वादळी वा-याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण : झाडे पडून नुकसान

ताऊकतीचक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सतत वाहणा-या वादळी वा-याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून या वादळी वा-याने तालुक्यासह शहरातही ठिकठिकाणी झाडे पडून नुकसान झाले आहे. शहरातील हॉटेल मायबोलीच्यामागे असलेल्या भांडीवाले यांच्या घरात तर नवाबाग येथील राजश्री तांडेल, एकनाथ खोबरेकर यांच्या घरात मोठ्या भरतीचे पाणी घुसल्याने त्यांची तारांबळ उडाली. वेंगुर्ला तालुक्यात २३ मि.मी.एवढी पावसाची नोंद झाली आहे.

तालुक्यात आडेली-भंडारवाडा येथील गंगाराम मुंडये, वेंगुर्ला-आनंदवाडी येथील राजन जाधव, कॅम्प येथील श्री.सरमळकर, नगरसेवक विधाता सावंत, माजी नगरसेवक मनिष परब, दाडाचे टेंब मार्गावरील प्रविण पालयेकर, दाभोसवाडा येथील गणपत चोडणकर, परबवाडा-कणकेवाडी येथील बाबी परब व हकीम नर्सरी यांच्या घरांवर झाडे पडून नुकसान झाले.  तर शहरातील आनंदवाडी येथे भेंडीचे झाड, दाभोसवाडा येथे माडाचे झाड, वेंगुर्ला कोर्टासमोर झांडाची फांदी, म्हाडा संकुल रस्त्यावर सुरुचे झाड, भटवाड आडीपूल येथे आंब्याचे झाड, पोलिस स्टेशनवरुन रामघाट रोड येथेही झाडे पडण्याचे प्रकार घडले. त्रिमुर्ती परफ्युम कारखान्याच्या समोरील झाड मुळासकट पडले. मात्र, आजूबाजूला उभ्या असलेल्या गाड्या बालंबाल वाचल्या. कलानगर येथील मेस्त्री यांच्या घराजवळील गडगा कोसळला. भुजनाकवाडी येथील विठ्ठल मंदिरावर आंब्याचे झाड पडून मंदिराच्या छप्पराचे तर दाभोली-दाजी आश्रम येथील शशिकांत राजापूरकर यांच्या घराचे पत्रे उडून आर्थिक नुकसान झाले. नवाबाग रस्त्यावर झाड पडून तसेच येथील उत्तम पांडुरंग आरावंदेकर याच्या घरानजिक झाड पडल्याने विद्युत तारा तुटल्या. मातोंड रामेश्वर मंदिर नजिक सकाळी आंब्याचे झाड पडून मातोंड मार्गे वेंगुर्ला मार्ग तसेच येथीलच जूना काजू कारखाना नजिक आकाशीची झाडे व विद्युत खांब पडून होडावडा-मातोंड मुख्य मार्ग ठप्प झाला.

     काही ठिकाणी पावसातच घरावर पडलेले झाड तोडताना नागरिक दिसत होते. वादळी वा-यामुळे रस्त्यावर झाडाच्या फांद्या पालापाचोळा दिसून येत होता. रामघाट रोडवर विद्युत तार पडली असून तालुक्यामध्ये अन्य ठिकाणी ब-याच प्रमाणात झाडे आणि विद्युत खांब पडल्याने विज पुरवठा खंडीत झाला आहे.

Leave a Reply

Close Menu