माथेरानच्या रस्त्याला रामदास कोकरे यांचे नाव

वेंगुर्ला शहरामध्ये स्वच्छतेचा अनोखा पायंडा रोवून स्वच्छतेचा वेंगुर्ला पॅर्टनबनविणा-या तत्कालीन मुख्याधिकारी रामदास कोकरे यांचे नाव माथेरान गिरीस्थान नगरपरिषद हद्दीमधील एका रस्त्याला देण्यात आले आहे. ब्रिटीश काळानंतर माथेरानमध्ये पहिल्यांदाच एखाद्या अधिका-याचे नाव देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यानुसार हे नाव देण्यात आले. रामदास कोकरे यांचे हे कार्य वेंगुर्ला शहराला सुद्धा अभिमानास्पद आहे.

      सन २०१८ ते २०२० या दीड वर्षांच्या कालावधीत रामदास कोकरे हे माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेमध्ये पालिका मुख्याधिकारी होते. कर्जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी असलेले रामदास कोकरे यांच्याकडे माथेरानच्या रिक्त असलेल्या पालिका मुख्याधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली होती. राज्य सरकारच्या नगरविकास विभागामध्ये रिसोर्स पर्सन म्हणून कोकरे यांचे नाव आहे. कच-याचे वर्गीकरण आणि कच-याच्या विल्हेवाटमधून पैसे मिळविण्याचे काम सर्वात आधी प्रत्यक्षात आणणारे कोकरे यांनी माथेरानमध्ये शून्य कचरा डेपोही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे.

     मी माझे कर्तव्य पार पाडताना चांगले बदल घडत गेले. वेंगुर्ला, कर्जत व माथेरान ही कचरा मुक्त शहरे निर्माण झाली. वेंगुर्ला हे दिपस्तंभ म्हणून कायम सर्वांना कचरा व्यवस्थापनाबाबत दिशा देत आहे याचा निश्चित अभिमान वाटतो. माथेरान नगराध्यक्षा प्रेरणाताई प्रसाद सावंत व सर्व नगरसेवक यांनी मनाचा मोठेपणा दाखवून माझा गौरव केला ही बाब मला पुढील काळात अधिक ऊर्जा देणारी ठरेल, असे मत कोकरे यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Close Menu