आपल्या विचारांमध्येच आपल्याला घडवण्याची किंवा बिघडवण्याची शक्ती असते. आणि हीच शक्ती आपल्या आयुष्यातील सर्व उद्दिष्टांवर प्रभाव टाकू शकते  – मग ते  उद्दिष्ट संपत्ती असो, आरोग्य असो, सत्ता असो वा आनंद असो! आपण जीवनातील   ध्येयापासून ढळण्याचं किंवा ध्येयापर्यंत न पोचण्याचं मुख्य कारण आहे आपल्या मेंदूचं नकारात्मक विचार करणं! ज्याची आपल्या मेंदूला सवयच झालेली असते जणू! सायन्स/शास्त्र याचं श्रेय मेंदुतल्या कॉर्टिसोल या रासायनिक घटकाच्या मुक्त संचाराला किंवा प्रवाहाला देतं, हा घटक नकारात्मक विचारांना चालना देतो. कॉर्टिसोल पटकन आणि सहजपणे स्त्रवतं, पण सकारात्मक विचार निर्माण करणारा, आनंद निर्माण करणारा रासायनिक घटक, डोपामाईन, स्त्रवण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळेच आपल्याला चिडण्यासाठी, उदास होण्यासाठी किंवा स्वतःवरचं नियंत्रण गमावण्यासाठी फार वेळ वा कष्ट लागत नाहीत, ते अगदी सहज घडून जातं. पण आनंद, समाधान मिळवण्यासाठी खूप काही करावं लागतं आणि वेळही तुलनेने जास्त लागतो.

            अधिक डोपामाइन तयार करण्यासाठी आणि आपल्या जीवनात सकारात्मक परिणाम आणण्यासाठी जर आपल्या मेंदूला नव्याने प्रशिक्षण देता आलं तर? तर किती बरं होईल, आपलं आयुष्यच बदलून जाईल. आपली उत्पादकता वाढेल, कल्पकता वाढेल. कितीतरी वेळ आणि उर्जा जी आपण रागावण्यात, चिंता करण्यात वा नकारात्मक विचार करण्यात घालवतो ती वाचेल. सहजतेने योजलेली अनेक ध्येयं आपण साध्य करु शकू.  कल्पना करा आपलं शरीर, मन अधिक सुदृढ असेल, मनात असेल ते मिळवण्याची क्षमता आपल्याकडे असेल. आणि कल्पना करा की हे सगळं घडत असताना आपण पूर्ण शांती आणि आनंदाचा अनुभव घेत असू.  सामान्य जीवनातून हे सर्व मिळवत असताना आपण लोकांसमोर एक आदर्श ठेवू शकू. हा आनंदी, समाधानी जीवनाचा, विचारसरणीचा वारसा आपण पुढच्या पिढीला देऊ शकू. यासाठी सर्वात आधी काय करायला हवं तर आपण स्वतःची नकारात्मक विचारांपासून मुक्तता करुन घ्यायला हवी.  म्हणजेच शास्त्रीय भाषेत सांगायचं तर आपल्या मेंदुतल्या कॉर्टिसोलच्या पातळीवर विजय मिळवायला हवा आणि डोपामाइनचे स्राव वाढविण्यास मदत करायला हवी. घाबरू नका, यासाठी कोणतंही कर्मकांड, धार्मिक विधी, फार मोठा त्याग वगैरे काहीही करायचं नाहीये. एकच काम करायचय ते म्हणजे आपलं स्वतःबरोबरचं संभाषण बदलायचय. त्या संभाषणाचा दर्जा उंचावायचा आहे. ते संभाषण जास्तीत जास्त सकारात्मक कसं होईल याकडे लक्ष द्यायचय. इतरांशी संभाषण होत राहीलच पण स्वसंभाषण महत्वाचं आहे. तुमच्या जीवनाचा दर्जा तुमच्या स्वसंभाषणाच्या दर्जावर पूर्णतः अवलंबून आहे.

श्रुती संकोळी, ९८८१३०९९७५

Leave a Reply

Close Menu