वेंगुर्ल्याची अग्निसुरक्षा रामभरोसे

नाशिक येथे झालेल्या ऑक्सिजन गळतीच्या पार्श्वभूमीवर ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात खबरदारी म्हणून वेंगुर्ला न.प.चा अग्निशमन बंब सुमारे २ आठवडे जिल्हाधिका-यांच्या आदेशानूसार पाठविण्यात आला आहे. उपलब्ध माहितीनुसार कणकवली, कुडाळ नगरपंचायत तसेच सावंतवाडी न.प.चा बंब सध्या चालू स्थितीत नाही.तर मालवण न.प.कडे अग्निमशन बंबच नाही. त्यामुळे वेंगुर्ल्यासह वरील तालुक्यांमध्ये दुर्घटना घडल्यास वेंगुर्ला न.प.चा बंब बोलविला जातो. परंतु, सध्या वेंगुर्ल्यातच बंब नसल्याने येथील अग्निसुरक्षा रामभरोसे झाली आहे. लवकरात लवकर वेंगुर्ला न.प.चा बंब वेंगुर्ल्यात दाखल होण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार केला असल्याची माहिती मुख्याधिकारी सोंडगे यांनी दिली.

       चिपी विमानतळ येथे सिधुदुर्ग विमानतळ प्राधिकरणाचे २ बंब आहेत व पिगुळी येथे एमआयडीसीचे २ बंब आहेत. असे असताना ओरोस जिल्हा रुग्णालय येथे वेंगुर्ला न.प.चा एकुलता एक अग्निशमनबंब  दोन कर्मचा-यांसह कार्यरत ठेवणे संयुक्तिक आहे का? असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.

     आगीसारख्या दुर्घटना घडण्या अगोदरच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सुसज्ज असणे अत्यावश्यक आहे. सध्याच्या कोरोना आपत्ती काळात तर सर्वच स्तरावर याची प्रकर्षाने खबरदारी घेतली जात आहे. जिल्हा आपत्ती निवारण यंत्रणेचे जिल्हाधिकारी हे अध्यक्ष आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कोणताही तातडीचा निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना आहेत. अशा स्थितीत अन्य नगरपरिषदांकडील कार्यान्वित नसलेले बंब त्वरित सुरु करुन घेतल्यास तसेच ओरोस जिल्हा मुख्यालय येथे नविन बंब खरेदी करणे गरजेचे आहे. दुर्घटना घडल्यानंतर शोक व्यक्त करण्याऐवजी सध्या जिल्ह्यातील नगरपरिषदांमधील अत्यंत बिकट अवस्थेत असलेली अग्निशमन यंत्रणा सुसज्ज करणे अत्यावश्यक आहे. 

Leave a Reply

Close Menu