►वेंगुर्ला शहरात भरवस्तीत दोन बिबट्याचा मुक्त संचार

वेंगुर्ला-बेळगाव महामार्गावर हम रस्त्यानजिकच्या भागात कुबलवाडा, महाजनवाडी व वेंगुर्ला शहर भागात दोन बिबट्याचा मुक्त संचार आज दुस-या दिवशी सुरुच आहे. या बिबट्याने भटक्या कुत्र्याचा फडशा पाडला असला तरी भरवस्तीतच बिबट्या वावरत असल्याने येथील ग्रामस्थांमध्ये मात्र भीतीचे वातावरण पसरले आहे.

      काल ५ जून रोजी वेंगुर्ला बेळगाव रोडवरील आयटीआय कन्याशाळेनजीक बिबट्याने दोघा दुचाकीस्वारांच्या समोरच उडी मारून रस्ता पार केला होता. त्या दुचाकीस्वाराचे नशीब बलवत्तर म्हणून अनर्थ घडला नाही. यावेळी एक बिबट्या दिसला होता. ही रात्र अनेकांनी जागूनच काढली. प्रत्येकाने आपल्या भागात फोनवरुन माहिती देत सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या.

      आज पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास कुबलवाडा परिसरात बिबट्रयाचा गुरगुरण्याचा आवाज आल्याने आपल्या घरातूनच बॅटरीने प्रकाशात पाहिले असता जांभळीच्या झाडावर दोन बिबटे दिसले. सदर व्यक्ती घाबरल्याने त्याने कोणासच पहाटे कल्पना दिली नाही. सकाळ होताच परिसरातील सर्वांना कल्पना दिली. परंतु, सकाळीच ते बिबटे दुसरीकडे गेले या झाडांवर बिबट्याच्या नखांचे ओरबडे दिसल्याचे येथील नागरिक सांगत आहेत. मात्र येथील भागातील भटक्या कुत्र्याचा फडशा पडल्याची कल्पना नागरिकांनी वन विभागास व पोलिसांना दिली आहे.

 

Leave a Reply

Close Menu