राजकीय खेळ चाले!

देशभरात कोरोनाच्या दुस-या लाटेने हाहाकार माजवला आहे. परंतु, या कठीण आव्हानात्मक परिस्थितीतही चाललेले राजकारण सर्वसामान्य जनतेच्या संतापात भर घालत आहे. राजकारण गेलं चुलीत, असे एक नाटक आहे. त्याहीपेक्षा आजच्या परिस्थितीवर भाष्य करणारी सामान्यांची प्रतिक्रिया थोडीशी वेगळी पहायला मिळते. राजकारण घाला चुलीत‘, या प्रतिक्रियेतून आजचे राजकारण कोणत्या पातळीवर गेले आहे, याची प्रचिती येऊन जाते. गेल्यावर्षी मार्च महिन्यातच कोरोनाचा प्रवेश झाला. वर्षभर या कोरोनाने सा-या व्यवस्था मोडून काढल्या. गरीबांना जगणे असह्य केले. कामगारांचा रोजगार गेला. कामगारांनी आपल्या गावचा रस्ता धरला. लॉकडाऊनच्या काळात वाहतूक व्यवस्था नसल्याने अनेकांचे रस्त्यातच प्राण गेले. काहींवर उपासमारीची वेळ आली. कोरोना महामारीने हजारो बळी गेले. वैद्यकीय व्यवस्था गलितगात्र झाली. हा तडाखा भारतीय अर्थव्यवस्थेलाही बसला. आठ महिन्यांनंतर त्यातून सावरण्याचा प्रयत्न शासनाने सुरु केला. आता दुस-या लाटेने हैदोस मांडला आहे.

        गेल्या वर्षभरातील अनुभव लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य शासनाने कमकुवत वैद्यकीय सेवा बळकट करण्याची गरज होती. परंतु, कोरोना आता गेला अशा थाटातच सा-यांचा वावर सुरु झाला आणि दुसरी लाट येताच पुन्हा सा-यांची दैन्यावस्था झाल्याचे चित्र आपण पाहत आहोत. या कोरोनाच्याविरोधात सारे मतभेद, राजकारण बाजूला ठेऊन एकमुखाने या काळात काम करण्याची गरज आहे. शासनाला आणि प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे. परंतु, जे गांभिर्य गेल्यावर्षी होते, ते गांभिर्य कोणत्याच पातळीवर पहायला मिळत नाही. सत्तारुढ आणि विरोधक यांच्यात चाललेले आरोप आणि प्रत्त्यारोप पाहिल्यानंतर लहान मुलांचा होतो खेळ आणि बेडकांचा जातो जीव, याचीच प्रचिती सर्वसामान्यांबाबत येत आहे. याच त्राग्यातून राजकारण घाला चुलीत अशा प्रकारच्या कडवट प्रतिक्रिया ऐकायला मिळतात.

      महाराष्ट्रातील महाआघाडीचे शासन गांभिर्याने प्रयत्न करीत असले तरी केंद्र शासनाकडून सहकार्य मिळत नसल्याने त्यांना मर्यादा पडल्या आहेत. यातूनच लसीकरण, कोरोना आजारासाठी आवश्यक असलेले रेमीडेसीवीर हे इंजेक्शन याशिवाय प्राणवायू याचा योग्यप्रकारे पुरवठा करून वाढत्या रुग्णसंख्येला आवश्यक असलेल्या हॉस्पिटलमधील सुविधा उपलब्ध करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी काम करण्याची गरज आहे. प्रत्यक्षात मात्र केंद्र आणि राज्य यांच्यातील संघर्ष प्रत्येक टप्प्यावर पहायला मिळतो. भाजपचे सरकार केंद्रात आहे आणि राज्य महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे या दोघांत समन्वय नसल्याने अनेक प्रश्न गंभीर बनले आहेत. यामध्ये आरोप-प्रत्यारोप यातच सारा वेळ जातो आहे. विरोधी पक्ष सुद्धा आपली जबाबदारी योग्यप्रकारे पार पाडीत आहे, असे चित्र कुठेच दिसत नाही. राज्य शासनाला अडचणीत आणण्यासाठी एकही संधी सोडली जात नाही.

      आजचा काळ मानवी आयुष्याशी संबंधित आहे. हे संकट गंभीर आहे. सारी उपाययोजना तोकडी पडली आहे. राज्यात पुन्हा संचारंबदी लागू केली असली तरी गेल्यावर्षी सारखे गांभिर्य नाही. त्यामुळे कोरोनाची साखळी तुटण्याची लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे पुन्हा कडक लॉकडाऊन करण्याचा विचार सुरु आहे. केंद्र शासनाने अलिकडेच एक चांगला निर्णय घेतला आहे. अठरा वर्षांपुढील सर्वांनाच लसीकरण करण्याचा कार्यक्रम आहे. कोरोना साथ रोखण्यासाठी व्यापक प्रमाणात लसीकरण आणि शासनाने दिलेले नियम पाळणे या गोष्टी आवश्यक आहेत. अर्थात यासाठी एकटे शासन-पशासन अथवा पोलिस बळाचा वापर करून काही साध्य होणार नाही. जनतेला विश्वासात घेऊन जनतेची साथ मिळवूनच ही उपाययोजना केली तरच अपेक्षित यश मिळू शकते. सध्या शहरातून गावाकडे जाणा-या मजुरांचा ओघ वाढलेला आहे. गेल्यावर्षीचे चित्र पुन्हा पहायला मिळते. या सा-या गोष्टींचा विचार सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी गांभिर्याने करण्याची गरज आहे. सध्याचे चाललेले राजकारण कोणालाच पसंत नाही. यामध्ये सर्वसामान्य आणि श्रमिक वर्गच भरडला जातो आहे. याचे भान जपण्याची गरज आहे. राजकारणासाठी खूप वेळ आहे. अनेक विषय आहेत. आजचा काळ हा कसल्याही प्रकारचे राजकारण करण्याचा नाही, एवढी भान जपले तरी खूप परिस्थिती बदलू शकते.

 

This Post Has One Comment

  1. राजकारणी लोकांना जनतेशी काही एक देण नाही स्वताची पब्लिसिटी कशी होईल एवढेच त्यांना महत्वाचे वाटते
    धन्य,

Leave a Reply

Close Menu