डॉ. जयंत नारळीकर

जागतिक कीर्तीचे खगोल शास्त्रज्ञ आणि विज्ञानवादी लेखक डॉ.जयंत नारळीकर यांची नाशिक येथे होणा-या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली. एका ज्येष्ठ शास्त्रज्ञाची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेली निवड अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे. विज्ञानाच्या अंगाने साहित्याला योगदान देणारे म्हणून डॉ. जयंत नारळीकर यांची निवड अत्यंत योग्य आहे.

      साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, साहित्य वर्तुळ, प्रकाशक अशा सर्व स्तरातून या निवडीचे मनापासून स्वागत होत आहे. खरे तर ही निवड बिनविरोध झाली असती तर आणखी विशेष महत्त्व आले असते. अध्यक्षपदासाठी सहा दिग्गज होते. त्यातून बहुमताने डॉ.नारळीकर यांची निवड झाली आणि एका ज्येष्ठ शास्त्रज्ञाला साहित्याच्या व्यासपीठावर सन्मान मिळाला, हे अधिक आनंद देणारे आहे. या निवडीनंतर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया आणि त्यात मांडलेले अनेक मुद्दे महत्त्वाचे आणि चिंतन करायला लावणारे आहेत. तंत्रज्ञाचा वापर करणा-या समाजामध्ये विज्ञानवादी दिसत नाहीत. हातामध्ये आधुनिक मोबाईल असला तरी अंधश्रद्धेला खतपाणी घालत भविष्य पाहण्यासाठी त्याचा वापर केला जातो.

      २१व्या शतकातही आपल्या धारणा बदललेल्या नाहीत, याची जाणीव होते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. त्यासाठी व्याख्यान, प्रदर्शन, कार्यशाळा आणि विज्ञान कथा या माध्यमांचा प्रभावी वापर होऊ शकतो. साहित्यातून विज्ञान कसे मांडता येईल, याबाबत माझे विचार मी अध्यक्षीय भाषणातून मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. शिक्षित लोकांमध्येही अंधश्रद्धा पहायला मिळते. परंतु सतत प्रयत्न करीत राहिल्यास यात फरक निश्चित पडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

      साहित्यातून अंधश्रद्धा निर्मूलनाचा प्रयत्न होऊ शकतो. विविध भागातील लोक संमेलनासाठी येतात. त्यामुळे या व्यासपीठाचा प्रभावी वापर होऊ शकतो. सामान्य माणसापर्यंत विज्ञानाचे महत्त्व पोहचले पाहिजे, यासाठी माझी धडपड आहे. मराठी विज्ञान परिषद या आघाडीवर चांगले काम करीत आहे. विज्ञान शिक्षण मातृभाषेतूनच दिले पाहिजे. आपण मुलांना इंग्रजी शाळेत घालतो. त्यामुळे विज्ञान समजणे कठीण जाते. यातून मराठीचा वाचक कमी होतो. ही गोष्ट चिंताजनक वाटते. डॉ. नारळीकर यांनी मांडलेले मत आणि व्यक्त केलेली चिंता या अनुषंगाने सर्वच स्तरावर चर्चा झाली पाहिजे. चिंतन झाले पाहिजे. मराठी जागतिक स्तरावर पोहोचवायची असेल तर त्याचा अधिकाधिक वापर झाला पाहिजे. यासाठी सुद्धा प्रयत्नांची गरज आहे. डॉ. नारळीकर यांनी आजपर्यंत विज्ञान कथांच्या माध्यमातून या आघाडीवर काम केले आहे. आता या नव्या व्यासपीठाचा त्यांच्याकडून अधिक प्रभावी वापर होईल यात शंका नाही. डॉ. नारळीकर यांना आणि त्यांच्या कारकिर्दीला किरातपरिवार आणि समस्त कोकणवासियांकडून खूप खूप शुभेच्छा!

 

Leave a Reply

Close Menu