आरोग्याच्या सुविधा कमी पडू देणार नाही-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राजकारणामध्ये अनेक भूमिपूजने करुन ती विसरुन जायची असतात किवा तशी परंपरा आहे. परंतु, त्या परंपरेमधील आपण नाही. भूमिपूजनावेळी लोकार्पणचाही शब्द दिला होता तो आज पूर्ण झाला. आरोग्याच्या सुविधा कमी पडणार नाहीत आणि त्या कमी पडू देणार नाहीत. आरोग्याच्या सर्व सुविधा पूर्ण करतानाच सेंटलुक्स रुग्णालयाबाबतही योग्य तो निर्णय घेतला जाईल असे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेंगुर्ला येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या लोकर्पण सोहळ्याप्रसंगी केले.

      वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालय येथे नविन इमारत उभारुन तिथे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालय उभारले आहे. याचे लोकार्पण आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. यावेळी या नूतन उपजिल्हा रुग्णालयाच्या सभागृहात खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, जिल्हापरिषद मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर, सिधुदुर्ग पोलिस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील, नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ आदी व्यासपिठावर उपस्थित होते. तर      आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री राजेश टोपे, जिल्हापरिषद अध्यक्ष संजना सावंत, आमदार नितेश राणे, माजी आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत, पंचायत समिती सभापती अनुश्री कांबळी आदी ऑनलाईन उपस्थित होते. 

      लोकार्पण सोहळ्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, ज्यावेळी या रुग्णालयाचे भूमिपूजन झाले त्यावेळी कोरोनाचे संकट नव्हते. मात्र, कोरोना काळात त्याचा उपयोग होत आहे. कोविडवर औषध आलेले नाही. त्यातच डेल्टा प्लससारखा रोग येत आहे. त्यामुळे जनतेने गाफिल राहू नये. कोविडच्या महामारीत तसेच चक्रीवादळांच्या आव्हानाला सिधुदुर्गवासीयांनी चांगल्याप्रकारे तोंड दिले आहे. वेंगुर्ल्यातील हे रुग्णालय लोकार्पण केले असले तरी याठिकाणी लोकांना यायची वेळ येऊ नये आणि आलेच तर ते इकडच्या औषधोपचारांनी बरे होऊन जावेत असेही सांगितले.

      या जिल्ह्यासाठी दोडामार्ग आणि देवगड हे २२ कोटींचे, वेंगुर्ला ७ कोटी व सावंतवाडी येथे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल हे ३७ कोटींची आदी रुग्णालये मंजूर झाली. त्यापैकी वेंगुर्ला येथील रुग्णालयाचे काम पूर्ण होऊन ते सुरुही झाले. आरोग्यमंत्री, महसूलमंत्री आणि बांधकाममंत्री यांच्या उपस्थितीत आपण एक बैठक लावली तर या उर्वरित तिन्ही रुग्णालयांचे काम सुरु होऊ शकेल अशी विनंती आमदार केसरकर यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली.

      डॉक्टर्स आणि कर्मचारी यांची जिल्ह्यामध्ये कमतरता असताना सुद्धा कोणतेही कारण न देता या जिल्ह्याचे आरोग्य सुदृढ रहावे यासाठी येथील आरोग्य यंत्रणा अहोरात्र मेहनत घेत आहेत. पहिल्या लाटेत जिल्हा ग्रीन झोनमध्ये होता. परंतु, दुर्देवाने आता रेड झोनमध्ये आला आहे. तरीही खचून न जाता येथील आरोग्य यंत्रणा जिद्दीने काम करीत आहेत असे प्रतिपादन खासदार राऊत यांनी केले.

      शासनाने खास बाब म्हणून सेंटलुक्स हॉस्पिटल ताब्यात घेऊन त्याला पुनरुज्जिवन प्राप्त करुन द्यावे अशी मागणी पालकमंत्री उदय सामंत यांनी केली. आपल्या मार्गदर्शनाखाली कोविडच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन प्लांट, मेडिकल सुविधा व अन्य सर्व बाबी अशांना उपयुक्त जिल्हा ठरला पाहिजे यासाठी आम्ही सर्व काम करीत असल्याचेही श्री. सामंत यांनी सांगितले.

      मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आरोग्या हा विषय हृदयाच्या जवळ राहिलेला आणि याची जाणिव आपणास वारंवार येते. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली आरोग्यमंत्री या नात्याने कोकणात अनेक चांगली कामे करण्याची संधी मिळाली आहे. जे जे प्रश्न आरोग्याच्या संबंधित या हॉस्पिटलचे असतील ते सगळे निश्चित प्रकारे सोडवू असे मी सर्वांना खात्रीपूर्वक सांगतो. येथील रिक्तपदांचा विषय जातीने मी सोडविन असे आश्वासन आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री राजेश टोपे यांनी दिले.

      यावेळी तहसिलदार प्रविण लोकरे, डॉ.महेश खलिफे, शिवसेनेचे संदेश पारकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख सुनिल डुबळे, बाळा दळवी, तालुकाप्रमुख यशवंत परब, शहरप्रमुख अजित राऊळ, नगरसेवक संदेश निकम, सुमन निकम, वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांच्यासह रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बांधकाम कंत्राटदार ए.एस.जुवेकर यांचा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

      कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांनी, सूत्रसंचालन सचिन वालावलकर यांनी केले तर आभार रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ.अतुल मुळे यांनी मानले.

Leave a Reply

Close Menu