महिलांसह मुलांनी समुद्राच्या पाण्यात उभे राहून केले आंदोलन

शिरोडा वेळागर समिती सर्व्हे नंबर ३९ वरुन आक्रमक

          सर्व्हे नं. ३९ मधील पेन्सील नोंदी रद्द करा…ताज ग्रुपला जमीन देणार नाही..संघर्ष समितीचा विजय असो.. अशा गगनभेदी घोषणा आंदोलनकर्त्यांनी चक्क पाण्यात उभे राहून देत शिरोडा समुद्र किनारा दणाणून सोडला. या नागरिकांनी आपले सगळे व्यवसाय व घरे बंद ठेऊन या आंदोलनात सहभाग घेतला. त्यामुळे दररोज गजबजलेला शिरोडा किनारा आज सुनासुना वाटत होता.

      वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा-वेळागर येथे पंचतारांकित पर्यटन प्रकल्प उभारण्यास ताज ग्रुपच्या इंडियन हॉटेल्स कंपनीला मान्यता देण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आला असून आपल्यावरील होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी स्थानिक भूमिपूत्रांनी उपोषणाचे शस्त्र उचलले आहे. त्यानुसार आज २६ जानेवारी रोजी समितीच्या पुरुष सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तर महिला व मुलांनी समुद्राच्या पाण्यात उभे राहून उपोषण केले.

      शासनाने कितीही प्रयत्न केले तरी आम्ही शिरोडा वेळागर येथील सर्व्हे नंबर ३९ सह आजूबाजूची एक इंचही जमीन ताज ग्रुपच्या घशात घालू देणार नाही. आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहू. आज २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी समुद्राच्या पाण्यात राहून न्याय हक्कासाठी उपोषण सुरु केले आहे. शासनाने आम्हाला पुनर्वसनाचे गाजर दाखवून बेघर करण्याचा प्रयत्न केला तर सर्वजण मुलाबाळांसह जलसमाधी घेऊ असा इशारा संघर्ष समितीने उपोषणावेळी दिला आहे. शिरोडा येथील या उपोषणात दीपा आमरे, हुईजा फर्नांडिस, हेस्तू सोज, प्रकाश भगत, सुरज आमरे, उदय भगत, जोरण फर्नांडिस, मदन अमरे, ओलिदा अल्फान्सो, वामन तारी, जास्मिन सोज, लुईस फर्नांडिस, सुरेश भगत, मेरी अल्फान्सो, अर्चना परब, प्रभाकर आरोसकर, सुप्रिया भगत, शालू अल्फान्सो, निलेश मयेकर, दाजी आरोसकर, विश्वनाथ आरोसकर, ऋतुराज केरकर, संदेश साळगावकर, समितीच्या कायदेविषयक सल्लागार अॅड. श्वेता चमणकर, तसेच निलेश चमणकर यांच्यासह या भागातील नागरिक यावेळी उपस्थित होते.

      आमच्या आजोबा, वडील, काका यांनी मेहनत करुन या वाळूमध्ये आंबा, नारळ झाडे लावून ती जगवली. घाम गाळून परिश्रमाने आपली घरे उभी केली. तसेच आम्ही राब राबून पर्यटकांच्या सोयीसाठी तंबू निवास सुरु केले. याचा साधा विचार न करता शासन असे निर्णय घेत असेल तर आम्ही ते खपवून घेणार नाही, असा इशाराच या भूमिपुत्रांनी सरकारला दिला आहे.

Leave a Reply

Close Menu