३० मार्च हा जागतिक बायपोलर दिनत्यानिमित्ताने या आजाराची तोंडओळख..

          तो माझा सायकीयाट्री विभागातला पहिला दिवस होता. मी ओपीडीत वरिष्ठ डॉक्टरांसोबत पेशंट पाहत होतो. एवढ्यात भडक मेकअप केलेली नीट नेटका फ्रॉक घातलेली साधारण पन्नाशीची बाई आली, ‘‘हॅलो डॉक्टर कसे आहात? नवीन दिसता, मानसशास्त्र शिकता काय? छान! छान! तुमच्या स्वागतासाठी मुद्दाम आलेय,‘‘ एवढे बोलून त्यांनी आपल्या पिशवीतून सामोसा काढला ‘‘सामोसा घ्या लाजू नका, आताच बेकर्स शॉप मधून आणलाय. तिथले सामोसे फार छान असतात. पण तुमचे हॉस्पिटलचे कँटीन एकदम खराब. आरोग्याचे काहीच नियम पाळत नाही. मी संचालकांकडे तक्रार करणार आहे, ते माझ्या चांगल्या ओळखीचे आहेत. तुम्हाला जर काही अडचण असेल तर संचालकांना भेटून माझे नाव सांगा.‘‘ याशिवाय आपण मिसेस फ्रँकलिन असून सचिवालयात आपल्या कशा ओळखी आहेत, आपण समाजसेवा कशी करते, आपले कुटुंब कसे आहेत, मिस्टर फ्रँकलिन कसे विसरभोळे आहेत, वैगरे सांगून आपल्या उपवर मुलीसाठी नवरा शोधण्याची जबाबदारीही त्यांनी माझ्यावर टाकली. सिस्टरने ‘‘डॉक्टरना त्रास देऊ नका, तुमचा नंबर अजून आलेला नाही‘‘, असे सांगून त्यांना बाहेर काढले. सिस्टरशी हुज्जत घालत त्या बाहेर गेल्या. मी तर चाट पडलो. आतापर्यंत अधिकाराने, आपुलकीने बोलणारी, माझे आनंदाने स्वागत करणारी ही गप्पीष्ट बाई पेशंट असे वाटत नव्हतं.

    मिसेस फ्रँकलिन मँनियाच्या (अतिउत्साह विकृतीच्या) अवस्थेत होत्या. वरवर पाहता त्या नॉर्मल वाटत होत्या, पण त्यांची अधिकारवाणी, त्यांचा उत्साह, त्यांचा गप्पीष्टपणा वैगरे त्याच्या आजाराचीच लक्षणे होती.

     मँनिया विकृतीत अनाठायी आनंद वा चिडचिड, अतिउत्साह, अहंपणा, काम करण्याचा दिशाहीन उत्साह, विचारांची घोडदौड, कामात चंचलता, वायफळ बडबड वैगरे लक्षणे दिसतात. कधीकधी कामवासना तीव्र होऊन असभ्य वर्तनही केले जाते, तर कधी मूर्खातापूर्ण व्यवहार करून पैशांची उधळपट्टी केली जाते. तुकारामाचे असेच झाले. महिना दोन हजार मिळवणा-या या शिपायाने आपल्या काल्पनिक पेस्टीजसाठी घरावर कर्ज काढून चार चाकी गाडी खरेदी केली आणि कुटुंबावर बेघर होण्याची पाळी आणली. त्याची रडकुंडीला आलेली बायको त्याला घेऊन आमच्याकडे आली. तेव्हा तुकाराम आश्चर्य व्यक्त करत मला म्हणाला, ‘‘डॉक्टर काय तुम्ही? अजून फटफटी घेऊन हॉस्पिटलात येता! अहो टाटा इस्टिम घ्या. मी तुम्हाला फायनान्स करतो.‘‘ तुकाराम मला फायनान्स करण्याच्या गोष्टी करत होता तर मिसेस डिकोस्टा तिला मी चित्रपटात भूमिका मिळवून द्यावी म्हणून आग्रह करत होती. सत्तरी उलटलेली ही बाई, कोकणी ही तिची मातृभाषा, इंग्रजी पण चांगलं यायचं. तरीपण मोडक्या-तोडक्या हिंदीत ‘‘डॉक्टर, हम अच्छा ऍक्टिंग करता है, मुझे मुव्ही में काम करने का है, तुम्हारा पैचान है तो बोलो, अभी तुम हमारा  ऍक्टिंग सुनो‘‘, अस म्हणून प्यार किया तो डरना क्या? हे गाणं तिने साभिनय गाऊन दाखवलं.

    बायपोलर डिसऑर्डरमध्ये मँनिया आणि डिप्रेशनचे एपिसोड आलटूनपाल- -टून येतात. (यातील डिप्रेशन एपिसोड जर सौम्य असेल तर रोग्याच्या किंवा नातेवाईकांच्या लक्षातही येत नाही.)

    गंगाबाई बायपोलरच्या रोगी होत्या, त्या ज्यावेळी माझ्याकडे प्रथम आल्या त्यावेळी त्या डिप्रेशनमध्ये होत्या. नोकरीवर न जाता हताशपणे घरी बसून राहायच्या उपचारानंतर त्या ब-या झाल्या. पण वर्षभराने त्यांची बहीण त्यांना घेऊन आली. यावेळी त्यांची वर्तणूक फारच विचित्र बनली होती. पहाटे चार वाजता उठून त्या सर्वांना उठवीत. बँकेत क्लार्क असणारी ही महिला संपूर्ण कॉलनीला ऐकू जाईल, अशा खड्याा आवाजात भूपाळ्या म्हणे. एरवी आपलं काम नि आपण असा स्वभाव असणारी ही बाई हल्ली केवळ तोंडओळख असणा-या माणसांबरोबरसुद्धा तासनतास बडबड करे. चार दिवसांपूर्वी मिस्टरांसाठी स्वेटर विणायला घेतला होता, पण तो अर्धवट टाकून सासूबाईंसाठी ब्लाऊज शिवायला घेतला, पण तोही अर्धवट टाकून घरातले पडदे बदलण्यासाठी कापड खरेदी करून आल्या. खरेदीवरचा त्यांचा खर्चही हल्ली खूपच वाढला होता. गरज नसलेल्या कित्येक वस्तू त्यांनी खरेदी केल्या होत्या. ऑफिसातही काम दुस-यावर ढकलून त्या गप्पा मारीत. गंगाबाईना ऍडमिट करून उपचार करावे लागले.

    आज या विकृतीवर अनेक प्रभावी औषधे उपलब्ध आहेत. एकदा मँनियातून रुग्ण बरा झाला तरीही त्याला पुन्हा तो झटका कधीच येणार नाही, याची खात्री देता येत नाही. त्यामुळे वारंवार येणा-या झटक्यांनी नातेवाईक कंटाळतात व त्यांचा उपचारावरचा विश्वास उडतो. पण डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रतिबंधक औषधे न कंटाळता घेतल्यास हे टाळता येऊ शकेलं.  

– डॉ.रुपेश पाटकर,(मनोविकारतज्ज्ञ ), ९६२३६६५३२१ 

Leave a Reply

Close Menu