वेंगुर्ल्यात १० ग्रामपंचायतींसाठी महिला आरक्षण

     वेंगुर्ला तालुक्यातील ३० ग्रामपंचायतीच्या सरपंच आरक्षण सोडतीचा कार्यक्रम २८ जानेवारी रोजी तहसील कार्यालय वेंगुर्ल्याच्या अभ्यागत हॉलमध्ये तहसिलदार प्रवीण लोकरे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी नायब तहसीलदार संतोष बांदेकर, श्री. शिंदे, भाजपा तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, काँग्रेस जिल्हा प्रवक्ते इर्शाद शेख, पंचायत समिती सदस्य सुनील मोरजकर, तालुक्यातील सरपंच, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

    मागील १५ वर्षाच्या सरपंच पदाच्या आधारे प्रवर्गनिहाय सरपंच आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी सुरवातीला अनुसूचित जातीसाठी आसोली व म्हापण ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले. यामध्ये आसोलीसाठी १ सर्वसाधारण व म्हापणसाठी १ महिला जागा आरक्षित करण्यात आली. त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी एकूण ८ ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आल्या. यामध्ये सर्वसाधारणमध्ये उभादांडा, कोचरा, केळुस, दाभोली तर महिलांसाठी मोचेमाड, परबवाडा, मातोंड, होडावडा यांचा समावेश आहे. तर उर्वरित २० ग्रामपंचायतीसाठी सर्वसाधारण महिला १० तर सर्वसाधारणसाठी १० जागा आरक्षित करण्यात आल्या. यामध्ये सर्वसाधारण महिलांमध्ये तुळस, आडेली, पाल, परुळे, वेतोरे, चिपी, वजराठ, मठ, शिरोडा, भोगवे या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. तसेच सर्वसाधारणमध्ये आरवली, सागरतीर्थ, मेढा, कुशेवाढा, अणसुर, पालकरवाडी, पेंडूर, रेडी, खानोली, वायंगणी ग्रा.पं.चा समावेश आहे.

     दरम्यान, नुकतीच निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेल्या आरवली व सागरतीर्थ या दोन्ही ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण सर्वसाधारण म्हणजेच खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झाले आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी सर्वसाधारण प्रभागातून निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये चुरस लागली असून सरपंच पदावर कोणाची वर्णी लागते हे लवकरच स्पष्टहोणार आहे.

 

 

Leave a Reply

Close Menu