ग्रामपंचायत निवडणूका

राज्यातील बारा हजारावर ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. स्थानिक स्तरावर आघाड्या करुनच निवडणुका लढविल्या जात असल्या तरी ग्रामीण राजकारणावर वर्चस्व राखण्यासाठी आमदार, खासदार, मंत्री यांचीही प्रतिष्ठा पणाला लागते. या निवडणुकीच्या निकालानंतर दावे-प्रतिदावे केले जात असले तरी राज्यातील आघाडी शासनाला चांगले यश मिळाल्याचे दिसून येते. राज्यात भाजपानेही सर्वशक्ती पणाला लावून आपले अस्तित्व राखण्याचा प्रयत्न केला. सिधुदुर्गात भाजप पुरस्कृत पॅनेलने ५० जागांवर विजय मिळविला. राज्यभरात १ हजारावर ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध पार पडली. अन्यत्र निवडणुकीत कमालीची चुरस, इर्षा पहायला मिळाली. पैशाचा चुराडा किती झाला, याचा हिशेब मांडता येणार नाही. मात्र अनेक ठिकाणी मतदारांनी सत्तांतर घडविले.     

      राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि हिवरे बाजार येथील पोपट पवार या २ ग्रामपंचायती वेगळ्या वाटेवरील म्हणून ओळखल्या जातात. तेथे यावेळी निवडणुका झाल्या, ही गोष्टच विचार करण्याला लावणारी आहे. हिवरे बाजार एक राज्यातील आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. ३५ वर्षानंतर तेथे निवडणूक झाली. अनेक ठिकाणी युवक मोठ्या संख्येने यावेळी निवडणुकीच्या मैदानात उतरल्याचे चित्र पहायला मिळाले. लोकशाहीमध्ये ग्रामीण खेड्यांना विकासाचा चेहरा देण्यासाठी राज्य आणि केंद्राने विविध योजना दिल्या आहेत. गावचा कारभार उत्तम झाला, विकास योजना राबवल्या तरच ख-या अर्थाने राज्य आणि देशाच्या विकासाला बळकटी येते.

      ग्रामीण भागातील निवडणुकांत कमालीची इर्षा असते. यातून निर्माण होणारे वातावरण, नात्यागोत्याचे पदर, भाऊबंदकी असे संवेदनशील विषय असल्याने या निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाची कसोटी लागते. वेगवेगळे राजकीय पदर या निवडणुकीत गुंतलेले असतात. यावेळी राज्यातील दोन ग्रामपंचायतीतील सरपंचपदाच्या लिलावाचे कारण गाजले. निवडणूक आयोगाने तेथील निवडणुका रद्द केल्या. एकंदरीत विचार केला तर गावस्तरावरील निवडणुकांचे पर्व शांततेत पार पडले. काही अपवाद वगळता निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी ग्रामस्थांनी केलेले सहकार्य तितकेच महत्त्वाचे आहे. सरपंच आरक्षणानंतर ग्रामपंचायतीचा कारभार सुरु होईल. निवडणुका झाल्या. आता हेवेदावे विसरुन गावच्या विकासासाठी सर्वांनी एकदिलाने काम करण्याची गरज आहे. या एकीवरच गावचा विकास अवलंबून आहे. याचे भान सर्वांनी जपले पाहिजे

.- सुभाष धुमे,७७५७९३६१५०

Leave a Reply

Close Menu