अनावश्यक फिरणा-यांची आरटीपीसीआर टेस्ट – पालकमंत्री सामंत

सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला या तीन तालुक्यातील कोविड संदर्भातील आढावा घेण्यासाठीची बैठक वेंगुर्ला नगरपरिषदेच्या शिवाजी सभागृहात आज पार पाडली. यावेळी खासदार विनायक राऊत, वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप गिरप, प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, तहसिलदार प्रविण लोकरे, तालुका वैद्यकीय अधिकारी अश्विनी माईणकर, पोलिस निरीक्षक तानाजी मोरे, सभापती अनुश्री कांबळी, उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी तसेच आमदार दीपक केसरकर ऑनलाईन उपस्थित होते. त्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना पालकमंत्री सामंत म्हणाले की, ९० टक्के नागरीक सर्व नियमांचे पालन करतात. १० टक्के लोक रस्त्यावर फिरताना दिसतात. त्यातील २ ते ३ टक्के हे अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडलेले असतात व इतर लोक अनावश्यक कारणांसाठी फिरत असतात. यापुढे जिल्ह्यात अन्यावश्यक जे रस्त्यावर फिरताना दिसतील त्यांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येणार आहे व त्याची सुरुवात आजपासून झाली आहे. कुडाळमध्ये आज अनावश्यक फिरणा-या १२ जणांच्या टेस्ट झाल्या असून यात एक व्यक्ती पॉझिटीव्ह तर कणकवली येथे १४ टेस्ट झाल्या यात दोन पॉझिटीव्ह आल्या. दोडामार्गतील जे लोक कामानिमित्त गोव्यात जातात त्यांची आता दर १५ दिवसांनी आरटीपीसीआर टेस्ट करण्याचा निर्णय घेतला असून त्याचे सर्व अधिकार प्रांताधिकारी यांना दिले आहेत.

      सावंतवाडी तालुक्यात आत्तापर्यंत २३ हजार १०२ कोरोना टेस्ट झाल्या यात १२२५ पॉझिटीव्ह आले असून आजरोजी १३८ रुग्ण अॅक्टीव्ह आहेत. तर आत्तापर्यंत ४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सावंतवाडीत मृत्यूदर जास्त आहे. आता आलेल्या दुस-या कोविडच्या लाटेला परतविण्याच्या दृष्टीने २१५ बेड तयार करण्यात आल्या आहेत. वेंगुर्ला तालुक्यामध्ये आतापर्यंत ८ हजार ७११ जणांची टेस्टझाली असून यात ७१२ पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. यात एकूण ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच दोडामार्ग तालुक्यात ५ हजार ५९७ जणांची टेस्ट झाली असून यात ५२१ पॉझिटीव्ह तर पहिल्या लाटेत ६ जणांचा मृत्यू झाला आहे.

      सावंतवाडीमध्ये पहिल्या टप्प्यात १० हजार ०८८ तर दुस-या टप्प्यात १२८८ डोस देण्यात आले. यात १२७० डोस अद्यापपर्यंत शिल्लक आहेत. वेंगुर्ल्यात सुमारे ८ ते ९ हजार लसीकरण करण्यात आले. यातील ६०० डोस शिल्लक आहेत. तर दोडामार्गमध्ये ५ हजार लोकांना लसीकरण झाले असून ९५० डोस असे मिळून तिन्ही तालुक्यात ३२२० डोस आजपर्यंत शिल्लक आहेत. हे शिल्लक डोस दोन दिवसांत संपवावेत अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

      कोविडच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला ऑक्सिजन प्लॉण्ट जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आमदार केसरकर यांनी आमदार निधीतून सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील तिन्ही तालुक्यांना शववाहिनी देण्याचे मान्य केले आहे. वेंगुर्ला नगरपालिकेकडे १२व्या वित्त आयोगाच्या व्याजातून १२ लाख रुपये शिल्लक आहेत. यातून त्यांनी रुग्णवाहिका घेण्याचे ठरविले असून त्याला तत्काळ मान्यता देण्यात येईल. वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालय लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्वांनी एकत्र येऊन कोरोनाच्या दुस-या लाटेशी लढणे आवश्यक आहे.

      बाजारपेठा किती वाजेपर्यंत सुरु ठेवाव्यात या संदर्भात प्रांताधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी व नगराध्यक्ष या सर्वांनी एकत्रित बैठक घेऊन कोविड वाढणार नाही याबाबत स्थानिक स्तरावर निर्णय घ्यावा. याला आमचा पाठींबा असेल अशी माहिती पालकमंत्री यांनी दिली. 

            नगराध्यक्ष गिरप यांना धन्यवाद!

      आजची आढावा बैठक नगराध्यक्ष गिरप यांनी वेंगुर्ला नगरपरिषदेत आयोजित केली. याबाबत त्यांना विशेष धन्यवाद देऊ इच्छितो. याचा आदर्श सर्व नगरपरिषदांनी घ्यावा व विशेषतः सावंतवाडी नगरपरिषदेने घ्यावा अशी माझी सूचना आहे.

Leave a Reply

Close Menu