हळदीकुंकू हा भारतीय महिलांच्या जीवनातील महत्त्वाचा सामाजिक उत्सव! या निमित्ताने भेटीगाठी, आदान-प्रदान होते. हे आदान-प्रदान केवळ औपचारिक वस्तूंचे न राहता ख-याखु-या वैचारिक वारसाचे व्हावे, या भावनेतून अनुराधा पाटकर यांनी आपल्या घरातील समारंभात गीताहृदयहा ग्रंथ वाण म्हणून करण्याचे ठरवले.

          ‘श्रीमद् भगवत्गीताहा भारतीयांचा सर्व सृष्टीत व्यापून राहिलेल्या भगवंताला अनुभवण्याची शिकवण देणारा ग्रंथ. त्या ग्रंथावर भूदान चळवळीच्या निमित्ताने जनतेतील करुणामय जनार्दनाचे विश्वरुप दर्शन घेणा-या आचार्य विनोबा भावेंनी निरुपण केले. त्या निरुपणाचे सार मातृभक्त सानेगुरुजींनी गीताहृदयया शीर्षकाखाली मराठी जनतेसाठी अर्पण केले. रोजच्या जीवनात गीता कशी अंमलात आणावी हे सोप्या भाषेत सांगणारा हा ग्रंथ आज २१व्या शतकातदेखील अतार्किक विषमताग्रस्त रुढी, परंपराना घट्ट चिकटून राहिलेल्या मनांना उदात्त बनवणारा असल्याचे मत अनुराधा पाटकर यांनी व्यक्त केले.

       त्या म्हणाल्या की, मी लहानपणापासून अनेक रुढी, परंपरा पहात आले. लहान असताना मला त्या रुढींतील विसंगती दिसत नसे. घरातील वयाने मोठी माणसे जे करतात ते करणे योग्यच असते असे मला वाटे. किबहुना रुढी-परंपरा पाळणे म्हणजेच धर्म असेच वाटे. बहुतेकांना असेच वाटते.

          मोठी झाल्यानंतर माझ्या मनात रुढींविषयी, परंपरांविषयी प्रश्न उभे राहिले. सर्वात पहिल्यांदा हे प्रश्न मला प्रकर्षाने जाणवले जेव्हा माझे बाबा वारले आणि माझ्या आईचे कुंकू, मंगळसूत्र काढण्यात आले. खूप क्लेशकारक अनुभव होता तो. त्यानंतर आईने ना कधी कुंकू लावले, ना कधी फुले माळली. आदल्यावर्षीपर्यंत जिला हळदीकुंकूसारख्या कार्यक्रमात मानाने बोलवले जायचे, तिला बाबा गेल्याच्या वर्षांपासून हळदीकुंकू समारंभात बोलावणे कायमचे बंद झाले. पूर्वी कोणी स्त्री आमच्या घरी आली तर ती परत जाताना आई तिला कुंकू लावी आणि समजा आई विसरली तर ती बाई आईला कुंकू लावण्याची आठवण करुन देई. पण बाबा गेल्यानंतर हे अचानक थांबले. बाबांचे जाणे आमच्यासाठी भयानक होते. आई पूर्ण असहाय बनली होती. खूप निराश होती. पण पोटी आम्ही पाच मुले. तिला बाबांची पालकत्वाची जागा घेण्याशिवाय पर्याय नव्हता. पण तरीही ती पूर्वीसारखी नव्हती. ती आता विधवा होती. विधवा ही तिची ओळख होती आणि तिने आपले विधवापण सतत लोकांना दाखवण्याचे अदृश्य बंधन तिच्यावर होते. तिने ते आपले नशीब म्हणून मान्य केले होते. किबहुना तिला त्यात वावगेदेखील वाटत नव्हते कारण ती लहानपणापासून तसेच पहात आली होती. विधवापण निभावणे हाच धर्म असे तिला वाटत होते. नवरा असताना जो मान स्त्रीला मिळतो, तसाच मान वैधव्य आल्यावर मिळत नाही आणि ते विशेषत्त्वाने अशा कार्यक्रमातून जाणवत रहाते.

          माझी आई शाळेत कधी गेली नसली तरी मी शाळेत शिकले होते. सावित्रीबाई फुले यांच्याविषयी ऐकले होते. ज्योतिबा हे सावित्रीबाईंचे पती. ते तिच्या आधी गेले. पण सवित्रीबाईंचा कुंकुवाशिवायचा फोटो मी कधी पहिला नाही. मग माझ्या आईने कुंकू का लावू नये? मी आईला कधी हे विचारले नाही, कारण मला माहित होते की ती म्हणाली असती की लोक काय म्हणतील?

        मी शिकत असताना मला अस्पष्टपणे जाणवले की रुढी-परंपरा आणि धर्म यात फरक आहे. श्रीमद्भागवद्गीताहा भारतीयांचा धर्मग्रंथ. या ग्रंथातील ७०० श्लोकात विधवांनी कसे वागावे याविषयी काहीही नाही. उलटदुस-याच अध्यायात भगवान सांगतात की, ‘देह जरी नाश पावणारा असला तरी आपला जीवंतपणा (आत्मा) हा अमर असतोआणि मुळात व्यक्ती म्हणजे देह नसून आत्मा असते.  याचा अर्थ जरी आज माझ्या बाबांचा देह नसला तरी ते आहेतच कारण त्यांचा आत्मा (त्यांच्यातील जिवंतपणा) अमर आहे.

          याच गीतेतील पाचव्या अध्यायातील १८ व्या श्लोकात भगवान सांगतात, ‘‘विद्या विनय संपन्न ब्राम्हण असो की चांडाळ असो, गाय असो नाहीतर हत्ती असो नाहीतर कुत्रा असो, या सगळ्यांकडे जो सारख्याच दृष्टीने पाहतो, तो ज्ञानी. मग माझ्या मनात विचार आला की एखादीचा नवरा असो किंवा नसो दोघींकडे मी समानदृष्टीने बघितले पाहिजे. ही गोष्ट माझ्या व्यवहारातही दिसली पाहिजे. पण ती कशी दिसेल? हळदीकुंकू समारंभासारख्या समारंभात दोघींनाही समानतेने बोलवून मी हा गीतार्थ जीवनात आणू शकते.

          पण प्रश्न इथेच संपला नव्हता. रुढी-परंपरा या टिकवून ठेवण्यासाठी त्यामागे मानसिक दहशत बसवलेली असते. विधवा बाईला हळदीकुंकू लावलेस तर तुझ्या नव-याचे बरेवाईट होईल, ही रुढीची धमकी होतीच आणि तात्विकदृष्ट्या मला त्यात कितीही फोलपणा वाटत असला तरी ती माझ्या मनात देखील होती. माझ्या भीतीला छेद देणारा उपदेश गीता देत होती तरीही ती भीती जात नव्हती. (प्रत्यक्ष धर्मापेक्षा रुढीची दहशत किती बलवत्तर असते त्याचा मी अनुभव घेत होते.) त्यावर माझ्या  नव-याने (डॉ.रुपेश पाटकर यांनी) मला सांगितले, की ‘‘ज्याला त्याला स्वतःचेच कर्मफळ भोगावे लागते, दुस-याचे नाही. दुसरे म्हणजे जगात जे जे पुरुष आजपर्यंत वारलेत त्यातील किती पुरुषांच्या बायकांनी विधवांना हळदीकुंकू लावलेय? मला जर मृत्यू आला (तो कधी ना कधी येणारच) तर त्याचे कारण माझे बिघडलेले आजारपण असेल किंवा अपघात असेल.‘‘ मी यावर बराच विचार केला आणि तयार झाले. गेल्यावर्षी पहिल्यांदा मी हळदीकुंकूसाठी नवरा नसलेल्या महिलांना बोलावले. दोघीच आल्या, त्यांनाही लोक काय म्हणतील याची भीती होतीच आणि वर्षभरात माझ्या नव-याचे काही बरेवाईट होईल याचीही भीती होती. आता याला एक वर्ष पूर्ण झालेय.  यावर्षी देखील मी भेदभाव न करता हळदीकुंकू करतेय आणि वाण म्हणून महान मातृभक्त महाराष्ट्राचे गुरुदेव साने गुरुजी यांनी श्रीमद् भागवद्गीतेवर लिहिलेले गीता हृदयहे पुस्तक देतेय. जेणेकरुन माझ्यासारखाच इतरांनी देखील रुढी-परंपरांना छेद द्यावा आणि खरा धर्म आचरण्यात आणण्याचा प्रयत्न करावा.                                                                   अनुराधा रुपेश पाटकर, ९६२३६६५३२१

 

 

Leave a Reply

Close Menu