संपर्क अधिका-यांनी दिल्या आवास योजनेबाबत सूचना

वेंगुर्ला तालुक्यातील ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या सर्व लाभार्थ्यांचे २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत घरकुल बांधून उद्दिष्ट पूर्ण करणे, विविध शासकीय योजनेचा लाभ देऊन सर्व सुविधांनी युक्त घरकुल देणे, भूमिहिन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देणे, बँकांकडून कर्ज उपलब्ध करुन देणे अशाप्रकारच्या सूचना महा आवास अभियान ग्रामीणचे संपर्क अधिकारी संजय घोगळे यांनी वेंगुर्ल्यातील संबंधित अधिका-यांना दिल्या.
      महाराष्ट्र राज्यात २० नोव्हेंबर २०२० ते २१ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत महा आवास अभियान-ग्रामीण राबविले जात असून या १०० दिवसाच्या कालावधीत ग्रामीण भागातील ८ लाख लाभार्थ्यांना सर्व सोयींनी युक्त असे घरकुल उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही शासनातर्फे सुरु आहे. या अभियानाची रुपरेषा व नियोजनामध्ये वेंगुर्ल्याचे सुपुत्र संजय घोगळे यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. यासाठी त्यांना राज्य व्यवस्थापन कक्षाचे संचालक डॉ. राजाराम दिघे व इतर अधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
      या अभियानाच्या अनुषंगाने संजय घोगळे यांनी वेंगुर्ला पंचायत समिती येथे भेट देत वेंगुर्ला तालुक्याचा आढावा घेतला. यावेळी पंचायत समितीतर्फे गटविकास अधिकारी उमा पाटील, अधिक्षक क्षमा कोरगांवकर, लिपिक संजना करंगुटकर व डाटा ऑपरेटकर लविना फर्नांडीस यांनी श्री. घोगळे यांचे स्वागत करीत वेंगुर्ला तालुक्यातील ग्रामीण आवास योजनेबाबत केलेल्या कामाची माहिती दिली. या अभियान कालावधीत सर्व विभागात सिधुदुर्ग जिल्हा व वेंगुर्ला तालुका यांनी प्रथम पारितोषिक पटकावे अशी अपेक्षा श्री.घोगळे यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Close Menu