प.पू.श्री आनंदनाथ महाराज (118 वे पुण्यस्मरण- 16 जून 1903)

       श्री आनंदनाथ महाराज यांचे मूळ नाव गुरुनाथ एकनाथ वालावलकर. सावंतवाडी प्रांतातील बांद्याजवळच्या मडुरे-डिगेवाडी येथे सन 1830 साली त्यांचा जन्म झाला. वालावलकर घराण्यामध्ये पूर्वीपासून श्रीदत्तमहाराजांच्या पूजा-उपासनेची परंपरा होती.

      गुरुनाथांना अक्कलकोटला वारंवार जाण्याची ओढ लागली. त्यामागे ‘सहज एक दर्शन’ हा भाव नव्हता. तिथे आंतरिक ओढ होती.

      अक्कलकोटमध्ये सर्वप्रथम आले तेव्हा देवदर्शन घेताना शुचिर्भूत व्हावे म्हणून हातपाय धुण्यासाठी गुरुनाथ पाय-विहिरीत उतरले. श्रीस्वामी महाराजांसमोर आपण उभे राहावे, तर ते कसे दिसतील, कोणत्या रुपात दर्शन देतील, काय बोलतील, असंख्य प्रश्‍नांचे जंजाळ डोक्यात निर्माण झाले असता अचानक त्यांच्या मस्तकावर एक डहाळी पडली. या डहाळीचा स्पर्श आगळा होता. अंगात वेगवान सळसळ झाली. मूलाधार चक्रातून निघालेली कुंडलिनीविद्यल्लता सर्पिणीसारखी वर सळसळत थेट ब्रह्मरंध्राचा ठाव घेती झाली. एवढ्यावरच हे प्रकरण थांबले नाही.

      अचानक एक हास्याची लकेर वातावरणात लहरली… नादब्रह्मच तो… प्रत्यक्षात परब्रह्माच्याच मुखातून निघालेला होता. काय होत आहे हेच लक्षात न आल्यामुळे स्थितप्रज्ञ बनलेले गुरुनाथ झर्रकन मागे वळून पाहतात तो काय! प्रत्यक्ष परब्रह्ममूर्ती श्रीस्वामीसमर्थ माऊली त्यांच्याकडे कृपादृष्टीने पाहात पुढे आली. त्यांनी गुरुनाथांच्या मस्तकावर हस्तस्पर्श केला व नजरेत खोलवर पाहिले.  तत्क्षणी गुरुनाथांच्या मनी शब्दब्रह्माने आकार घेतला…

पूर्णबह्म श्रीगुरुराणा । आम्ही नयनी देखिला ॥1॥

समाधान झाले जीवा । संशय अवघा फिटला ॥2॥

आता कैचे  मी-तू  पण। अवघा स्वामीच कारण ॥3॥

सहज द्वैतासी गिळिले । स्वामीमय जग झाले ॥4॥

तेथे कैचा अहंकार । होता स्वामींचा आकार ॥5॥

दंभ, अभिमान गेले । शून्य देह स्वामी केले ॥6॥

आनंद म्हणे, जग जड । म्हणून पूजणे दगड ॥7॥

      वाडवडिलांनी आपले नाव गुरुनाथ ठेवले तरी यापुढे आपले नाव ‘गुरुदास’ राहील. गुरुनाथ तर अक्कलकोटात आहेत, आपण त्यांचे दास आहोत, अशी पक्की मनोभूमिका बनवून ते आपल्या प्रिय पत्नीच्या रदबदलीस बसले. महाराजांची कृपा झाल्यावर ऐहिक विचार कशाला करावा? फक्त अर्धांगिनीची संमती घेऊन पुढे सरकलेले बरे. तिचा होकार म्हणजे पुढील कार्यासाठी तिची ती सोबतच होय. अक्कलकोटीच्या श्रीगुरुनाथांची सेवा करण्यासाठी आपल्या पतीराजांना साध्वी गंगाबार्इंनी सहर्ष परवानगी दिली आणि गुरुदास अक्कलकोटी दाखल झाले.

      गुरुदासांचा अक्कलकोटीचा वावर आता सहज झाला होता. ते अक्कलकोटवासियांना चांगलेच परिचयाचे झाले होते. महाराजांच्या सेवेकऱ्यांमध्येच ते राहात असत. श्रीस्वामीकृपेकरुन त्यांची अवस्था विदेही झाली होती. कित्येकदा त्यांना देहभान उरत नसे. अंगावर कोणतेही वस्त्र शिल्लक राहात नसे. पुढेपुढे बहुदा ते लंगोटी नेसूनच असत. विविध स्तोत्ररचना त्यांच्या मनःपटलावर सातत्याने रेंगाळत असायच्या. श्रीस्वामीसान्निध्य अखंडितपणे लाभल्याचा हा परिणाम. महाराज त्यांना जवळ बोलवीत व म्हणत ‘आनंद करा, आनंदनाथ व्हा.’ हे ऐकून भक्तगणांनी त्यांचे नामकरण गुरुदास ऐवजी ‘आनंदबुवा’ असे केले. काहीजण त्यांना ‘आनंदनाथ’ असे संबोधू लागले. त्यांना अखंड तुरियावस्था प्राप्त झाली होती.

      एकदा श्रीस्वामीगुरुंकरवी त्यांना चिमुकल्या सोन्याच्या पादुका प्राप्त झाल्या. महाराजांनी पुन्हा एकदा त्यांच्या हाती छोट्याशा स्फटिकाकार पादुका दिल्या. याशिवाय स्वस्वरुपाचा निजबोध करवून देताना आनंदनाथाना अगदी निकट बोलविले. गळा खाकरल्यासारखा केला नि मुखातून आत्मलिंग काढून आनंदनाथांच्या हाती सोपविले.

      या आत्मलिंग प्राप्तीबाबत श्री आनंदनाथ म्हणतात,

देहभान मुरुनी गेले । तुमची देखिल्या पाऊले ॥1॥

जाहाले जाहाले समाधान । अवघे तोडिले बंधन ॥2॥

आता सुखा पार नाही । मुरुनी गेलो चारी देही ॥3॥

स्वयं ज्योतीचा उजाला । ब्रह्म देखो विश्‍व भला ॥4॥

आनंद म्हणे निजखूण। दिली आत्मीची आठवण ॥5॥

      श्रीस्वामींच्या मुलस्वरुपाचा उलगडा होत असला तरी त्याचा सर्वदूर प्रसार करण्याची जबाबदारी सर्व भक्तांची होती. या कार्यास श्री आनंदनाथ सज्ज होणार तोच स्वामींनी एका अलौकिक कार्यासाठी निघण्याचे निर्देश त्यांना दिले. भविष्यात मठ स्थापनेसाठी वेंगुर्ला-कॅम्प भाग उत्तम आहे हे श्री आनंदनाथांनी नेमके ओळखले. वेंगुर्ला बंदरावर दशकभर स्वामी कार्य केल्यावर सन 1888 ला त्यांनी वेंगुर्ला कॅम्पमध्ये स्वामी स्थानाच्या उत्तरकालीन व्यवस्थेसाठी जागा खरेदी केली. सन 1892 ला मठासाठी त्या पुढीचच जागा स्वनामे घेऊन त्या जागेत मठ स्थापना व राहाण्यासाठी वरच्या बाजूस घर बांधले. नंतर एके वर्षी चैत्र वद्यच्या अखेरीला त्यांनी अघटीत लिला केली. तो शनिवारचा दिवस होता. दुर्धर रोगव्याधी यांच्या दमन क्षमनार्थ त्यांनी मठाच्या समोरच्या बाजूस उतरणीला डाव्या अंगास श्रीस्वामी समर्थ नामाचा जयजयकार करीत हातातील चिमटा जमिनीत मारला आणि तिर्थाची निर्मिती केली. यावेळी उपस्थितांचे तर आश्‍चर्याने डोळेच विस्फारले. त्यांच्याकडे वळून महाराज म्हणतात,

तळीमाजी करिता स्नान। पापे पळती रानोरान ॥1॥

रोग दुःखे हरुनी जाती। प्रेमभाव धरील्या चित्ती ॥2॥

कुळ होईल पावन। स्वामी चरणी राहाता मन ॥3॥

आनंद तीर्थाची हे कोटी। एका चरणाच्या अंगुष्ठी ॥4॥

आनंद म्हणे भाव धरा। सहज भवा लागी तरा ॥5॥

      सन 1903. त्यावर्षीच्या चैत्र वद्य चतुर्दशीला श्रीस्वामी महाराजांच्या देह निर्वाण लीलेची 25 वर्षे पूर्ण झाली. समाधी लीलेच्या दिवशी आनंदनाथ कोणताही उत्सव साजरा करीत नसत. तरी त्या दिवशी मात्र ते अधिकच अंतर्मुख बनले होते. त्यांनी मठाच्या उजव्या हाताला खोदकाम करुन घेतले व भुमीगत छान खोली बनवून घेतली. हे पाहून सर्व स्वामीभक्त शिष्यमंडळी हवालदिल होऊन गेली. तेव्हा वेंगुर्ला ग्रामविषयी आनंदनाथ म्हणाले, “सर्वांस चिदानंद मिळवून देईल असे हे श्रीस्वामींना प्रिय असलेले गाव यांस आम्ही ‘चिदापूर’ समजतो. ज्याचे भाग्य असेल तो येथे येईल. श्रीस्वामी गुरुंचे पद्यमय साहित्य निर्मितीची आज्ञा आम्हाला स्वतः महाराजांनीच दिली होती. मठ मंदिरातील नित्यपाठ व दैनंदिन शोडषोपचारासाठी आवश्‍यक असणाऱ्या आरत्या, स्तोत्रे बनविण्यास त्यांनीच प्रेरणा दिली. त्यानुसार ही जगदोद्धारार्थ व कल्याणार्थ विविध स्तवने केलेली आहेत. या सर्व रचना घोळवीत 3 दिवस व 3 रात्र असा ध्यास धरल्यास श्रीस्वामी महाराजांनी प्रत्यक्ष दर्शन देण्याची ग्वाही दिलेली आहे. हे लक्षात ठेवून तसा निजध्यास धरावा नि अनुभव घ्यावा.”

      वेंगुर्ल्यातील भक्तमंडळी त्यांना मनोमन भजत असल्यामुळे आनंदनाथांच्या समाधी घेण्याच्या निर्णयासरशी ते लोक हवालदील झाले. त्यांना खात्री देताना आनंदनाथ म्हणाले, “श्रीस्वामी गुरुंचे आत्मलिंग येथे आहे. त्याला शरण जा. तुम्हांस जे हवे ते मिळेल. आम्ही फक्त हा सांगावा सांगणारे आहोत. आमच्यापाशी देण्यासारखे काय आहे? श्रीस्वामीनाम जपाचा आग्रहच आम्ही धरु शकतो. आपण ज्या भक्तीने इथे वावरत आहात ते पाहून हा स्वामीदास आनंदीत आहे. मला हे चिदापूर अत्यंत भावलेले आहे. येथील तीर्थाने रोगव्याधी निवारणाची आम्ही खात्री देतो. आणखी तुम्हाला काय हवे आहे?” पुढे ते भावावस्थेत जाऊन म्हणू लागले-

चिदापूर आनंदाने केली। चिदानंद जाहली भक्तजना ॥1॥

अभाविका कैचे असे हे बा फळ। चित्त अमंगळ ज्याचे खरे ॥2॥

धरुनिया भाव येथे तरे तरी। दाता दिगंबर म्हणोनिया ॥3॥

भावेच तरती, भवपार होती। मोक्षालागी जाती उठाउठी ॥4॥

पुरे मनोरथ रोगाचा हा अंत। सदा ज्याचे चित्त स्वामीपायी ॥5॥

येथे स्नान केल्या कुष्ठी शुद्ध होती। कोडी उद्धरती खरोखर ॥6॥

परी ऐसे फळ भक्तीने लाविले। भाव तो निर्माण धरिलीया ॥7॥

आनंद म्हणे माझे वचन नेमाचे। नव्हे नव्हे काचे भाविकासी ॥8॥

      श्री आनंदनाथ निरवानिरव करु लागताच ज्यांना ज्यांना समजले ते महाराजांच्या दर्शनास येत होते. आपल्या कुटुंबियांना त्यांनी समजाविले होतेच, ज्येष्ठ शुद्ध षष्ठीच्या आधी मोजून सहा महिने व चार दिवस त्यांना यमदूताचा निरोप आला होता. श्री आनंदनाथांस ‘चला’ म्हणणे त्याला अवघड गेले. स्वतः यमराजासही त्यांची भिती पडली. तेव्हा लयकर्ता शिवशंकराचा खास ‘दूत’ त्यांस बोलविण्यासाठी आला. शंकराचेच प्रतिबिंब होते श्री आनंदनाथ हे! त्यामध्ये वेगळेपणा असा नव्हताच. पण देह निर्माण झाला की त्याचे विसर्जनही आलेच. या महान स्वामीदूताला ‘चल’ म्हणणार कोण. म्हणून खास दूत आला. तेव्हा आनंदनाथ म्हणाले, “आम्हास स्वामी सांगतील तेव्हाच निघणार. आजपासून 6 महिने व 4 दिवसानंतर ज्येष्ठ शुद्ध षष्ठीला समाधित शिरणार” असे ते ठणकावून बोलते झाले होते. –

नाही देखिला त्रिशूल। फोडील तुझे कोथाळ ॥1॥

अजूनी होई तू शहाणा। फुका भ्रमसी अज्ञाना ॥2॥

तुजा कैचा रे महादेव। तपी नेणती वैभव ॥3॥

जाला आयुष्य निवाडा। मुका बैस की माकुडा ॥4॥

साह मास चार दिन। तेव्हा देईन ओळखण ॥5॥

आनंद म्हणे आठव धरी। सोडी भ्रमाची भरारी ॥6॥

      या प्रसंगाचे वर्णन त्यांनी कुटुंबास ऐकविल्यानंतर व सत्शिष्यांना आश्‍वासिल्यानंतर फारसा गाजावाजा होऊ न देता मोजक्या भक्तमंडळींसह ते मठालगतच्या समाधीमंदिराकडे आले. सर्वांनी त्यांचे मनोभावे पूजन केले. श्री आनंदनाथ महाराज सर्वांचा निरोप घेऊन महाराजांच्या गुणवर्णनाची स्तोत्र म्हणत समाधीत बैसले. किंचित शांत होऊन त्यांनी समाधी लावली व स्तब्ध झाले. मोठ्या जड अंतःकरणाने सर्व स्वामीभक्त व परिवार समाधीतून वर आला.

      चिदानंदरुपी वेंगुर्ले ग्रामाच्या त्या समाधीतून एक धीरगंभीर ध्वनी शब्दफेक करीत नादब्रह्माच्या लहरी परिसरात उमटवू लागला-

स्वामीभक्ती जनी आम्हा आवडती। आणिकाची प्रिती नाही ॥1॥

सोयरे धायरे तेच आमचे खरे। स्वामीदास बरे जगांतरी ॥2॥

स्वामीराज ज्याचा संसार प्रपंच। झाला वित्तयोग मागेपुढे ॥3॥

अंतर्बाह्य पाहता स्वामीच ठसला। देवभक्त झाला एकरुप ॥4॥

आनंद म्हणे ऐसे मायेसी सुटलो। जीवनमुक्त जाहालो जगांतरी ॥5॥

संदर्भ- श्री आनंदनाथ महाराजांच्या चरित्राचा वेध

‘श्री स्वामी समर्थ दर्शन’

लेखक व संपादक-

संजय नारायण वेंगुर्लेकर

शब्दांकन- सीमा शशांक मराठे, 9689902367

प.पू. श्री आनंदनाथ महाराजांचे वंशज

मुलगा- कै.गणपत गुरुनाथ (आनंदनाथ) वालावलकर

नातू- कै. प.पु. गुरुनाथबुवा गणपत वालावलकर

नातसून- श्रीमती वासंती गुरुनाथ वालावलकर

पणतू- श्री. आनंदनाथ व सौ. अन्नपूर्णा, श्री. सचिन व सौ. समिक्षा

पणती- सौ. प्राची प्रदिप तिरोडकर, सौ. स्नेहा संजय कुलकर्णी

खापर पतवंडे- हर्ष, शुभम, नम्रता, स्वानंदी, स्वरा.

किती काय देणे आहे हेची सांगा।

विचार वावुगा नको नको ॥1॥

नामाविण वेळ जातां हो कवळ।

हाणिती सबळ जीवालागी ॥2॥

म्हणोनिया देणे मागेपुढे पाहाता।

तोडीतसे व्यथा स्वामीराज ॥3॥

घातला हा भार त्याच्या पायावरी।

                                                           आम्ही ते संसारी सुखी झालो ॥4॥

गेले यातायाती चित्तालागी शांती। पुढे हे विश्रांती पायालागी ॥5॥

आनंद म्हणे पुण्य खरे पूर्वजांचे। म्हणोनिया वाचे स्वामीराज ॥6॥

(संदर्भ- श्री स्वामी समर्थांचे प्रासादिक चित्रवैभव गुरुस्पर्श- शेखर साने, पान नं. 24)

This Post Has One Comment

  1. श्री गुरूदेव दत्त स्वामी समरथ 🙏

Leave a Reply

Close Menu