अष्टपैलू व्यक्तिमत्व मधुसूदन कालेलकर

“”गीतकार, नाटककार, कथाकार आणि पटकथाकार म्हणून सा-यांना सुपरिचित असलेले नाव म्हणजे “मधुसूदन कालेलकर‘. कालेलकरांचा जन्म कोकणातील वेंगुल्र्याचा. “”मी चित्रपटात  यशस्वी झालो, पण नाटकात अयशस्वी. वसंत कानेटकर नाटकात यशस्वी पण चित्रपटात अयशस्वी. पण आमचा मधु कालेलकर हा नाटक व चित्रपट दोन्हींकडे यशस्वी व सरस ठरला””, अशा शब्दांत गदिमांनी कालेलकरांना गौरवलं आहे. अशा या थोर व्यक्तिमत्वाचे नाव वेंगुल्र्यातील भव्य अशा बहुद्देशीय सभागृहाला देऊन त्यांच्या आठवणी जीवंत ठेवल्या आहेत. वेंगुर्ला नगरपरिषदेने कॅम्प येथे मल्टिपर्पज हॉल (नाट¬गृह/चित्रपटगृह) असा 700 खुच्र्यांचा वातानुकूलित सभागृह तर सभा समारंभासाठी (लग्नसमारंभ आदी कार्यक्रम) दुसरा बहुउद्देशीय हॉल तसेच सुमारे 35 ते 40 दुकान गाळ्यांचे वाणिज्य संकुल, बाहेरील बाजूस प्रशस्त पार्किंगची सोय एकाच छताखाली उपलब्ध करुन दिली आहे. या हॉल नजिक कवी मंगेश पाडगावकर बालोद्यानही उभारले आहे. व्यापाराचे विकेंद्रीकरण आणि शहरातील वाडी, वस्त्या या सर्वांच्या विकासाच्या दृष्टीने उभारलेल्या मल्टिपर्पज हॉलला कलाक्षेत्रात विलक्षण उंची गाठलेल्या व्यक्तिमत्वाचे नाव “मधुसूदन कालेलकर बहुउद्देशिय सभागृहअसे नाव देऊन वेंगुर्ला नगरपरिषदेने त्यांना आदरांजली वाहिली आहे.

        “कालेलकरमूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्रातील कालेली या गावचे. त्यांचे पूर्वज कुटुंबासहीत कालेली येथून चरितार्थासाठी वेंगुल्र्यात आले. मधुसूदन कालेलकर यांचा जन्म 22 मार्च 1924 साली वेंगुर्ला येथे झाला. त्यांचे बालपण रामेश्वर मंदिर लगतच्या गल्लीत गेले. (सध्याचा डॉ. मांजरेकर यांचा दवाखाना) तर प्रारंभीचे शिक्षण जॉर्ज इंग्लिश स्कूलमध्ये (आताचे पाटकर हायस्कुल) झाले. 1940 साली ते मॅट्रिकच्या वर्गात होते. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने मॅट्रिकची फी भरायला सुद्धा त्यांच्याजवळ पैसे नव्हते. त्यावेळचे त्यांचे मुख्याध्यापक श्री.नाबर यांनी त्यांच्या परीक्षा फॉर्मचे पैसे भरुन कोल्हापूर येथे परीक्षेला जाण्यासाठीही पैसे दिले आणि ही “गुरुदक्षिणाकालेलकर यांनी “अपराध मीच केलाया नाटकांमधील “गोळे मास्तरांचीअमर व्यक्तिरेखा रेखाटून फेडली. नाबर मास्तर गोळे मास्तरांच्या रुपाने रंगभूमीवर अमर झाले.

        कालेलकर यांचे बालपण आजोबांच्या करड¬ा शिस्तीखाली गेले. घरात एकूण 6 बहीण-भावंडे. वडील घर सोडून गेलेले. आईवर सर्व कुटुंबाचा भार. त्या काळात आई नोकरी करायची. 1920 ते 1957 या काळात या माऊलीने “एमआर‘ (मेडिकल रिप्रेझेन्टेटीव्ह) म्हणून काम करुन संसाराचा डोलारा सांभाळला. तिसरी-चौथी शिकलेल्या आईचे अक्षर देखणे होते. बोलण्यातील कारुण्याला विनोदाची झालर होती. अक्षराची आणि विनोदाची देणगी कालेलकरांना मिळाली ती आपल्या आईकडूनच. आपल्या आजीलाही ते प्रचंड मानत. घरातील सर्व तिला “काकाईअसे म्हणत. ही “काकाईकालेलकर यांची दैवत होती. ते आपले लिखाण काकाईला वाचून दाखवित. कुठलीही नवीन गोष्ट घडली की ते प्रथम काकाईला सांगायचे. इतकेच नव्हे तर लग्नासाठी नवरी मुलगी पसंत केली तीही प्रथम त्यांनी आजीलाच दाखविली. आजीवर त्यांचे अमाप प्रेेम, श्रद्धा होती. आपल्या मोठेपणाचे, घडण्याचे श्रेय ते आपल्या या आजीलाच देत.

        मॅट्रिक परीक्षेनंतर मुंबईच्या गिरगावच्या चाळीत ते आपल्या आत्याकडे राहायला आले. एक नाटककार म्हणून त्यांची जडणघडण झाली ती त्यांच्या आत्या “ताराबाई रेगेयांच्याकडेच! त्यांचे घर छोटेसेच होते. दोन खोल्यांचे. त्यात तिची 5 मुले, पैकी 3 मुली. राहायला अडचणच व्हायची. पण आत्याचा स्वभाव आनंदी तसेच त्यागी. जे जे काही चांगले असेल ते लोकांना द्यावे ही आत्याची वृत्ती. तिच वृत्ती कालेलकरांमध्ये जोपासली गेली. पुढे समाजात जी काही नाटके त्यांच्या हातून लिहिली गेली त्या सगळ्याचे बीज त्यांच्यावर झालेल्या आत्याकडील संस्कारात सापडते.

        वयाच्या 18व्या वर्षी  1943 साली त्यांनी “संगीत उद्याचे जगहे पहिले नाटक लिहिले आणि नाटककार हा “टिळात्यांच्या कपाळी लागला. तरी लेखन हा पोटापाण्याचा व्यवसाय होऊ शकत नाही. चरितार्थ चालवण्यासाठी पैसा हवा म्हणून त्यांनी अनेक नोक-या केल्या. पण नोकरीत ते रमू शकले नाहीत. रेशनिंग पासून टेक्सटाईलपर्यंत अनेक नोक-या त्यांनी केल्या. लिव्हर ब्रादर्स कंपनीत बोटीवर पॅकिंगवर मार्किंग करण्याचे सामान्य दर्जाचे कामही त्यांनी केले. (त्यामुळेच त्यांना “अपराध मीच केलामधील नेव्ही कमांडर अशोक वर्टी रंगविता आला.) 1949 साली न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी मधील चांगली नोकरी लेखक बनण्याच्या नादात गमवावी लागली. या कंपनीत काम करीत असताना त्यांच्यातील क्रिकेटपटूला वाव मिळाला. टाईम्स शिल्ड स्पर्धेमध्ये न्यू इंडियाच्यावतीने खेळताना आघाडीचा जलद गोलंदाज आणि उत्तम फलंदाज म्हणून त्यांनी नाव मिळविले. साहित्याप्रमाणेच त्यांनी क्रिडा क्षेत्रातही अष्टपैलू म्हणून कामगिरी केली. पण आजारपणामुळे त्यांचे क्रिकेटचे वेड त्यांना थांबवावे लागले.

        6 जून 1946 साली वयाच्या 22 वर्षी गिरगावांतील लक्ष्मीबागेत मुहूर्त नसतानाही त्यांचे लग्न झाले. त्यांचा प्रेमविवाह होता. पत्नीचे नाव होते विमल. लग्नादिवशी त्यांना आपल्या पत्नीच्या पायात चप्पल नसल्याचे लक्षात आले आणि ते घेण्यासाठी मंडपातून हळूच ते सटकले व मुहूर्तानंतर तब्बल अध्र्या तासाने नववधू व तिच्या नविन चपलांसह ते मंडपात आले. साहजिकच  त्यांची बिन पाण्याची हजामत झाली. परंतु यथासांग लग्न कार्य संपन्न झाले.

        कालेलकर यांची काही नाटके तुफान चालली तर काही आपटली. अनेकांचा राबता त्यावेळी घरी कायमच असायचा. संसाराचा गाडा ओढणे अतिशय कठीण होऊन जात असे. पण तरीही त्यांची पत्नी विमल सदैव त्यांच्या पाठीशी उभी राहिली. कालेलकर म्हणत, “पडत्या काळात जिने मला सावरलं, आणि आल्या गेलेल्यांना विन्मुख न पाठवता हसतमुखाने त्यांचं सर्व केलं. त्यामुळे मला मिळालेल्या सा-या यशाचं श्रेय द्यायचं झालं तर ते गजाननाच्या कृपेने माझ्या बायकोलाच द्यावे लागेल.

        मुळात नाटककार होण्याचे त्यांचे स्वप्न होते. पण त्यांना आपण चित्रपट कथा लिहावी असे वाटू लागले. “अखेर जमलंया चित्रपटाची कथा पटकथा संवाद आणि गाणी घेऊन कालेलकर निर्मात्यांचे उंबरठे झिजवू लागले. पण कुठेच ताळमेळ बसेना. कारण, त्यावेळी “गदिमांचेयुग सुरु होते. सुमारे 1 वर्षानंतर त्यांचे भाग्य उजळले. वि.ज.घारपुरे नावाचे एक वकील निर्माते म्हणून त्यांना सापडले. त्यांना कालेलकर यांची कथा-पटकथा आवडली, पण त्यांची एक विचित्र अट होती. कालेलकरांची आणि त्यांची कुंडली जमली पाहिजे. कालेलकर यांनी 5 रुपये देऊन घारपुरे वकिलांच्या पत्रिकेशी जुळणारी खोटी पत्रिका करवून घेतली आणि हा त्यांचा पहिला चित्रपट 1952 साली पडद्यावर झळकला आणि चित्रपट कथालेखक म्हणून त्यांचा जमही बसला. या चित्रपटात राजा गोसावी, शरद तळवलकर हे प्रथम चमकले.

        1957 साली “फिल्मिस्तानचे मालक तोलाराम जालन यांनी मराठी विभाग सुरु केला आणि यात कालेलकर यांना महीना 1 हजार रुपयावर चित्रपट कथालेखक म्हणून नोकरीसाठी बोलावण्यात आले. हिंदी आणि मराठी या क्षेत्रात कथा, पटकथा, संवाद आणि गाणी अशी बिरुदे घेऊन ते लिलया लोकांसमोर वावरु लागले. यावेळी अनेक नवोदितांना हिरो- हिराईन म्हणून त्यांनी संधी दिली.”फिल्मीस्तानमध्ये जम बसत असताना 1964 साली लिहिलेले “दिल्या घरी तू सुखी रहा‘, 1965 सालचे “दिवा जळू दे सारी रातअशी सदाबहार नाटके लिहून नाट¬ क्षेत्रातही त्यांनी आपले अढळ स्थान निर्माण केले. 1 सप्टेंबर 1964 साधी त्यांनी स्वत:ची “नाट¬वैभवही नाट¬ संस्था काढली. राजा नेने, राजा परांजपे, राजा गोसावी, अरुण सरनाईक शरद तळवलकर, बबन प्रभू, लता थत्ते अशा लोकप्रिय कलाकारांच्या ताफा या कंपनीत होता. लेखन, निर्मिती, व्यवस्थापन, जाहिरात, दौ-याचे सूत्रसंचालन या सगळ्या गोष्टीत त्यांनी स्वत:ला झोकून दिले. या संस्थेवर कितीतरी कुटुंबे पोसली जात होती. ज्यांना काही येत नसे त्याची नेमणूक मॅनेजरपदी होई. त्यामुळे कलाकरांपेक्षा मॅनेजरपदी भराणा अधिक होता. कितीतरी लोकांचा चरितार्थ चालत होता किंबहुना यासाठीच ही नाट¬संस्था त्यांनी स्थापन केली होती. त्यामुळे “फिल्मिस्तानच्या व्यापातून वेळ काढून त्यांना दरवर्र्षी एक तरी नाटक लिहावेच लागे. म्हणूनच कलाकार मंडळी कालेलकर नवोदितांना, बॅक स्टेज लोकांसाठी अन्नदाते ठरत असल्याने त्यांना आपुलकीने “अण्णाया नावाने हाक मारत. वडिलांच्या  पावलावर पाऊल ठेवत अनिल कालेलकर यांनीही त्यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पहायला सुरुवात केली. अनिल यांच्या नावावरही हिंदी, मराठी, गुजराती चित्रपटांचे लेखन तसेच सस्पेन्स, थ्रीलर मालिकांच्या लेखनाचे विक्रम नावावर आहेत. त्यांनी लिहिलेल्या “बंदिनी‘, “परमवीर‘, “हॅलो इन्स्पेक्टरया तिन मालिकांना सतत तीन वर्षे सर्वोत्कृष्ट मालिकेचे पारितोषिक मिळाले आहे.

        मधुसूदन कालेलकर यांची अनिल, (कै.) शिरिष, सुधीर, सुनिल, जयश्री ही मुले आणि पुतण्या हेमंत हे कायमच कालेलकरांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी नवनवीन कार्यक्रमांचे आयोजन करतात. एक एक चित्रपट कालेलकर अक्षरश: दोन ते चार तासात लिहून पूर्ण करीत आणि हे लिखाण एक टाकी असे. कुठेही खाडाखोड नसलेले ते लिखाण वाचताना वाचणारा अचंबित होई. कुठल्या वाक्याला टाळ्या पडतील हे ते अचुक सांगत. एवढी दुरदृष्टी त्यांच्या ठायी होती. अशा या बहुआयामी  व्यक्तीला 17 डिसेंबर 1985 रोजी वयाच्या 61व्या वर्षी देवाज्ञा झाली. ह्मदयविकाराचे दोन धक्के पचवूनही त्यांनी त्यांची कारकिर्द साहित्यिक क्षेत्रात उंचावली.

        मधुसूदन कालेलकर यांनी एकूण 29 नाटके आणि हिंदी, मराठी मिळून 118 चित्रपटांसाठी लेखन केले. “बात एक रात की‘, “लव्ह मास्टर‘, “झुमरु‘, “फरार‘, “दुल्हन वही जो पिया मन भाए‘, “अखियोके झरोेकेसे‘, “गीत गाता चलहे त्यांचे काही प्रसिद्ध चित्रपट. 1964-65 साली मराठी चित्रपटांसाठीचा दुहेरी पुरस्कार, 1970 साली “अपराध‘, 1974ला “जावई विकत घेणे आहे‘, “अनोळखी‘, “गुपचुप गुपचूप‘, “बाळा गाऊ कशी अंगाईयासाठी नऊवेळा सर्वोत्तम मराठी चित्रपट पुरस्कार, 1978 सालचा सर्वोत्तम पटकथा लेखनाचा “फिल्मफेअरपुरस्कार, “लिंबोणीच्या झाडामागेया अंगाई गीतास गीत लेखनाचा पुरस्कारही त्यांना प्राप्त झाला. “अ, आ आई, म म मका‘ (एक धागा सुखाचा), “सुख आले माझ्या दारी‘ (आलीया भोगासी), “सुर तेच छेडिता‘, “सांग कधी कळणार तुला‘  (अपराध), “तु सुखकर्ता आणि करविता‘ (अष्टविनायक) ही त्यांची गाणी आजही रसिकांच्या ओठावर आहेत.                                           सीमा शशांक मराठे.

संदर्भ – नाटककार मधुसूदन कालेलकर-डॉ.सौ.नसिम एहतेशाम देशमुख, लेखन सहाय्य श्री.अनिल, श्री.सुधीर आणि श्री.हेमंत कालेलकर, प्रशांत आपटे.

फोटो सहाय्य – हेमंत कालेलकर.

 

Leave a Reply

Close Menu