जत्रा

वेगवेगळ्या समाज माध्यमांवर आजच्या वेंगुर्ल्यातील जत्राअसा मेसेज येऊन धडकू लागले आहेत. त्यामुळे शरीराने वेंगुर्ल्यापासून खूप दूर असलो तरी वेंगुर्ल्यातील विविध देवस्थानांचे जत्रोत्सवांची माहिती मिळू लागली. असं म्हणतात, ‘देवाक खयसूनय हात जोडलो तरी आपलो नमस्कार देवाक बरोबर पोचता.पण तरीही इकडे जीवाची घालमेल सुरु होते. २४ वर्षापूर्वी नोकरीनिमित्त वेंगुर्ला सोडून मुंबई/नवी मुंबईत स्थायीक झालोय, त्यामुळे एखाद-दुसरी जत्रा सोडली तर गेल्या २४ वर्षात जत्रेला प्रत्यक्ष हजर राहता आले नाही. पण आपले एक बरं आहे आठवणींच्या हिंदोळ्यावरस्वार व्हायचं आणि वर्तमानात ज्या गोष्टीपासून दूर आहोत त्याची कमतरता भासू नाही द्यायची. आतातर किरातमुळे तुम्हालाही यात सहभागी करुन घेता येतय ही अजून एक आनंदाची बाब.

     त्याकाळी सोशल मिडियापेक्षा आज कुठल्या देवस्थानची जत्रा आहे याची बातमी वेगाने धडकायची. वेंगुर्ला शहरातील जत्रांची सुरुवात आणि समारोप हा श्री देवी सातेरीच्या जत्रेने होतो ही खास बाब. तसं बघायला गेले तर वेंगुर्ल्यातील सर्वच देवस्थानच्या जत्रांना सर्वच ज्ञातीबांधवांची उपस्थिती असते. परंतु तरीही अनेक ज्ञातीबांधवाच्या जत्रा ठरलेल्या असतात. मग अमुक अमुक देवस्थानाची जत्रा आहे हे कळल्यावर त्या अनुषंगाने घरी पाहुण्यांचे आगमन सुरु होते. संध्याकाळी नटून थटून, नवीन नसले तर ठेवणीतले कपडे घालून मंदिराकडे पाऊले वळू लागतात.

     यावर्षी लॉकडाऊनमुळे मर्यादा आल्यात. अन्यथा कोकणातील जत्रांचे चाकरमान्यांना खूप आकर्षण असते. जत्रेची तारीख बघून रेल्वेची आरक्षणे फूल्ल होऊ लागतात. धडाधड सुट्टीचे अर्ज खरडवून सायबाच्या टेबलवर ठेवून रजा पास होण्याची वाट न बघता चाकरमानी गावी दाखलसुध्दा झालेला असायचा. आंगणेवाडीची जत्रा म्हणजे रेल्वेचे आरक्षण मिळणे कठीणच. एका कार्यालयात मी कार्यरत असताना मला कोकणातील जत्रांबद्दल मुंबईकरांचे असलेल्या आकर्षणाचा खूप वेगळा अनुभव आला होता. न चुकता या कार्यालयातील काही कर्मचारी दरवर्षी आंगणेवाडीच्या जत्रेला जायचे. ते सुध्दा विमानाने. गोव्याला विमानाने जाऊन गोवा आणि आंगणेवाडीची जत्रा असा त्यांचा दरवर्षीचा ठरलेला कार्यक्रम असायचा, कदाचित अजूनही चालू असेल. यात वेगळेपणा असा होता की, यातील बहुतांशी बरेच कर्मचारी हे कोकणातले नसायचे. पण त्यांना कोकणाबद्दल आणि कोकणातील जत्रेबद्दल एक वेगळीच आत्मियता असायची.

     माझा बालपणीचा जत्रांचा अनुभव हा वेंगुर्ला शहरातील काही मोजक्याच देवस्थानापुरता मर्यादीत आहे. अगदी पायी चालत जाऊ शकतो एवढ्यापर्यंतच मी जत्रांना उपस्थिती दाखवल्याचे आठवते. श्रीरामेश्वर, गावडेश्वर, मानसीश्वर, पूर्वस, सातेरी, तांबळेश्वर, रवळनाथ अशा काही मोजक्याच देवळात मी जत्रांना उपस्थित होतो, ते सुध्दा फक्त संध्याकाळच्या वेळी. त्यामुळे जत्रेच्या दिवशी देवळात संपूर्ण दिवस काय काय कार्यक्रम असतात याबद्दल मला बरीच कमी माहिती आहे. सर्वसाधारण जनतेप्रमाणे संध्याकाळच्या वेळी जत्रेला न चुकता मात्र जायचो. गाभा-यात दर्शनासाठी खूप गर्दी असेल तर देवाला बाहेरुनच नमस्कार. अर्थात त्यावेळी गर्दी म्हणजे तासनतास दर्शनासाठी रांगा नाही लागायच्या. आईबरोबर गेलो असेल तर देवाला केळी ठेवण्यासाठी त्या गर्दीत थोडावेळ मिसळायचो. परंतु मित्रांबरोबर गेल्यावर देवाला केळी वगैरे काही ठेवण्याचा प्रकार नसायचा. फक्त नमस्कार करुन बाहेर पडायचे.

     मंदिरात जाताना, ‘केळी घ्या रे पोरांनूअसे शब्द कानावर पडायचे, त्याकडे साफ दुर्लक्ष केले जायचे. मात्र आईबरोबर देवळात जाताना देवाला ठेवायला केळींची खरेदी केली जायची. सोबत जास्वंदाची फुले. देवाला सोनयाळ केळीच ठेवली जायची, अजूनही जेव्हा मी वेंगुर्ल्याला अथवा आसपासच्या कोकणातील देवळात जातो तेव्हा भावीक आवर्जून देवाला सोनयाळ केळीच ठेवताना दिसतात. घरी जाताना आई पदरात हा केळीचा प्रसाद घेऊन यायची. मग त्या छोट्याशा केळ्याचा तोडून सर्वांना प्रसाद वाटला जायचा. केळीबरोबर जत्रेतून घरी जाताना प्रत्येकाच्या हातात हमखास दिसते ती खाज्याची पुडी. जरी वेंगुर्ल्यात वर्षभर शिरसाट, चंदू हलवाई, गांधी मिठाईवाला यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे खाजे विकत मिळत असले तरी जत्रेला गेल्यावर खाज्याच्या पुडीशिवाय घरी परतायचे नाही हा वेंगुर्लेकरांचाशिरस्ता.

      वेंगुर्ल्यातली जत्रा म्हणजे, देवळाचा परिसर वेगवेगळ्या स्टॉलने देवळांचा परिसर फुलून जायचा. लहान मुलांसाठी खेळण्यांचे स्टॉल, त्यात मिळणारी प्लॅस्टीकची खेळणी आणि त्यासाठी मुलांनी बापाकडे धरलेला हट्ट, हे चित्र मात्र जागोजागी दिसायचे. ब-याचदा मुलांचे हट्ट पुरवले जायचे, अगदीच नाहीतर पेपारा (शिट्टी) तरी घेऊन दिली जायची. काही मुलांनी खूपच हट्ट केला तर आईबापाचे पाठीवर धपाटे पडायचे. त्यामुळे पोरांच्या जोरात रडण्याच्या आणि पेपा-यांचा कानठळ्या बसवणारा आवाज याने या स्टॉलजवळ गोंगाट असायचा. जत्रेच्या दिवशी मंदिराच्या परिसरात पाऊल टाकताच पेपा-यांचा आवाज, विविध स्टॉलवरील विक्रेत्यांनी ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी घातलेली साद, देवळातील ढोल किवा तत्सम वाद्यांचा आवाज, घंटा यांच्या आवाजाने सर्व परिसर भरुन गेलेला असायचा. या आवाजात जत्रेत ब-याच दिवसांनी  भेटलेल्या परिचितांशी गप्पा रंगायच्या.

     खाज्यांच्या स्टॉलवर ग्राहकांची झुंबड उडालेली असायची. साखरेचा, गुळाचा, आल्याचा खाज्याची पुडी बांधून उरलेले पैशे ग्राहकांना देण्यात दुकानदारांची तारांबळ उडालेली असायची. त्या मिठाईंच्या दुकानाच्या समोरुन जाताना माझे मन दुकानात लटकणा-या गाठल्यांकडे बघून विशेषतः कोंबड्यांच्या आकाराच्या लाल पिवळ्या रंगातील साखरेच्या पदार्थांकडे बघून ते विकत घेऊन खाण्याचा मोह नाही आवरायचा. परंतु रिकामी खिश्यांचा विचार करता त्यांची किमत सुध्दा विचारायची कधी हिमत नाही झाली. आता जेव्हा कधी जत्रेला जायचा योग येईल तेव्हा ही मिठाई न चुकता खाईन म्हणतो, बाकी वाढलेल्या शुगरचा काय ता देव रामेश्वर बघून घेयत.पण अजूनही जत्रेत ही मिठाई मिळत असेल का? आम्हाला त्यावेळी परवडायची ती मिठाई म्हणजे खटखटला.नाही विसरु शकत त्या खटखटल्याची चव. बाकी चहाच्या टप-या, वडापाव, कांदा भजीचे स्टॉल सोबत ऊसळपावावर ताव मारणारे ग्रामस्थ दिसायचेत.

     मंदिरात गेल्यावर मंदिराबाहेर काढलेल्या चपलांकडे कितीही लक्ष असले तरी चप्पल कधी गायब झाले हे कळायचे देखील नाही. संध्याकाळी जत्रेत फिरुन झाल्यावर घरी जाऊन जेवून येऊन पुन्हा रात्री दशावतारी नाटकासाठी बायकापोरांसह वेंगुर्लेकरांचा देवळाकडे मोर्चा वळायचा. रात्री खूप उशीरा सुरु व्हायचीत ही नाटके, त्यामुळे एखाद दुसराच दशावतारी नाटकाचा प्रयोग मी पाहिला असेल. पार्सेकर, बाबी कलिगण अशी काही नावं ऐकायला मिळायचीत. सुपरस्टार असायचेत हो हे कलाकार आमच्यासाठी. आम्ही पोरं ही नाटकं बघून जत्रांच्या कालावधीत आमचे खेळही तेच असायचे. थोबाडं रंगवून पाठीला चादरी बांधून या..या.. नगरीत पाऊल टाकताचअसे डायलॉग फेकत कुठेतरी निर्जन ठिकाणी जाऊन दशावतारी नाटक करायचो. खरी मजा यायची ती लढाईचा सीन करताना. जत्रेत बघितलेल्या दशावतारी नाटकातील लढाईच्या नाटकाची नक्कल करताना कुल्ले मटकत उड्या मारत झीण झीण करत नाचून अक्षरशः धुमाकुळ घालयचो आम्ही पोरं.

    जत्रेच्या काळातील एक अजून आठवण म्हणजे भागायला म्हणून सांगत जाणार मनुष्य. तरीही रात्री पटावर धाड पडायची आणि दुस-या दिवशी रात्री झालेल्या पळापळीचे किस्से गावभर रंगवून सांगितले जायचे. असो जत्रा असायची एक दिवसाची पण त्यात घडणा-या गंमतीजंमती सारख्याच असायच्या, ज्या पुढे महिनाभर रंगवून सांगितल्या जायच्या. थंडीच्या दिवसात पाठोपाठ येणाया जत्रा यात सर्वकाही विसरुन आनंदाने रमणारे वेंगुर्लेकरनाही विसरता येत.

संजय गोविंद घोगळे (८६५५१७८२४७)

 

Leave a Reply

Close Menu