वेंगुर्ला शहरात उद्यापासून कोरोना कफ्र्यु

        कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात उद्या मंगळवार २० एप्रिलपासून कडक निर्बंध घालण्यात आले असून सकाळी ७.३० ते दुपारी १ पर्यंतच अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. यानंतर शहरात कडक कोरोना कफ्र्यु करण्यात आला आहे. दुपारी १ नंतर सर्व आस्थापने बंद राहतील व फक्त अत्यावश्यक दुकानांसाठी पार्सल सेवा सुरू राहील अशी माहिती मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे यांनी दिली आहे.

      शहरात वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता व संचारबंदीला प्रतिसाद मिळत नसल्याने याबाबत आज सोमवारी येथील तहसील कार्यालयात प्रशासनाची तातडीची बैठक संपन्न झाली. यावेळी तहसीलदार प्रवीण लोकरे, नगराध्यक्ष दिलीप गिरप, मुख्याधिकारी अमितकुमार सोंडगे, पोलीस निरीक्षक तानाजी मोरे, गटविकास अधिकारी उमा पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी अश्विनी माईणकर- सामंत, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रल्हाद मणचेकर यांच्यासहीत इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी दुपारी १ नंतर संपूर्ण कफ्र्युचा निर्णय घेण्यात आला. तसेच उद्यापासून अनावश्यक फिरणा-यांवर कडक कारवाई होणार असून नाक्यावर-नाक्यावर पोलिसांचा कडक बंदोबस्त असणार आहे. तसेच शहरात बाजरपेठेत अनावश्यक फिरणा-यांची कोरोना रॅपिड टेस्टही मंगळवार पासून केली जाणार आहे. कोरोनामुळे मृत्यू पावणा-यांवर येथील धावडेश्वर स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार होणार असल्याची माहितीही यावेळी मुख्याधिकारी सोंडगे यांनी दिली.

 

Leave a Reply

Close Menu