२० अर्धगोलाकार शेड व २ हार्डनिंग शेडचे उद्घाटन

कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.संजय सावंत यांनी वेंगुर्ला येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्राला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी कृषी तंत्रज्ञान व माहिती प्रशिक्षण केंद्र नूतन इमारतीच्या कामाची पाहणी केली व सध्या सुरु असलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. त्यानंतर त्यांनी चांदा ते बांदा योजनेअंतर्गत या संशोधन केंद्रावर फळपीक रोपवाटिका बळकटीकरणकरिता प्राप्त अनुदानातून बांधलेल्या २० अर्धगोलाकार शेड व २ हार्डनिंग शेडचे उद्घाटन केले. तसेच आंबा प्रक्षेत्रात भेट देऊन माहिती घेतली. काजू प्रक्षेत्रात भेट देऊन काजू मधील खोड किडा नियंत्रणातील सुरु असलेल्या संशोधनाची पाहणी केली व पुढे अशाप्रकारे खोड कीड नियंत्रणाकरीता संशोधनावर भर द्यावा अशी उपस्थिताना सूचना दिली. येथील फळ पक्रिया प्रयोगशाळा, पिक चिकित्सालय प्रयोगशाळा, जैविक नियंत्रण प्रयोगशाळा व मृदा परीक्षण प्रयोगशाळेला भेट देऊन पाहणी केली. यावेळी प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ.बी.एन.सावंत, रोग शास्त्रज्ञ एम.बी.दळवी, कीटक शास्त्रज्ञ ए.वाय. मुंज, विजय देसाई, डॉ.आर.सी.गजभिये, डॉ.कदम, डॉ.देशमुख आदी उपस्थित होते.

      वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्र येथे सुरु असलेल्या कृषी तंत्रज्ञान व माहिती प्रशिक्षण केंद्र हे कोकणातील दुसरे व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले केंद्र असून ज्या मार्फत येथील शेतक-यांना कृषीविषयक मार्गदर्शनाचे दालन उपलब्ध होईल असा विश्वास कुलगुरु डॉ. संजय सावंत यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Close Menu