डर के आगे जीत है!

माझे वागणे अगदी राशीला साजेसे आहे असे बहुतेक लोकं म्हणतात. पण त्यांना कुठे माहिती आहे की मी दोन राशींच्या बॉर्डर वर आहे. सांगायचं कारण म्हणजे 9 एप्रिलला माझ्या आईची वॅक्सिनसाठी अपॉइंटमेंट होती. दहा ठिकाणी चौकशी करून खात्री करुन जवळच्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये अपॉइंटमेंट घेतली होती. ऐेंशीच्या वर वय असल्याने तिला जास्त दगदग नको, गर्दीत न्यायला नको, वेटिंग लागलंच तर बाजूच्या बिल्डिंग मधेच माझ्या मैत्रिणीच्या घरी तासभर बसता येईल वगैरे परफेक्ट ऍनॅलिसिस अँड प्लॅनिंग! कन्या रास!! पण बरोब्बर आठ तारखेला “पुण्यात लसीचा तुटवडा“ ही बातमी अनेक न्यूज चॅनेलवर झळकू लागली. मी सकाळपासून त्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये फोन करत होते, दोन नंबर मधला एक सारखा डिस्कनेक्ट होत होता आणि दुसरा कोणी उचलत नव्हतं. शेवटी पाच वाजता रिसेप्शनिस्टने उचलला. तिला सांगितलं, “बाई आमच्या मातोश्रींना उद्या लसीकरणासाठी आणायचंय, वय ऐेंशी आहे आणि या बातम्या पाहुन मी सकाळपासून फोन करतेय“ या एवढ्या लांबलचक वाक्यानंतर तिचं तीन त्रोटक शब्दात, शक्य तितक्या रूक्ष आवाजात उत्तर “उद्या घेऊन या 9 ला“.

      सर्व जाणकारांकडून आणि वॉटसॲप युनिव्हर्सिटी कडून मिळालेल्या सुचनांनूसार व्यवस्थित ब्रेकफास्ट करून 9 च्या आधीच आम्ही हॉस्पिटलच्या दारात…. आई आधीच टेन्शनमधे कारण तिला करोनाचाही अनुभव होता. गेटकीपरनेच नाठ लावला…. ‘आज नही मिलेगा!’ …. तुझ्या मारी टोपी म्हणत मी आत गेलेच. तिथे त्यांचे ऍडमिन होतेच, म्हंटलं, “काय हो, स्टॉक नाही हे काल पाच वाजता तुम्हाला कळलं नाही? काल संध्याकाळी मी तुमच्या रिसेप्शनिस्ट समोर गीता वाचली, ती फुकट? काय कोऑर्डिनेशन, काही सिस्टिम आहे की नाही?“, “आणि ठिक आहे की पाचनंतर लक्षात आलं असेल तुमच्या, तर मग एक मेसेज तरी पाठवायचा! किती ज्येष्ठ नागरिक आलेत बघा… का गेले नाहीत ते सरकारी दवाखान्यात? पैसे वर आलेत म्हणून? प्रायव्हेटमधे सर्विस चांगली मिळते, सिस्टमॅटिक असतं सगळं म्हणून ना? तुमची काही चूक नाही, हे सगळं राजकारण वगैरे असेल ही, आम्हाला समजतंय. पण तुम्ही वेळेवर इन्फॉर्म केलं असतं तर आज ह्या ज्येष्ठ नागरिकांनी विनाकारण घरातून बाहेर पडण्याची रिस्क घेतली नसती.“  माझ्या या बोलण्याचा आता काहीच उपयोग नव्हता आणि त्या माणसालाही बिचाऱ्याला आज कित्येक जणांकडून हेच ऐकून घ्यावं लागणार होतं… त्याची व्यक्तिगत चूक नसताना! पण इथेच आपल्या देशाच्या आरोग्य व्यवस्थेची सिस्टीम, कोऑर्डिनेशन आणि टीमवर्क कमी पडतंय असं प्रकर्षाने जाणवलं. आणि या सगळ्याचा फटका मात्र सामान्य आणि त्यात करुनही ज्येष्ठ नागरिकांना बसतोय. कारण ते आधीच घाबरलेले आहेत, त्यात हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन वगैरे करणं त्यांना अवघड जातंय. म्हणजे परत कोणाचे तरी पाय धरा आणि एवढा व्याप करून त्यादिवशी लस मिळाली नाही की आता काय करायचं हा यक्षप्रश्‍न! आता माझ्या आईसाठी धडपडायला मी आहे, माझा धाकटा भाऊ इथेच आहे पण कित्येक ज्येष्ठ नागरिक एकटे आहेत…. त्यांनी काय करायचं? डोकं विचारांनी भणभणायला लागलं.

      डोकं थंड करून घरी आले, चार जणांकडे चौकशी केल्यावर कळलं नव्वद टक्के लोकांची सेम कंडिशन होती. लगेच संध्याकाळी केंद्राने दीड लाख लसी पाठवल्याची बातमी वेगवेगळ्या अंगाने, वेगवेगळ्या चॅनेल्सवर व वॉटसॲप वर येऊन थडकली. एका मैत्रिणीने दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये मिळेल अशी आशा दाखवली. सारखी वेबसाईट चेक करत होते पण रात्री आठपर्यंत साईटवर काही दिसत नव्हतं. अचानक नऊनंतर स्लॉट्स ओपन दिसले लगेच हावरटासारखी तिघांचीही अपॉइंटमेंट घेऊन टाकली. सकाळच्या प्रसंगाने रात्री नीट झोपही लागली नाही. परत दुसऱ्या दिवशी म्हणजे 10  एप्रिलला गडबडीने सगळं आटपून, भरपूर नाश्‍ता करुन दीनानाथच्या दारात! दुसऱ्या नवीन बिल्डिंगमधे सिक्युरिटीवाल्याने अडवलं, अपॉइंटमेंट आहे म्हंटलं तरी आत जाऊन खात्री करून या म्हणाला! पोटात परत धस्स झालं. आई आणि नवरा गाडीतच थांबले मी पटकन रिसेप्शन काऊंटरवर तिघांचे रजिस्ट्रेशनचे मेसेज दाखवले. तिने 3 स्लिप्स दिल्या व सहाव्या मजल्यावर जाण्यास सांगितले. बाहेर येऊन आईला गाडीतून उतरवून, नवऱ्याला डायरेक्ट सहाव्या मजल्यावर यायला सांगितलं. सहाव्या मजल्यावरच्या मदतनीसाने स्लिप बघून तीन प्लास्टिकची टोकन्स दिली, नंबर 18,19,20! वेटिंग साठी भरपूर मोठी जागा होती, तिथे बसायला सांगितलं. तिथे एकमेकांपासून सुरक्षित अंतरावर खुर्च्या होत्या. समोर टिव्ही चालू होता आणि भिंतीवर माहितीचा फलक होता. मी आईला तिथे बसवून परत येऊन काही पेपरवर्क, फॉर्म वगैरे भरायचाय का? असं तिथल्या माणसाला विचारलं. “काही नाही तुमच्या टोकन नंबर्सची अनाऊन्समेंट झाली की समोरच्या काऊंटरवर जा“ म्हणाला. अक्षरशः दहा मिनिटांत आमचा नंबर लागला. आईला रांगेत उभं रहायला नकोच म्हणाले ते… एकाच कुटुंबातील असल्याचे समजल्यावर तिथली वोलेंटियर मलाही आईजवळच थांब म्हणाली. एकावेळी दहा जणं वेरिफिकेशन साठी, दहा बिलींग साठी व दहा वँक्सिन घेण्यासाठी जात होती …. ते ही सुरक्षित अंतर राखून शांत चित्ताने! मदतनीस, क्लार्कपासून लस देणाऱ्या नर्सपर्यंत सर्व हसतमुख! Very well organized n pleasant! लस घ्यायला मी आणि आई एकमेकींच्या बाजूच्याच खुर्चीवर बसलो होतो म्हणून मी आईला ब्लाऊजची स्लीव वर करून दिली. आईला दीर्घ श्‍वास घ्यायला सांगून, नर्सने मला विचारलं “रिश्‍तेदार हो?“, मी हसत उत्तरले “हां, माँ है मेरी! बचपन में वो मुझे टीका लगवाने लेके जाती थी, आज मैं उसको लेके आयी हुँ“ तर ती हसत म्हणाली “हां रिवेंज ले रही हो“ …. आई हसली, बोलता बोलता लस देऊन झालीही. मग माझी आणि अभीचीही झाली. तिथल्या रिसेप्शनिस्ट, सिक्युरिटी, क्लेरिकल स्टाफपासून ते लस देणाऱ्या नर्सपर्यंत सर्वांना “आप बहुतही अच्छा काम कर रहे हो, आपको बहुत सारा धन्यवाद!“ असं मनापासून आणि आवर्जून सांगितलं. करोनाकाळ नसता तर मुन्नाभाई सारखी जादू की झप्पीच दिली असती. असो. अर्धातास थांबून साडे नऊनंतर घरीसुद्धा आलो. काल साडेनऊच्या सुमारास आता पुढे काय या टेन्शन आणि भीतीने ग्रासलो होतो आणि आज मात्र ‘डर के आगे जीत’ चं फिलींग आलं!!

श्रुती संकोळी, ९८८१३०९९७५

Leave a Reply

Close Menu