‘किरात‘च्या खुल्या निबंध स्पर्धेत कणकवलीच्या रोहिणी मसुरकर प्रथम

                 वेंगुर्ला येथील किरात ट्रस्टने कोव्हिड-१९ने मला काय शिकवलं?‘ या विषयावर घेतलेल्या खुल्या निबंध स्पर्धेत कणकवली येथील रोहिणी रविद्र मसुरकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या स्पर्धेत सिधुदुर्गासह रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, मुंबई, गोवा, बेळगांव याठिकाणच्या एकूण ५० स्पर्धकांनी सहभाग घेतला.   

      स्पर्धेत वैभववाडी येथील मंदार सदाशिव चोरगे यांनी द्वितीय, सावंतवाडी येथील निता नितिन सावंत यांनी तृतीय तर निला देवल (मिरज) व सुकन्या संतोष आरु (पुणे) यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविला. स्पर्धेचे परिक्षण वेंगुर्ला होमिओपॅथीक मेडिकल कॉलेजचे प्रा.डॉ.संजिव लिगवत, आदर्श शिक्षक झेड.एम.घाडी व ज्येष्ठ साहित्यिक विरधवल परब यांनी केले.

      कोव्हिड-१९ या राष्ट्रीय आपत्तीचे गांभीर्य आणि त्यामधून सकारात्मक दिशेने विचार करुन मार्ग शोधताना, आरोग्य विषयक आचारसंहितेचे कठोर पालन करताना प्रत्येकाला आलेले व्यक्तिगत अनुभव आणि त्यामधून झालेले चितन यानिमित्ताने सार्वत्रिक होताना दिसून आले. स्पर्धेसाठी आलेले काही निबंध शब्दमर्यादेच्या बाहेर असल्याने ते वगळण्यात आले. मात्र, प्रत्येक निबंध हे आपल्या अनुभूतीशी प्रामाणिक राहून सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक क्षेत्राशी आपला अनुबंध जोडून घेत प्रभावी मांडणी असल्याचे दिसून आल्याबद्दल परिक्षकांनी कौतुक केले. या स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे रोख रक्कम रु.२०००, रु. १५००, रु. १००० व रु.५००ची दोन आणि प्रमाणपत्र अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. परंतु, यावर्षी कोविडच्या पार्श्वभूमीवर श्रीधर मराठे स्मृती जागर विचारांचाहा कार्यक्रम रहित केला असून विजेत्यांना पोष्टाद्वारे बक्षिसे पाठविली जाणार आहेत.

 

Leave a Reply

Close Menu