८ महिने ठप्प झालेले जनजीवन पूर्वपदावर येत असताना आता पुन्हा एकदा नव्याने कोरोनाचा फैलाव सुरू झाला आहे. या आजारापासून बचाव करण्यासाठी स्वच्छता म्हणजे सॅनिटायझरचा वापर, तोंडाला मास्क आणि सामाजिक अंतर या तीन गोष्टी प्रत्येक नागरिकाने पाळल्या तरच आपण या आजारापासून दूर राहू शकतो. या साध्या गोष्टी आता कायम स्वरुपात अंगिकारल्याशिवाय अन्य कोणताही पर्याय नाही, याचे भान प्रत्येकाने जपले पाहिजे. या आजारावर लसीचे संशोधन झाले आहे. जगभरातील विविध देशांप्रमाणे आपल्या देशातही लसीकरणाचा पहिला टप्पा सुरु आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांना ही लस दिली जात आहे. आपल्या देशाची लोकसंख्या १४० कोटींच्या घरात आहे. एवढ्या लोकसंख्येला लसीकरणाचे डोस देण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे. परंतु, शासनाने नियोजन करुन लसीकरणाला व्यापक स्वरुप देण्याची गरज आहे. हे शासनाच्या स्तरावरचे काम. राज्य आणि केंद्र शासनाने समन्वयाने काम केले तर अधिक गतीने आणि प्रभावीपणे होऊ शकते. परंतु, कोणत्याही गोष्टीत राजकारण आल्याशिवाय त्याला पूर्णत्व येत नाही, ही आपली मानसिकता. त्यामुळे लसीकरणाचा विषय सुद्धा वादाचा आणि आरोप-प्रत्यारोपाचा केला जातोय, हे दुर्दैव. ४५ वर्षांवरील नागरिकांनी तत्काळ लसीकरणाचे डोस घेण्यासाठी पुढे यायला हवे. याबाबत समज-गैरसमज, अफवा यामुळे नागरिकांच्या मनात काही प्रमाणात संभ्रम पहायला मिळतो. शास्त्रज्ञांनी लसीमुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत, याची ग्वाही दिली आहे. त्यामुळे बिनधास्तपणे लस घेणे हे आपल्या हिताचे आहे.

       ही गोष्ट गावस्तरावरील लोकप्रतिनिधीपासून आमदार-खासदार यांनी जनतेला समजून देण्याची गरज आहे. दुस-या बाजूला नागरिकांनी स्वच्छता, सामाजिक अंतर आणि तोंडाला मास्क या गोष्टी गांभिर्याने पाळल्या पाहिजेत. लस घेतली म्हणजे जबाबदारी संपली असे होत नाही. लस घेतल्यानंतरही वरील तीन गोष्टी सक्तीने पाळल्या पाहिजेत. तरच आपण या आजारापासून सुरक्षित राहू शकू. शासन अथवा अन्य कोणाला दोष देण्यापेक्षा शासनाने दिलेल्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे आपली जबाबदारी आहे. त्यासाठी कायदा, पोलिस बळाचा वापर, पुन्हा लॉकडाऊन या गोष्टी टाळण्याची गरज आहे. या गोष्टी आपल्या हातातील आहेत. पुन्हा लॉकडाऊन झाला तर कोरोनापेक्षा उपासमारीचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. शासनाने विवाह, हॉटेलमधील उपस्थितीत, सार्वजनिक कार्यक्रमांची नियमावली याबाबत आपण गांभिर्याने वागण्याची गरज आहे. बेफिकिरी म्हणजे कोरोनाला निमंत्रण असे होऊ नये, यासाठीच आजच्या काळात जबाबदारीने वागणे हेच शहाणपणाचे आहे.

       ८ महिन्यांचा लॉकडाऊन आणि त्यामुळे सामान्यांपासून उद्योगपतींना बसलेला फटका, श्रमिकांचे झालेले हाल, उपचाराविना झालेले मृत्यू, स्थलांतरीत मजूरांचा प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न, शिक्षणाची वाताहत हा सारा महामारीचा प्रताप आपण पाहिला आहे. त्यामुळे त्याची झळ स्वतःच्या घरात पोहोचू नये, यासाठी आपणच काळजी घेतली पाहिजे. मानवी स्वभाव धर्मानुसार आपल्या वागण्यातील बेफिकीरी आपलचं संपूर्ण कुटुंब उद्धवस्त करु शकते. कारण, अपघात सांगून होत नाहीत. त्यामुळे कोरोनासारखा अपघात टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेणेच हितकारक आहे. लस घेऊनही स्वच्छंद वावरणा-यांनाही कोरोनाची लागण झालीच आहे. केवळ लॉकडाऊनचा पर्याय किवा पोलिसांचा धाक हा संसर्ग रोखण्यासाठी पुरेसा नाही आहे. तर त्यासाठी स्वतःची जबाबदारी स्वतः उचलण्याची गरज आहे.

Leave a Reply

Close Menu