दृष्टीकोन महिला दिनाचा

 ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्याचा हा दिवस. अलिकडे या दिवसाला इव्हेंटचे स्वरुप आले आहे. संस्था, मंडळांच्या माध्यमातून या दिवसाचे औचित्य साधून महिलांना व्यासपीठ मिळवून देणारे कार्यक्रम आयोजित केले जात असतात. सर्वच राजकीय पक्ष या दिवशी काहीतरी उपक्रम राबवित असतात. या बाबी निश्चितच कौतुकास्पद आहेत. तरी देखील स्त्री-पुरुष सर्वांनीच आता महिला दिन इव्हेंटच्या पलिकडे जाऊन विचार करण्याची गरज प्रकर्षाने जाणवते.

    आज स्त्रीयांनी सर्व क्षेत्र व्यापली आहेत. स्त्री तिच्या जीवनात अनेक जबाबदा-या पार पाडते. ती कुणाची मुलगी, पत्नी, बहिण या विविध नात्यांमध्ये वावरताना तिने स्वतःला नेमकं काय हवं आहे याचा विचार करायला हवा. चाकोरीबाहेरचे काम करताना तिची वाट सोपी होण्यासाठी समविचारी स्त्री-पुरुषांनी मिळून प्रयत्न करायला हवेत.

    स्वयंसहाय्यता बचत गटाच्या माध्यमातून एकत्र येणा-या महिला आज सर्व प्रकारच्या कार्यक्रमासाठी हक्काच्या  प्रेक्षक बनल्या आहेत. बचतगट चळवळ ही नक्कीच स्त्रीच्या कर्तृत्वाला प्रेरणा देणारे बलस्थान आहे. पण हे सर्व घडताना आपल्या समुह शक्तीचा कुणी वापर करुन घेत नाही ना! हे सजगपणे तपासलं पाहिजे.

    एकीकडे स्त्रीच्या कर्तृत्वाचा आलेख उंचावत असताना महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गुंतागुंतीचा होत चालला आहे. कठोर कायदे असून देखील महिला अत्याचारांच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. या बाबतीत अलिकडच्या काही वर्षात वाढलेली प्रवृत्ती म्हणजे अशा घटनांचा निषेध व्यक्त करणे, जनमताचा दबाव कायम ठेवणे याबाबतीतही राजकीय पक्षांचे महिला नेतृत्व, कार्यकर्ते हे आपल्या पक्षाचे सरकार अडचणीत तर येणार नाही याचीच काळजी आधी घेताना दिसत आहे.

    पिडीत महिलेची जात, धर्म बघून स्ट्रॅटेजीठरवली जाऊ लागली आहे. फेसबुक, ट्विटर, युट्युब व्हिडीओ या नवसमाज माध्यमातून फेक व्हिडीओ प्रसारित करणे, त्यावर अश्लील कमेंटस देणे अशा प्रकाराने पिडीतेचे चारित्र्य हनन करुन तिच्या कुटुंबियांचे मानसिक खच्चीकरण करण्याचे प्रकार वाढत आहेत. अशा आक्षेपार्ह व्हिडीओंची सायबर सेलकडे तक्रार केल्यानंतर व्हिडीओ डिलीट होतो. संबंधितांवर कारवाई होते. परंतु, तोपर्यंत व्हायची ती बदनामी होऊन गेलेली असते.

    अशा  या  बदलेल्या आव्हानात्मक परिस्थितीत सर्वांनीच एक रणनिती आखण्याची गरज आहे. पोलिस, न्यायालये, प्रसार माध्यमे याबरोबरीनेच समाजातील सर्व घटकांची अत्यंत जबाबदारीने अत्याचारातून सावरणा-या पिडीत व्यक्तीला भक्कम पाठींबा दिला पाहिजे. महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देणा-या सावित्रीबाई फुले, महिलांच्या बाबतीतील अनिष्ट प्रथांविरोधात कृती करणारे राजा राममोहन रॉय, गोपाळ गणेश आगरकर, धोंडो केशव कर्वे या सर्वांनीच तत्कालिन समाजाचा प्रचंड विरोध पत्करला. त्यामुळेच आज काही सकारात्मक बदल दिसत आहेत. एकूणच समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी बदलत्या आव्हानांना स्त्री-पुरुष सर्वांनीच सक्षमपणे तोंड द्यायला हवे आहे. तरच एका सजग समाज म्हणून आपल्या देशाची ओळख राहिल.

Leave a Reply

Close Menu