बंद दाराआड…

ई-राजकीय पटलावर गेल्या २ वर्षांपासून एक विषय जोरदार चर्चेत आहे. अलिकडे तर राजकारणात या विषयाची वारेमाप चर्चा पहायला मिळते. नेत्यांची बंद खोलीतील चर्चा हा तो विषय आहे. यासाठी थोडे मागे जावे लागेल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बंद खोलीतील चर्चेपासून या विषयाला तोंड फुटले आहे.

     भाजप-शिवसेना युती तुटण्याच्या मार्गावर असताना मुख्यमंत्रीपदाच्या विषयावर उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यात मातोश्रीवर बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर शिवसेना-भाजप यांची दोस्ती तुटल्यानंतर या चर्चेचे काही पदर हळूहळू बाहेर येऊ लागले. शिवसेना व भाजप यांचे संबंध दुरावल्यानंतर आणि आता तर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी अशा आघाडीची स्थापना करून भाजपला अधिक जागा मिळून सुद्धा सत्तेपासून वंचित ठेवण्यात आले. या घटनेनंतर विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंद दाराआड झालेल्या चर्चेत मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिल्याचे जाहीर केले. भाजपच्या विविध नेत्यांच्या स्तरावर त्याचा इन्कार करण्यात आला. चर्चा मात्र सुरुच राहिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोकण दौ-यावर आले असता त्यांनी शिवसेनेला असा कोणताही शब्द दिला नव्हता, असे स्पष्ट केल्यानंतर शिवसेनेकडून म्हणजे खुद्द उद्धव ठाकरे यांच्याकडून यावर जोरदार टीका करण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री खोटे बोलत आहेत. मातोश्रीवर झालेल्या बैठकीत शब्द दिला होता पण आता त्याचा इन्कार करीत आहेत,‘ असा खुलासा केला. याच घटनेनंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अजितदादा पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीचा विषय खूपच गाजून राहिला. हा प्रयोग सुद्धा अति गोपनिय आणि बंद दाराआड झाला. परंतु हे सरकार अल्पघटकेचे ठरले. त्यानंतर वेगाने झालेल्या घडामोडीत शरद पवार यांनी तीन पक्षांना एकत्र करून आघाडी स्थापन करताना मुख्यमंत्रीपद शिवसेनेला देऊ केले. हा दुसरा विषय झाला. या पाठोपाठ शरद पवार आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. त्याबाबतही अद्याप नेमकी माहिती बाहेर आलेली नाही. यातच महाराष्ट्राच्या प्रश्नासाठी आघाडी शासनाचे एक शिष्टमंडळ दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले. या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. त्याबाबतही नेमकी माहिती अजुनही बाहेर आलेली नाही. बंद दाराआड चर्चेची पद्धत आता राजकारणात जवळजवळ रूढ होत चालली आहे.

     परंतू पूर्वीची एक म्हण आहे. भिंतीलाही कान असतात.त्यामुळे बंद दाराआड कोणीही नेत्याने कसलीही चर्चा केली तरी त्या चर्चेतील माहिती हळूहळू बाहेर येतच असते. याचा जणू विसर पडावा, अशा थाटातच नेतेमंडळी बंद दाराआड चर्चा करून राजकीय वर्तुळात काही काळ संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, हे मात्र खरे.

     परस्परविरोधी विचारसरणीचे आणि राजकारणातील परस्परविरोधी असलेले नेतेच अशी बंद दाराआड चर्चा करीत असल्याने त्याला विशेष महत्त्व आहे. हे जरी खरे असले तरी कोरोनाने प्रश्नांची मालिका उभी केली आहे. सर्वसामान्य जनतेला जगण्याची भ्रांत पडली आहे. त्यामुळे राजकारणातील आरोप-प्रत्यारोपांची जुगलबंदी असेल किवा बंद दाराआडच्या चर्चा असतील. यामध्ये जनतेला बिलकुल स्वारस्य नाही, या गोष्टीचा नेत्यांना विसर पडता कामा नये. एवढाच या निमित्ताने निष्कर्ष सांगता येईल.

Leave a Reply

Close Menu