आपत्तींची शृंखला…!

निसर्गाने कोकणवर भरभरुन दान टाकले आहे. निसर्गाने दिलेल्या या देणगीतून कोकणचे एक वेगळे वैभव सर्वांनाच खुणावत असते. कोकणपासून गोव्यापर्यंत असलेल्या समुद्र आणि निसर्ग सौंदर्यामुळे पर्यटकांची सतत वर्दळ असते. एकट्या गोव्यात दरवर्षी २५ लाखांवर पर्यटक येत असतात. यातून हजारो लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. अशा या समृद्ध समजल्या जाणा-या कोकणवर सध्या निसर्गाची वक्रदृष्टी पडली की काय, असा संभ्रम निर्माण झाला आहे.

      गेल्या दशकभरात हवामानाचा सतत बदलता प्रवाह व जागतिक तापमान वाढीमुळे निसर्गाचा समतोल बिघडल्यामुळे वेगवेगळ्या आपत्ती येत आहेत. अलिकडच्या ४-५ वर्षांचा विचार केला तर कोकणात अतिवृष्टी, महापूर, वादळ अशा प्रकारच्या आपत्तीमुळे कोकणवासीय एका वेगळ्या भयग्रस्त वातावरणात वावरतो आहे. गेल्या वर्षभरात २ वेळा वादळे धडकली. यामुळे कोकणातील बागायत पिकांचे आणि नागरिकांच्या रहिवास क्षेत्राचे प्रचंड नुकसान झाले. राज्य आणि केंद्र शासनाकडून मदत मिळावी, अशी नेहमीच अपेक्षा असते. कारण, आपत्तीमुळे सारे गमावलेल्या कोकणी माणसाला आधाराची गरज असते. स्थानिक स्तरावर मानवतेच्या भूमिकेतून काम करणा-या संस्था-संघटना आणि दानशूर व्यक्ती आपल्या कुवतीनुसार मदतीचा हात पुढे करत असतात. अलिकडे समाज माध्यमामुळे व्हॉटसअॅप् ग्रुपद्वारे जगभरात असलेल्या कोकणातील लोक आणि कोकणविषयी सहानुभूती असलेल्यांकडून मदत मिळत असते. शासनाच्या मदतीचा विषय घेतला तर पंचनाम्यापासून तांत्रिक अडचणी निर्माण करण्यातच प्रशासनातील मंडळींना कसलातरी आनंद मिळत असावा, अशी प्रतिक्रिया त्रस्त झालेल्या आपद्ग्रस्तांकडून ऐकायला मिळते.

      दोन वादळाने सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या तीन जिल्ह्यांना मोठा फटका बसला. त्यातून सावरण्यापूर्वीच आता हवामान खात्याकडून आलेल्या रेड अलर्टमुळे कोकणातील जनता हादरुन गेली आहे. नैसर्गिक आपत्तींचा हा विषय नेहमीच येणारा ठरला आहे. कोरोनाचे संकट जगभर आहे. कोकणला सुद्धा या संकटाने विळखा टाकला आहे. खरे तर निसर्गात अशाप्रकारच्या महामारीचे आजार येण्याचे कारण नाही.

      कोकणात कोरोनासारख्या महामारीने अनेकांचे बळी घेतले. कुटुंबे उद्ध्वस्त झाली. मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्र्यांचे वादळानंतर दौरे झाले. मदतीच्या घोषणा झाल्या. विरोधी पक्ष नेत्यांचे दौरे झाले. वादळाचा विषय राजकीय पटलावरही सतत गाजून राहिला आहे. या सा-या गोष्टी कोकणी माणूस डोळसपणे पाहत आहे. दौरे, पंचनामे, घोषणा यापेक्षा आम्हाला मदत कधी मिळणार? तेवढेच बोला!अशी प्रतिक्रिया या  दौ-यानंतर ऐकायला मिळते. कोरोनाला रोखण्यासाठी आवश्यक त्या सोयीसुविधा तातडीने उपलब्ध करुन महामारीच्या संकटातून जनतेला बाहेर काढून दिलासा द्यावा, अशी अपेक्षा असली तरी साधनांचा अपुरा पुरवठा, अपुरे मनुष्यबळ, वैद्यकीय सेवेबाबत फारशी चांगली व्यवस्था पहायला मिळत नाही. एकूणच कोकणच्या वाट्याला आलेले हे भोग संपणार तरी कधी? असा प्रश्न कोकणातील जनता विचारत आहे.

      राज्य व केंद्र शासनाने तांत्रिक मुद्दे बाजूला ठेऊन आपद्ग्रस्त असलेल्या कोकणातील जनतेला दिलासा देण्याची गरज आहे. आपत्तींची ही शृंखला तुटून पूर्वीप्रमाणे मोकळा श्वास घेता यावा. खुलेपणाने जनजीवन सुरळीत व्हावे, पर्यटकांना मुक्तपणे संचार करता यावा, अशा वातावरणाची कोकण प्रतिक्षा करीत आहे.

     कोकणात वारंवार येणारी वादळे, होणारी अतिवृष्टी याबाबत कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी स्थानिक सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी राजकारणापलिकडे जाऊन कोकणचे वैभव जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. राज्यात आघाडीचे शासन आहे. केंद्रात भाजपचे भक्कम शासन आहे. या दोन्ही शासनाशी निगडीत लोकप्रतिनिधी कोकणात आहेत. केवळ आणि केवळ कोकणासाठी मतभेदाचे आणि राजकारणाचे मुद्दे बाजूला ठेऊन या प्रश्नाचा विचार करण्याची गरज आहे. ही आपत्तींची शृंखला तोडण्यासाठी विशेष नियोजन राबविण्याला पर्याय नाही. कोकणचे वैभव सांभाळण्याची जबाबदारी या भूमीतील प्रत्येक कोकणवासियाची आहे. एवढी एक गोष्ट लक्षात घेतली तर या प्रश्नाचा गुंता सहज सुटू शकतो.

 

Leave a Reply

Close Menu