गोवा-सत्तरी येथील विवेकानंद विचारपीठ या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी किरात ट्रस्टशी संफ साधून वेंगुर्ला येथील कातकरी लोकांना भेट देण्याचा मानस व्यक्त केला. ही संस्था गेले सहा-सात महिने गोकुळप्रकल्प राबवित आहे. या प्रकल्पात कातकरी वस्तीतील लोकांच्या मुलभूत प्रश्नांवर काम केले जाते. १४ वर्षे वयोगटापर्यंत मुलांसाठी दैनंदिन पोषण आहार, जीवन कौशल्य घडवणारे उपक्रम, गरोदर महिला, स्तनदा माता यांच्यासाठी सातत्याने काम केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनी वेंगुर्ल्यातील कॅम्प आणि निमुसगा येथील कातकरी वस्तीत गोकुळप्रकल्प कार्यकर्त्यांनी एक दिवस दिला. यामध्ये डॉ.रुपेश पाटकर, माधवी राणे, दशरथ मोरजकर, आरती जाधव, गायत्री राणे, मल्हार इंदुलकर, राई पाटकर, शशांक, सीमा, चिन्मय मराठे यांनी या वस्तींना भेट दिली. यावेळी वस्तीवरील मुलांसोबत संवाद साधत, खाऊचे वाटप करत ओरिगामी शिकवली.

      ७२वा प्रजासत्ताक दिन साजरा करताना ज्या दिवशी भारतीय संविधान अंमलात आले त्या संविधानाची हक्कदार असलेली आपलीच माणसे कितीतरी मुलभूत हक्कांपासून वंचित आहेत ही शोकांतिका जाणवली. कॅम्प परिसरामध्ये ३५ ते ४० तर निमुसगा परिसरात ४५ ते ४८ अशी कातक-यांची लोकवस्ती आहे. गेल्या चार पिढ्यांपासून ही लोकं इथे राहतात. त्यांची घरे म्हणजे माडाच्या झावळ्या व प्लॅस्टिकने झाकलेल्या झोपड्या. हे लोक परिसरातील आंब्याच्या बागांमध्ये मजूर म्हणून काम करतात. येथील कुटुंबे दिवसातून दोन वेळाच सकाळी लवकर व संध्याकाळी जेवतात. ग्रामिण रुग्णालयातील आरोग्यसेवक राजद्र नाथगोसावी व आरोग्य सेविका विनिता तांडेल दर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी येथे भेट देतात. लसीकरण, कुटुंब कल्याण, शासनाच्या विविध योजना यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करीत आहेत.

      निमुसगा परिसरातील कातकरी वस्तीत पाण्याची सोय अद्याप नाही. डोंगर उतरुन दाभोसवाड्यातून किंवा बंदरावरील विहिरीवरुन ते पाणी नेतात. त्यामुळे मुलांमध्ये स्वच्छतेचा प्रचंड अभाव दिसून येतो. शासनाच्या बयाच सुविधा यांच्यापर्यंत पोहचत असल्यातरी शिक्षणाअभावी प्राधान्यक्रम ठरविण्यात ते अयशस्वी ठरतात. सतत स्थलांतर करावे लागत असल्याने आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत सेवा नियमितपणे त्यांना मिळणे कठीण होते. एकूणच त्यांना मुख्य पवाहात आणण्यासाठी जीवनकौशल्य शिकवण्यासाठी एखादा दिवस देऊन भागणार नाही. स्वयंसेवी संस्था, उदय आईर यांच्यासारख्या व्यक्ती कातकरी समुदायाच्या जीवनात काही सकारात्मक बदल व्हावेत यासाठी विविध उपक्रम राबवित असतात. परंतु व्यक्ती आणि संस्थेच्या कामाला काही अंगभूत मर्यादा आहेत.

      केंद्र आणि राज्य शासनाने आदिवासी कल्याणासाठी स्वतंत्र आदिवासी कल्याण मंत्रालय निर्माण केले आहे. यासाठी स्वतंत्र मंत्रीपदाचा कार्याभार आहे. शासनाचे कर्मचारी आदीवासी कल्याणासाठी कार्यरत आहेत. तरीदेखील कॅम्प आणि निमुसगा परिसरात रहाणा-या कातकरी समाजाला पिण्यासाठी पाणी, पुरेशा कपड्यांचा अभाव, हक्काचे घर हे मुलभूत प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत.

                        – सीमा मराठे, ९६८९९०२३६७

Leave a Reply

Close Menu