पद्मश्री ठरावी लोककलेसाठी संजिवनी

       वाढती मनोरंजनाची माध्यमे असताना  लोककला जतन आणि संवर्धन करुन लोकांसमोर सातत्याने आणण्याचं काम परशुराम गंगावणे यांनी नेटाने केले. त्यांची आपल्या कलेवर असलेली नितांत श्रद्धाकामाप्रती असलेली निष्ठा ज्याचं रुपांतर पद्मश्री‘ पुरस्कारात झालं आणि अवघ्या सिंधुदुर्गातील प्रत्येक कलाकाराचा कलारसिकांचा उर अभिमानाने भरुन आला.     

विघ्नहरासी गाई एकदंता।   देवा गौरीहराचिया सुता।

सकळसरसी गुण गाता।    तुझे चरणी नमन माझे।।

सकळ देवासी वंदू।  आणि तू दाविसी ज्ञान मार्गचा इंदू।

येथोनिया परिबंधु।  मजमती द्यावी विघ्न हरा।।

      केवळ मौखिक आणि वंशपरंपरेने जपल्या गेलेल्या लोककलांमध्ये ठाकर आदिवासी समाजात अकरा लोककला प्रकार आहेत. कळसूत्री बाहुल्याचित्रकथीबाहुल्यांच्या सावल्यांचे खेळ या सोबत सणासुदीला आपल्या समोर येणारे कलाप्रकार म्हणजे पांगुळ बैल, पोवाडा, पोतराजापिंगळीराधानृत्यडोणा वाद्यपारंपरिक फुगड्या आणि सांकेतिक भाषा.

  १२व्या शतकातही ह्या सर्व कला अस्तित्वात असल्याचा उल्लेख ज्ञानेश्वरीत आढळतो. ज्ञानेश्वरीतील १७ व्या अध्यायात तर कळसूत्री बाहुल्यांचे रुपक वापरुन ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे की,

जैसा अपमानीला अतिथी। ने सुकृताची संपत्ती।।

का साईखडियाची गती। सूत्र तंतू।।

      राजस्थान पैठण मधून ठाकर समाज हा पुढे महाराष्ट्रात विशेषतः कोकणात शिवाजी महाराजांच्या राजाश्रयामुळे स्थिरावला. गुप्तहेराचे काम करताना पांगुळ बैलाला सोबत घेऊन सांकेतिक भाषेत शत्रूपक्षाची माहिती महाराजांपर्यंत पोहचवली जात असे.

      राजेशाहीसंस्थान लोप पावल्यानंतर मात्र ख-या अर्थाने या समाजाची परवड सुरु झाली. त्यात अनेक कलावंत व्यसनाधीन झाल्याने त्यांच्या कुटुंबाची वाताहत झाली. त्यामुळे पोटासाठी मिळेल ते मजुरीचे काममासेमारीसारख्या व्यवसायाकडे बहुतांशी समाज ओढला गेला. स्त्री वर्ग गोधड्या शिवूनभिक्षा मागून उपजीविकेसाठी हातभार लावू लागला. अशा भीषण परिस्थितीत श्री. परशुराम गंगावणे यांनी दूरदृष्टीने २००६ साली पिगुळी-गुढीपूर येथे ठाकर आदिवासी कला आंगणची निर्मिती केली.

   या कलांगणात प्रवेश करतानाच नारळाच्या झाडांवर साकारलेली चित्रकथी लक्ष वेधून घेते. पारंपरिक वेशातील पांगुळ बैलासोबतचा स्टेच्यु स्वागताला उभा असतो तर त्याच्याच समोर ठाकर समाजाचे प्रतीक दर्शविणारे छोटेसे घरकुल मन प्रसन्न करते. या घरकुलात श्री.गंगावणे यांनी आपल्या आईवडीलांचे स्टॅच्यू येणा-या लहान मुलांसाठी आजी-आजोबांच्या रुपात ठेवले आहेत. त्यांच्या सभोवताली त्या काळात वापरले जाणारे दैनंदिन साहित्य त्यांच्या नावासाहित मांडणी केली आहे. त्यांच्या आशीर्वादाशिवाय आणि संस्काराशिवाय इथपर्यंतचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता हे श्री. गंगावणे आदराने नमूद करतात. काळाच्या ओघात नामशेष होत चाललेली अनेक शेतीची अवजारेमातीच्याच मडक्यामध्ये जवळपास सात-आठ प्रकाररोवळीसुपलीहाराइरलंजातेलाकडी शेवगाडोणापाटा-वरवंटामुसळ, लाकडी पाळणाबाजघोंगडीशेणाने सारवलेल्या जमिनी त्यावर चुन्याची बोटाने काढलेली रांगोळीभिंतीवरील नागोबाची रेखाटलेली प्रतिमा अशा कितीतरी वस्तूंची व चित्रांची मांडणी आताच्या पिढीसाठी मार्गदर्शक तर ठरणार आहेच. शिवाय या सर्व वस्तूंसोबत सेल्फीच्या निमित्ताने का होईना हाताळून पाहता येईल अशी मांडणी येथे केली आहे. आज प्रत्येक गोष्ट सहज सर्वत्र उपलब्ध होत असताना आपल्या पूर्वजांच्या कष्टांची जाणिव यातून नक्कीच होईल असा आशावाद श्री.गंगावणे व्यक्त करतात.

      ठाकर आदीवासी कला आंगण अशा उभारलेल्या कलादालनात तर लोककलेच्या अनेक रुपांची मांडणी पाहून आपण थक्क होतो आणि या कलादालनासाठी किती मेहनत गंगावणे कुटुंबियांनी घेतली असेल याची जाणिव होते. हे कलादालन आपल्या गोठ्याच्या जागी त्यांनी उभारले आहे. चित्रकथी म्हणजे रामायणमहाभारतासारख्या पौराणिक कथांवर चित्र रेखाटण्यात येतात. आजही नवरात्रीतील ९ दिवस कुडाळच्या केळबाई मंदिरामध्ये तर कुडाळ-कुंभारवाडी येथे दिवाळीत पाडव्या दिवशी ब्राह्मण स्थळी चित्रकथी सादर केली जाते. टाळविणाडमरु या वाद्यांच्या सहाय्याने सुत्रधार पोथीतील प्रत्येक चित्राचे वर्णन करुन त्याची माहिती देतो.  पोथीतील चित्र दाखविण्याच्या पद्धतीला पोथी सोडणं‘ असे म्हणतात. या कलादालनात केवळ २० चित्र प्रातिनिधीक स्वरुपात मांडलेली आहेत. गंगावणे कुटुंबियांकडे जवळ जवळ १ हजारहून अधिक चित्रे उपलब्ध आहेत.

      आपल्याकडे सर्रास पौराणिक कथा या दशावतारी नाट्यप्रयोगातून निदर्शनास येतात. या व्यतिरिक्त चित्रकथींबरोबरच कळसुत्री बाहुलांच्या खेळातूनही पौराणिक कथा सांगितल्या जातात. यात झांजपेटीतुणतुणंतबला यांच्या साथीने निर्जिव बाहुल्यमध्ये सुत्रधार जणू सजिव रुप देतो. लाकडापासून बनविलेल्या या बाहुल्यांना त्या त्या चरित्रानुसार त्यांची वेशभूषा केली जाते. सुत्रधार आपल्या बोटांच्या सहाय्याने एक एक पात्र रंगभूमीवर आणतो. प्रसंगानुरुप एकावेळी दोन पात्रे खेळविली जातात.   

  चित्रकथी व कळसुत्री बाहुल्यांच्या खेळात पौराणिक कथांव्यतिरिक्तही बेटी बचाव,‘ ‘बेटी पढाओ‘, ‘हुंडाबळी‘, ‘व्यसनमुक्ती‘, ‘स्वच्छता‘ ‘एड्स‘ या सारख्या सामाजिक प्रश्नांवरही गंगावणे कुटुंबिय प्रबोधन करीत आहेत.  कोरोनाबाबतची जनजागृती चित्रकथी व कळसुत्री बाहुल्यांमधून सोशल मिडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविण्यात आली.

      तिसरा महत्त्वाचा लोकप्रकार म्हणजे बाहुल्यांच्या सावल्यांचा खेळ‘. या बाहुल्या बक-याच्या चामड्यापासून बनविल्या जातात. पडद्यामागे तेलाचा दिवा किवा वीजेचा दिवा अडकवून सुत्रधार दोरीच्या सहाय्याने पौराणिक कथांनुसार बाहुल्यांचे खेळ करतो. समोर बसलेल्या प्रेक्षकवर्गाला या बाहुल्या प्रत्यक्ष न दिसता त्यांच्या सावल्या (शॅडो) दिसतात. या खेळात झांजविणासोबत काश्याची थाळी आणि भेंडीची काठीच्या सहाय्याने वाद्य वाजवून सुर निर्माण करुन कार्यक्रम रंगतदार केला जातो.

      बदलत्या काळानुसार काही पारंपारिक कलाप्रकार लोप पावत आहेत. मात्रपुढील पिढीला त्याची माहिती व्हावी यासाठी गंगावणे कुटुंबियांना अशा लोप पावणा-या गोंधळीपांगुळ बैलपिगळी यांची असलेली वेशभूषेंची प्रतिक जतन करुन ठेवली आहेत. हे सर्व पहाताना या लोककला व्यक्तिभिमुख नसून समाजाभिमुख असल्याचे प्रकर्षाने जाणवते.

   श्री. परशुराम गंगावणे यांची दोन्ही मुले एकनाथ व चेतन हा आपला वारसा पुढे नेत आहेत. यासाठी पारंपारिकेते बरोबरच आधुनिकतेची कासही त्यांनी धरली आहे. युट्युब चॅनेलवरुनही विविध पपेट शो, कार्यशाळा ते घेत असतात. त्यामुळे देश विदेशातही या लोककलेचा प्रसार होत आहे.

      ‘कला आंगण चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून तरुण वर्गापर्यंत ही कला कशी नेता येईलतसेच इथल्या मातीतील ही कला मान्यताप्राप्त व्हावी यासाठी गंगावणे कुटुंबियांनी केलेले प्रयत्न खरोखरच उल्लेखनीय आहेत. शासन दरबारी घेतलेली ही दखल निश्चितच अभिमानास्पद आहे. पण आता हजाराहून अधिक असलेल्या चित्रकथींचे संवर्धन करण्यासाठी येथे मोठे म्युझियम झाल्यास चित्रकथीकळसुत्री बाहुल्यापारंपारिक फुगड्या असे अनेक कलाप्रकार अभ्यासकांना अभ्यासता येतील व कला पुढील पिढीपर्यंत जीवंत राहण्यास मदत होईलअशी प्रामाणिक इच्छा गंगावणे कुटुंबिय व्यक्त करतात.

      जे.जे.स्कूल ऑफ आर्टस्मधील निवृत्त प्राध्यापक सुनिल यशवंत नांदोस्कर यांनी २००५ मध्ये परशुराम गंगावणे यांच्या सहकार्याने ठाकर समाजातील या लोककलांवर प्रबंध सादर केला होता. या प्रबंधामध्ये लोककलांच्या विस्तृत माहिती सोबतच या चित्रकथी कुठे वापरता येऊ शकतील यांचे उत्कृष्ट नमुने दिले आहेत. त्यामुळे ही कला घरोघरी पोहचण्यास मदत होईल.

      पद्मश्री पुरस्काराच्या निमीत्ताने लोककला जाणून घेण्याची आणि त्याचा प्रसार प्रचार सातत्याने करण्याची जबाबदारी आपली आणि पर्यायाने शासनाचीही रहाणार आहेतरच लोककलांसाठी पद्मश्री नवसंजीवनी ठरेल!

– सीमा मराठे, ९६८९९०२३६७

 

This Post Has 3 Comments

  1. धन्यवाद
    खूप छान Article लेख आहे

  2. अभ्यासपूर्ण असा सुंदर लेख. अभिनंदन. समर्पक माहिती दिल्याबद्दल मनःपूर्वक. धन्यवाद.

  3. पारंपारिक कलेला पुनर्जीवित करणाऱ्या कलाकारास विनम्र अभिवादन व मानाचा मुजरा

Leave a Reply

Close Menu