भाजप-शिवसेना युती तुटण्याच्या अंतिम पर्वात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड मातोश्रीवर फक्त दोघांचीच चर्चा झाली. दोन्ही पक्षात समझोता व्हावा, आघाडी कायम रहावी, या पार्श्वभूमीवर या चर्चेतून आश्वासक निर्णय होईल, अशी अपेक्षा होती. आता गेले वर्षभर दोन्ही पक्ष वेगळ्या वाटेवर आहेत. शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी या २ पक्षांशी दोस्ती करुन महाआघाडीची स्थापना केली. खरे तर मुख्यमंत्रीपद हाच भाजप व शिवसेना यांची २५ वर्षांची मैत्री संपुष्टात आणणारा कळीचा मुद्दा होता. याच संदर्भात अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता. त्यानुसार विधानसभेची निवडणूकही दोन्ही पक्षांनी लढविली. परंतु, दिलेला शब्द भाजपने पाळला नाही. यामुळे उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनानंतर महाआघाडीची स्थापना करुन मुख्यमंत्रीपद मिळविले.

      यापूर्वी आणखी एक नाट्य राज्यात घडले. काही काळासाठी राष्ट्रपती राजवट आली व भल्या पहाटे राजकीय भूकंप व्हावा, अशी घटना घडली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची पहाटेच शपथ घेऊन राजकीय हादरा दिला. ध्यानी-मनी नसताना रातोरात राष्ट्रपती राजवट उठवून झालेल्या शपथविधीच्या कार्यक्रमानंतर राजकीय पटलावर प्रचंड गदारोळ झाला. यामध्ये शरद पवार यांनी आपले कौशल्य पणाला लावून भाजपला रोखण्यासाठी तीन पक्षांना एकत्र आणले. अजितदादा पवार यांना माघारी बोलावले आणि देवेंद्र फडणवीस यांचे औट घटकेचे सरकार पायउतार झाले. हा तपशील लक्षात घेतल्याशिवाय सध्या बंद दाराआडच्या चर्चेतील पुढे येणारे मुद्दे आणि त्यामागचे राजकारण या गोष्टी समजणार नाहीत. कोकण दौर्‍-यावर गेल्या महिन्यात गृहमंत्री अमित शहा आले होते. त्यावेळी त्यांनी या विषयाला तोंड फोडले. उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या चर्चेत मी कोणताही शब्द दिला नव्हता, असे स्पष्ट करुन शिवसेनेने बाळासाहेबांचे विचार तापी नदीत बुडविले, असा आरोप केला. हाच मुद्दा सध्या सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित करून गृहमंत्री अमित शहांसह भाजपवर चौफेर हल्ला केला.

      शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीमध्ये पवित्र असलेल्या ठिकाणी आमची चर्चा झाली. त्यावेळी आम्ही दोघेच होतो. अमित शहा यांनी मला शब्द दिला होता. परंतु, आता असा शब्द दिला नव्हता, असा खोटारडेपणा केला जात आहे. एवढेच नव्हे तर भाजपने बाबरी मशिद पाडल्यानंतर बाजू काढली. या उलट बाळासाहेब ठाकरे यांनी या घटनेचा मला गर्व आहे, अशा शब्दात शिवसैनिकांची पाठराखण केली. शेतकरी आंदोलनापासून पेट्रोल, डिझेल आणि गॅस यांच्या वाढत्या किमतीचा मुद्दा सुद्धा उपस्थित करीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. परंतु, यातून बंद दाराआड नेमकी चर्चा काय झाली आणि त्यासंदर्भात अमित शहा एक बोलतात तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुसरे बोलतात. त्यामुळे या नाट्यातील संभ्रम अजुनही कायम आहे. त्यामुळे यातील खरे कोण? आणि खोटे कोण? असा प्रश्न जनतेला पडला आहे. बंद दाराआडच्या चर्चेनंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. सर्वाधिक जागा जिंकून सुद्धा भाजपला विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे आणि त्यांची खरी सल हीच आहे. या उलट तीन पक्ष एकत्र येऊन आघाडीचे शासन तयार होते आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद येते, अशा सा-या गोष्टी आपण पाहत आहोत.

      भाजप-शिवसेना यांचे मार्ग आता वेगळे झाले आहेत. त्यामुळे बंद दाराआड चर्चा काय झाली, याचे चर्वितचर्वण करण्याची खरे तर आता गरजच नाही. परंतु, अशा मुद्याला राजकीय पटलावर व खास करुन माध्यमांमध्ये मोठे महत्त्व असते. त्यामुळेच एखाद्या विषयावरुन लक्ष विचलित करण्यासाठी असे मुद्दे येतच असतात, ही गोष्ट काही नवीन नाही. कोरोनाचा कहर पुन्हा सुरु झाला आहे. बेरोजगारीमुळे युवा वर्ग अवस्थ आहे. कृषी कायद्याविरोधात शेतकरी रस्त्यावर आला आहे. भाववाढीमुळे सामान्य जनता मेटाकुटीस आली आहे. या पार्श्वभूमीवर असले राजकीय आरोप-प्रत्यारोप करून वेळ घालविण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नासाठी काहीतरी भरीव करण्याची आणि जनतेला दिलासा देण्याची गरज आहे. खरे कोण? खोटे कोण? यात जनतेला स्वारस्य नाही. आमचे प्रश्न कधी सुटणार? हाच त्यांच्या चिंतेचा विषय आहे. यात खरे खोटेपणा शोधण्यापेक्षा नेमके वास्तव काय आहे, हे जनतेसमोर यायला हवे. आजवरच्या चर्चेतून संभ्रम कायम राहिल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Close Menu