अस्वस्थ भवताल

कोरोना महामारीने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. मृत्यूचे तांडव सुरु आहे. आपल्या देशातही गेल्या वर्षी पहिल्या लाटेत सर्व व्यवस्था उद्धवस्त झाल्या. आरोग्य व्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेली. अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला. शिक्षणाचे तर वाटोळे झाले. श्रमिक, गरीबांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला. शासनाची उपाययोजना तोकडी पडली. आपण पुढीलवर्षी देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करणार आहोत. गेल्या ७ दशकात आपण विविध स्तरावर प्रगतीची झेप घेतली हे खरे असले तरी कोरोनाच्या एका धक्क्याने सारे कोलमडून पडले. त्यातून सावरण्याचा प्रयत्न सुरु असताना पुन्हा एकदा कोरोनाने हैदोस घातला आहे.

         कोरोना संपला अशा विचारात असतानाच गेल्या वर्षपेक्षा तीव्र स्वरुपात कोरोनाचा हैदोस सुरु आहे. गतसालच्या अनुभवातून काही धडा घेतला का? हा प्रश्न समोर आला तर त्याचे उत्तर नकारात्मक येते. उपचाराची व्यवस्था नाही, पुरेसे बेड उपलब्ध नाहीत, ऑक्सीजन अभावी शेकडोंचे मृत्यू झाले, इंजेक्शन नाहीत, रुग्णालये हाऊसफुल्ल झाल्याने रस्त्यावर, झाडाखाली, रिक्षात रुग्णांवर उपचार करावे लागत आहेत. या हेळसांडीतून अनेक रुग्णांचे मृत्यू झाले. अंत्यसंस्काराचा विषय तर आणखी गंभीर बनला आहे. एकाचवेळी दहा-पंधरा मृतदेह रुग्णवाहिकेतून नेऊन अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. शासन-प्रशासन आहे की नाही, असे वातावरण निर्माण झाले आहे.

        या विषयावर विविध राज्यांच्या उच्च न्यायालयांनी सर्वोच्च न्यायालयानेही गंभीर दखल घेत राज्य सरकारे आणि केंद्र शासनाला फटकारले आहे. वैद्यकीय सेवा तातडीने उपलब्ध करुन जनतेचे प्राण वाचवा असे निर्देश दिले. यावरुनच आपली व्यवस्था काय आहे, हे उघड होते. कोरोनाच्या लसीकरणाचा विषयही असाच गोंधळाचा आहे. आपल्या देशात लसींचे उत्पादन झाले. मात्र जगभरातील देशांना लस देऊन आपली प्रतिमा उंचावण्याच्या प्रयत्नात आपल्या देशातील जनतेला वेळेवर लस मिळणे दुरापास्त झाले आहे. याबाबतही न्यायालयाने शासनाला फटकारले आहे.

         जनतेने नियम पाळावेत, यासाठी एकीकडे लॉकडाऊन करुन सर्वांना घरबंद करण्याचा विषय आणि दुस-या बाजूला निवडणुकांचा कार्यक्रम, राजकीय नेते, केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री अशा फौजा प्रचारात उतरल्या. लाखांच्या सभा झाल्या. संसर्गातून या साथीचा फैलाव होतो, असे तज्ज्ञ सांगत आहेत. त्याकडे दुर्लक्ष करून निवडणुका सुरुच राहिल्या. सारे नियम धाब्यावर बसवून निवडणुकीचा कार्यक्रम सुरूच होता. याबाबतही मद्रास उच्च न्यायालयाची टिपणी गंभीर तितकीच महत्त्वाची आहे. निवडणुकीत प्रचंड सभा झाल्या, त्यावेळी तुम्ही परग्रहावर होता का? असा प्रश्न करुन कोरोनाच्या मृत्यूला तुम्हाला जबाबदार का धरु नये? असा खडा सवाल केला.

            पाच राज्यातील निवडणुकांत भाजपसह सारेच पक्ष पूर्ण ताकदीने उतरले होते. कोरोनाचा विसर पडून हा माहोल होता. एकूणच आजचे भवताल अवस्थ आहे. जगणे महाग आणि मरण स्वस्थ अश स्थिती का येऊन ठेपली याचे चिंतन होण्याची गरज आहे. पण त्यासाठी वेळ आहे कुठे?

Leave a Reply

Close Menu