नुकताच जागतिक महिलादिन होऊन गेला. त्यानिमित्ताने सोशल मीडियावर अनेक वेगवगळ्या पोस्ट बघायला मिळाल्या. स्त्रीवादाची चर्चा करणाऱ्या.. काही बाजूने, काही विरूद्ध, हवा की नको, किती असावा वगैरे वगैरे… ह्या प्रश्‍नाच्या उत्तरात मला पडायचं नाही. कारण एकतर तो खूपच खोल विषय आहे आणि दुसरं म्हणजे ही उत्तरं खूप वैयक्तिक असू शकतात. मला मी स्त्रीवादी होण्याचा प्रवास आज मांडायचा आहे.. अगदी सहज. त्यामागे कोणत्याही क्रांतीचा हेतू नाही.
मी, मी, आई आणि मला सांभाळणारी ताई अशा सगळ्या स्त्रिया असणाऱ्या कुटुंबात वाढले. त्यात माझी आई स्त्रीवादी. नात्यातले इतर पुरुष सुद्धा समंजस, मोकळ्या मनाचे आणि विचारांचे. त्यामुळे मला एक मुलगी म्हणून ना कधी दुय्यम वागणूक मिळाली ना माझ्यावर कधी अन्याय झाला. माझ्या आसपासही तसं चांगलं वातावरण होतं. बारावी नंतर मी शिकायला मुंबईत रुपारेल कॉलेजला गेले. तिथल्या माझ्या मैत्रिणी, प्रोफेसर तर स्वतःची ठाम मत असणाऱ्या, तसचं वागणाऱ्या. त्यामुळे स्त्रीवादाशी माझी ओळख तशी लहानपणापासून असली तरी हा सगळा काळ मला स्त्रीवाद हे एक ढोंग आहे असं अगदी वाटत नसलं तरी हे एक मुठभर सुशिक्षित स्त्रियांचं फॅड आहे आणि ज्यांना खरच त्याची गरज आहे त्यांना त्याची जाणीवच नाहीये किंवा त्यांना ते परवडणार नाहीये असंच वाटतं होतं.
मी जेव्हा टाटा सामाजिक विज्ञान च्या आयकॉल या मनोसमाजिक हेल्पलाईन वर समुपदेशक म्हणून काम करायला सुरवात केली तेव्हा स्त्रीवाद समजून घ्यायला माझी खरी सुरवात झाली. आणि मला इथे नक्की सांगायला आवडेल की माझा तिथला बॉस, पारस जो एक पुरुष आहे, त्याचा ह्यात खूप मोठा वाटा होता. एकतर तिथे आम्हाला भारतभरातून फोन यायचे. त्यामुळे विविध भौगोलिक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्तरावरील स्त्रियांच्या समस्या मला खूप जवळून अनुभवायला मिळायला लागल्या. एखादी नवरा बायकोच्या भांडणाची केस आली तर काही वेळा अस वाटायचं की ही बाई पण अती करतेय. अशा वेळी आमच्या केस डिस्कशन मध्ये पारसशी बोलताना नवीनच मुद्दे समोर यायचे. आपला समाज प्रसंग काहीही असला तरी चूक बाईची आहे हे चित्र कसं सहज बेमालूम पणे उभ करू शकतो हे तो आम्हाला दाखवून द्यायचा आणि मग वाटायचं अरे खरच ह्या दृष्टीने आपण विचारच केला नव्हता. ती आभासी चित्र असतात ना म्हणजे आपण फ्लॉवर पॉट बघत असतो आणि कुणीतरी आपल्याला म्हणत हे बघ ह्यात दोन चेहरे पण आहेत. मग आपल्याला अचानक इतका वेळ त्याच चित्रात असलेले आणि तरी न दिसलेले चेहरे ठळकपणे दिसायला लागतात. तसच काहीसं झालं. पारसने हा मदर इंडियाचं दुःख बघण्याचा चष्मा दिला आणि असंच झालं. मग मला असे अनेक छुपे डाव दिसायला लागले. अगदी माझ्या आसपास, घरात सुद्धा..
माझी स्त्रीवादी आई सुद्धा मला सांगायची, “लहान कपडे घालून बाहेर जाऊ नको;” “तू म्हणतेस ते बरोबर आहे, पण असं कसं जाणार पाळी असताना देवळात“ असं मैत्रिणी म्हणायच्या. “तू एकटी जाऊ शकतेस पण आज मी आहे तर येतो सोडायला.“ असं माझा एखादा पुरुष सहकारी म्हणायचा. हे असे प्रकार हळूहळू माझ्या लक्षात यायला लागले. लग्न विषय आला की मग तर हे सगळं एका वेगळ्याच पातळीवर जात. इतकी वर्ष गोरीच बायको हवी, अमुकच उंचीची हवी, सुगरणच हवी वगैरे अपेक्षा करणाऱ्या मुलांच्या अपेक्षा अती नव्हत्या पण आता मुलींना स्वतःच घर असणारा, चांगला पगार असलेला नवरा हवा असेल तर मुलींच्या अपेक्षा वाढल्यात. आजही अनेकवेळा मुलीच्या घरच्यांनी लग्नाचा खर्च करावा अशी अपेक्षा केली जाते. आम्ही आमच्या आई वडिलांना सोडून यायचं. आम्हीच का सासरी जायचं हा प्रश्‍न सुद्धा आमच्या मनात येत नाही. (म्हणजे माझ्यातरी इतके दिवस नव्हता आला.) पण आम्ही नवऱ्याला तसं म्हटलं की सुनेने घर फोडलं. आमच्या पिढीतले बरेच नवरे घरातली कामं करतात. पण त्याबद्दल समाजात बोलतानाचा सुर ऐकलात तर तो त्यांच्या कौतुका पेक्षा “काय करणार आजकाल मुली नवऱ्याला कामाला लावतातच“ असा असतो. कितीही सुशिक्षित घर असलं तरी नवऱ्याने घरात शॉर्ट्स घातलेली चालते पण सुनेने घातली तर? ती एखादा दिवस 10 वाजता उठली तर? बाबा मुलाचा अभ्यास न घेता मित्रांना भेटायला गेलेला चालतो पण आई गेली तर? सासू सुनेच, जावा जावांचं भांडण झालं की म्हणायचं बाईच बाईची शत्रू असते, आणि हाणामारी वर येईपर्यंत दोन पुरुष भांडतात तेव्हा? देवाधर्माकडे तर जायलाच नको. सुपारी लावून पूजेला बसता येत मग नारळ बांधून का नाही? नवरा विष्णूचा अवतार म्हणून त्याचे पाय धुवा मग नवरी लक्ष्मीचा म्हणून तिचे का नाही? प्रिय गोष्टीचा त्याग करा म्हणून कन्यादान मग मुलगा काय अप्रिय असतो? लग्नानंतर नाव बदललं नाही तरी चालेल असा कायदा आहे पण प्रत्यक्षात तुम्ही सरकारी कार्यालयात गेलात की तो अधिकारी विचारणार “अहो नवऱ्याच नाव का नाही लावत?“ शाळेत मुलाच्या आईचं पण नाव लावायचं असा कायदा आहे. पण शाळेत तस नाव सांगायला शिकवतात का? उदा. किती मुलं अजय सुनील गीता सावंत असं नाव सांगतात?.. मला अगदीच माहितेय की मी विचारत असलेले प्रश्‍न खूपच आदर्शवादी आहेत. इतकी ह्या पातळीवरची समानता यायला किती वर्ष लागतील माहीत नाही. पण तो चष्मा घातल्यापासून अशा असंख्य गोष्टी दिसत राहतात. आजही जेव्हा फेसबुकवर माझ्या एखाद्या मैत्रिणीने स्त्रीवादी भूमिका घेतली की लगेच तिच्यावर टीका होते तेव्हा गुलजार साहेबांनी लिहिलेल्या ओळी आठवतात,
कितनी  गिरहें खोली हैं मैने    कितनी गिरहें अब बाकी हैं
मला मान्य आहे काळ बदलतोय, खूप चांगल्या गोष्टीही घडत आहेत पण त्याचा वेग आणि त्यांची पोच खूपच कमी आहे. मला हे ही मान्य आहे की काही गोष्टी आपल्याला वैयक्तिक, तात्विक पातळीवर पटल्या तरी समाज अजून बदलला नसल्याने त्या करणं शक्य नाहीये. पण हा विचार व्हायला हवा. ही दुय्यम वागणूक आहे ह्याची जाणीव व्हायला हवी. घरातली बाई फक्त नोकरी करायला लागली म्हणजे तिला समान वागणूक मिळते असं नाही. किंवा तिला मारहाण होत नाही म्हणजे तिला सन्मान मिळतो असं नाही हे समजायला हवं.
ह्यावर बोलू तेवढं थोड आहे आणि बोलू त्या मुद्द्याला अनेक अंग आहेत. मी मगाशी उल्लेख केला त्या पारसने एकदा मला विचारलं होत, “बाईला माणूस म्हणून वागवलं जावं असं तुला वाटतं ना? मग तू झालीसच स्त्रीवादी!“ आणि त्या दिवसापासूनच मी खरंच स्त्रीवादी झाले!
– भक्ती करंबेळकर
                                                                                                      9920815407

Leave a Reply

Close Menu