!
पण असे कितेक गोडवे गायले, स्तुतीसुमने उधळली, तरिही या कोकणात कमालीची अस्वस्थता भरून राहिलीय, हेही तितकंच खरं. वरवरून पाहिल्यास सारं काही मनमोकळं, मनासारखं चाललेलं दिसून येतं. पण दिसतं तसं नसतं. खासकरून इथला तरुण वर्ग खुप मोठ्या अस्वस्थतेच्या गर्तेतून प्रवास करतोय. पण एवढं अस्वस्थ होण्यासारखं काय चाललाय इथे? इथल्या तरुणाईला कशाची अनिश्चितता वाटतेय? का असुरक्षित वाटतंय? यांच्या अस्वस्थतेचं मूळ दडलंय कुठे? या साऱ्या कारणांचा तपशिलवार अभ्यास केल्यावर सत्य थेट नजरेसमोर उभं राहतं.
कोणत्याही देशाची खरी संपत्ती ही तिथली तरुणाई असते आणि भारत तर ‘तरुणांचा देश’ म्हणून ओळखला जातो. पण आपण आता केवळ कोकणचा विचार केला, तर असं दिसून येतं, की इथे तरुणांची संख्या प्रौढ नागरिकांपेक्षा कमीच आहे. याला कारण काय? तर याचं प्रमुख कारण आहे ‘रोजगार’. ‘कोकणात हवा तसा रोजगार उपलब्ध नाही’, या एका कारणास्तव मोठा तरुणवर्ग मुंबई, पुण्यासारख्या शहरांकडे वळतो आणि काही तुटपुंज्या पगारावर, कुठल्यातरी झोपडपट्टीत का असेना, पण ‘सेटल’ होतो. मग गावाकडे उरतं फक्त एक डागळलेलं घर आणि खंगलेले दोन जीव. इथून अस्वस्थता मान बाहेर काढते. ‘शहरात गेलेली आपली पिलं कशी असावीत’ या विचारानं गावात अस्वस्थता वाढते. तर ‘गावाकडील आपलं ‘घरटं’ बरं असेल ना’ या विचारानं शहरांतील पिलं गुदमरु लागतात. अनेकदा शैक्षणिक गुणवत्ता असूनही नोकरी मिळत नाही. तर कित्तेकदा शिक्षण घेणंच परवडत नाही. मग नोकरीची अनिश्चितता, भविष्याची असुरक्षितता यामुळे ही तरुणाई बिथरून जाते. काय करावं काहीच सुचत नाही. यामुळे वैफल्यग्रस्तता वाढत जाते आणि याचा परिणाम म्हणून व्यसनाधिनता जन्म घेते. अशी अनेक मुलं इथल्या वाडीवाडीत, गल्लीत, नाक्यावर दिसून येतात. मजुरीवर जावून काय मिळेल ते काम करणं आणि आपला चरितार्थ चालवणं, इतकंच त्यांच्या जीवंत असण्याचं मर्म आहे.
World Bank चा एक अहवाल सांगतो, की भारतातील आठ दशांश टक्के लोक बेरोजगार आहेत. इथून बेरोजगारी ही भयंकर कल्पना डोळ्यासमोर येते. पण या बेरोजगारीचा विसर पडण्यासाठी ‘4G’ च मायाजाल खुप मोठी भूमिका पार पाडतं. ‘PubG’ ज्याचा पूर्ण अर्थ ‘PlayerUnknown’s Battlegrounds’ असा होतो, त्याच्या जाळ्यात कित्तेक ‘सैनिक’ दिवसभर अडकलेले असतात. इथे जगण्याचाच ‘गेम’ झालाय आणि आपण आभासी जगात वावरतोय, हेही समजत नाहीय. कित्तेकजण राजकारण्यांच्या पाठीमागे लागून आयुष्याचा पातेरा करतात. ‘हा नेता आमचा आहे. आम्हाला रोजगार देणार.’ या आशेवर ‘हातात’ ‘झेंडा’ घेऊन ‘वेळ’ पडल्यास ‘चिखलातूनही’ धावणारे हे ‘इंजिनाचे डबे’ आणि त्या धुराळ्यात ग्रासलेला इथला गावनगाव. पण यांना जर रोजगार दिला, तर या नेत्यांमागे फिरायला माणसं कुठून आणणार, हे यांना कुठे माहित? प्रत्येक निवडणुकीत भावनांचा, कोकणच्या अस्मितेचा मुद्दा पुढे केला जातो आणि मतं मिळवली जातात. पण निवडून आल्यानंतर ‘TTMM- तू तुझं मी माझं.’ अस्वस्थ असलेला हा तरुणवर्ग मग केवळ प्रश्नचिन्ह घेऊन जगतो.
जेव्हापासून स्वतंत्र कोकण बोर्ड तयार झालाय, तेव्हापासून संपूर्ण महाराष्ट्रात तो अव्वल क्रमांक मिळवत आलाय. पण विचार केला, तर दहावी-बारावीनंतर ही मुलं जातात कुठं? करतात काय? तर अजूनही अनेकजणं एका चौकटीतच अडकून आहेत. ‘मला गावात राहायचं नाही. शहरात जायचंय. कुठेतरी 20-25 हजाराची नोकरी बघायची. रुम घ्यायची आणि मग छोकरी बघून लग्न करायचं. सुखात संसार करायचा.’ हेच मोठं स्वप्न. मग गावाकडची एक एकर जमिन विकून शहरात एक 1bhk room घेतला जातो. ज्या दूरदृष्टी असलेल्या माणसानं ती जमिन विकत घेतलीय, तो तिच्यातून लाखोंचं उत्पादन घेतो. ते बघून पश्चातापाची वेळ या तरुणांवर येते. शेतातलं सोनं न शोधल्यानं आता आपल्याच गावात उपरे होऊन जगायची वेळ कित्तेकांवर आलीय. पर्यटनातून बाजूचं गोवा राज्य जगात लोकप्रिय झालं, धनवान झालं आणि कोकण मात्र आहे तसाच पुरातन अवस्थेत रखडत राहिला. त्यातही कुणी काहीतरी प्रयोग करायचा प्रयत्न केला, तर भाऊबंदकी आडवी येते. वाडीवाडीतली खेकडा वृत्तीची माणसं पाय ओढू लागतात.
पण किती दिवस असेच अस्वस्थतेत जाणार? हे सारं बदलायचं असेल, तरुणाईने स्वतःच्या स्वप्नांसाठी, स्वतःच्या माणसांसाठी झटायला हवं. अस्वस्थतेच्या गर्तेतून बाहेर पडायचं हे सर्वांत मोठं साधन आहे. सर्वस्वी सरकारवर अवलंबून राहणं योग्य नाही. आपणंही विविध कौशल्य प्राप्त करायला हवीत. मोठी स्वप्न पहायला हवीत. कुणाचाही अंध भक्त न होता राजकारणाकडे पाहायला हवं. शेती, पर्यटन, लोककला, लोकसंस्कृती यांच्या आधारे काहीतरी innovation करायचा प्रयत्न करायला हवा. स्पर्धा परीक्षांकडे ‘डोळस’ होऊन पहायला हवं. खरं सांगायचं तर, इथल्या मुलांना स्पर्धा परीक्षांकडे पूर्णवेळ लक्ष देणं अनेकदा कठिण जातं. कारण कुटुंबाची स्थिती, वाढतं वय, निकालाची अनिश्चितता आणि ‘सेटलमेंट’ यामुळे अनेकदा स्पर्धा परीक्षा पूर्ण ताकदीनं देणं शक्य होत नाही आणि त्यावरच लक्ष केंद्रीत करूनही कुठेच नाव लागलं नाही, तर मग पश्चाताप करावा लागतो. अनेक चांगल्या संधी हातातून निसटून जातात. म्हणून plan B सोबत असणं गरजेचं आहे. सृजनाचा आविष्कार करण्याची ओढ सतत मनात पोसायला हवी. नाहीतर ‘रिकामं मन म्हणजे सैतानाचं घरं’ असं म्हणतात. अस्वस्थतेचं कारणंही इथेच दडलंय.
युवा असण्याचा खरा अर्थ हा प्राप्त परिस्थितीला नव्या, सर्जक पद्धतीने भिडण्याचा आहे. हेच तर ‘अत्त दीप भव’ म्हणणाऱ्या बुद्धापासून ते ‘मनासि संवाद’ करायला सांगणाऱ्या तुकोबांपर्यंत सारेजण सांगताहेत. म्हणूनच अपयशाने खचून न जाता पुन्हा उभं राहणं गरजेचं आहे. जगाचा केंद्रबिंदू व्हायचं स्वप्न पाहणाऱ्या भारतातील ‘कोकण’ नावाच्या एका सुपिक आणि धनवान प्रदेशानं किंवा अजून कुठल्याही भागानं स्वयंप्रकाशित व्हायला हवं आणि हे सर्वस्वी इथल्या तरुणाईवर अवलंबून आहे. त्यामुळे लवकरात लवकर ही अस्वस्थता झटकवून कामाला लागूया आणि नवा कोकण, नवा महाराष्ट्र, नवा देश घडवूया. ‘The show must go on…’
-श्रेयश अरविंद शिंदे. 9404917814