चौथा स्तंभ

          लोकशाहीच्या चार स्तभापैकी वृत्तपत्रहा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो. गेल्या काही वर्षापासून या चौथ्या स्तंभासमोरच अनेक आव्हाने उभी आहेत. मध्यंतरी न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी आपले गा-हाणे पत्रकार परिषद घेऊन मांडले होते.

          ६ जानेवारी  हा पत्रसृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मरण करण्याचा दिवस. १८३२ साली बाळशास्त्रींनी दर्पणनावाचे वृत्तपत्र काढले. तोच दिवस पत्रकार दिनम्हणून साजरा होतो. सर्वत्र विविध कार्यक्रम घेऊन जांभेकर यांना अभिवादन केले जाते.  कोकणातील पोंभूर्ले येथे त्यांच्या जन्मगावी स्मारक उभारण्यात आले असून दरवर्षी पत्रकार दिनाचा सोहळा आणि राज्यातील पत्रकारांचा गौरव येथे होतो. सिधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय ओरोस येथेही असेच स्मारक उभारले जात आहे. या गोष्टी आवश्यक आहेतच. परंतु वृत्तपत्र सृष्टीची वाटचाल आणि निर्माण झालेले प्रश्न याबाबत कालानुरुप चितन व्हायला हवे.

       गेल्या वर्षभराचा कोरोना महामारीचा काळ पाहिला तर वृत्तपत्रांची स्थिती काय झाली हे समजून येते. या काळात मोठ्या वृत्तपत्रांच्या आवृत्त्या बंद करण्याची वेळ आली. आजही चौथ्या स्तंभाला अस्तित्वाची लढाई करावी लागत आहे. या काळात अनेक पत्रकारांच्या नोक-याही गेल्या. दरवर्षी मोठ्या प्रमाणात निघणारे दिवाळी अंक निघू शकले नाहीत. जे निघाले त्यांना मोठी कसरत करावी लागली. छट्या वृत्तपत्रांसाठी/नियतकालिकांसाठी तर हे वर्ष आव्हानाचे गेले. शासनाची धोरणे हा तर वेगळ्या चर्चेचा मुद्दा आहे. उद्योगधंदे बंद पडल्याने जाहिरातींवर मर्यादा आल्या. जाहिरात हाच छोट्या-मोठ्या वृत्तपत्रांचा आधार आहे. परंतु उद्योजकांनाच अस्तित्वाची लढाई करावी लागत असल्याने समाजाचे प्रश्न मांडणा-या वृत्तपत्रांनासुद्धा हा काळ कठीण गेला. आजही आव्हाने संपलेली नाहीत. उलट वाढत आहेत.

       स्वातंत्र्यपूर्व काळात फक्त राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करुन प्रत्येकात स्वातंत्र्याचे अंगार फुलविण्याची  महत्त्वाची भूमिका वृत्तपत्रे पार पाडत. आता देशाच्या-राज्याच्या विकासाचे मुद्दे, विविध क्षेत्रातील प्रश्न, आव्हाने, शासन-प्रशासनाची भूमिका अशा प्रश्नांची मालिका असली तरी प्रत्येक प्रश्न संवेदनक्षम होत असल्याने मुक्तपणे लिखाण करण्यावर मर्यादा पडत आहेत. शासन-प्रशासनावर अंकुश ठेवण्याचे काम वृत्तपत्रांचे आहे. खरेतर पत्रकारिता हा विषय सर्वसामान्यांशी निगडीत असल्याने आपल्या न्याय्य हक्काचे व्यासपीठ म्हणून आजही कित्येकजण वृत्तपत्रांकडे अपेक्षेने पहातात. कारण वर्तमानपत्रात प्रसिद्ध होते ते सत्य असते असे मानणारा आजही एक वर्ग समाजात आहे. पण आजचे चित्र काय दर्शवते? कोणाच्या दबावाखाली वृत्तपत्रांची निर्भिडता हरवत चालली आहे.   लोकशाहीसाठी वृत्तपत्रांचा अंकुश हवाच. या सर्व गोष्टीचे बदलत्या समाजकारण-राजकारणाचे कंगोरे समजून घेतले पाहिजे. सामान्य कष्टकरी माणसाचे जगणे अवघड झाले आहे. त्याच्या व्यथा या माध्यमातून अधोरेखित केल्या पाहिजेत. वास्तव चित्रण समाजमनाचे प्रतिबिब वृत्तपत्रातून दिसले पाहिजे. हे घडते काय याचा विचार मात्र करण्याची वेळ आली आहे कारण आजची पत्रकारिता ही समाजाभिमुख न रहाता व्यवसायभिमुख होत आहे. सोशल मिडीया आणि इलेक्ट्राॅनिक मिडीया यांच्याशी स्पर्धा करताना आपण जांभेकर यांचा वारसा जपत आहोत का? हे आपण अंतर्मुख होऊन स्वतःलाच प्रश्न विचारला पाहिजे. बातमीच्या मूळाला राजकारण अर्थकारण यांच्यापासून वेगळं ठेवत निखळ बातमीचे स्वरूप आपण जोपर्यंत ठेवत नाही तोपर्यंत बाळशास्त्रींचे नाव घेण्याचा, त्यांचा जयजयकार करण्याचा आपल्याला अधिकार नाही. पण आपण हे चितन करणार आहोत का? हाच खरा प्रश्न आहे.

Leave a Reply

Close Menu