कुठे नेऊन ठेवला आहे सिंधुदुर्ग माझा?

शिवसेनेच्या 55 व्या वर्धापन दिनानिमित्ताने कुडाळ येथे आमदार वैभव नाईक यांनी पेट्रोल वाटपाची ‘स्कीम’ जाहीर केली. त्यावरून 19 जून 2021 रोजी शिवसेना भाजप कार्यकर्त्यांमध्ये राजकीय राडेबाजी झाली. ही घटना वृत्तपत्रांची हेडलाईन बनली. 22 जून 1991 रोजी कणकवली येथे भरदिवसा धारधार हत्याराने श्रीधर नाईक यांचा खून झाला. आज या घटनेला तीस वर्ष पूर्ण झाली आहेत. या 30 वर्षात कोकणच्या राजकारणाची दिशा बदलली आहे. बॅरिस्टर नाथ पै, मधु दंडवते यांच्या परंपरेतील सिंधुदुर्गचे राजकारण, नाथ पैनी सभागृहात केलेली अभ्यासपूर्ण भाषणे, दंडवतेंनी साकारलेले रेल्वेचे स्वप्न यासह तत्कालीन राजकारणातील शालीनता, नेत्यांची सौजन्यपूर्ण वागणूक, प्रश्‍नांची अभ्यासपूर्ण मांडणी यामुळे तत्कालीन राजापूर मतदार संघाचा देशात सन्मानाने उल्लेख होत होता. त्याच मतदारसंघात राजकीय प्रश्‍नावरून राडेबाजी करत हातघाईवर येऊन कोणी कोणाला कसे हुसकावले याची ‘फुशारकी’ मिरवली जाते. तथाकथित कार्यकर्त्यांची पाठ थोपटणारे नेतृत्व आणि त्याला मिळणारी व्यापक प्रसिद्धी यातून हा मतदारसंघ राजकीय नेतृत्वाने कुठे नेऊन ठेवलाय? असा प्रश्‍न पडल्यावाचून राहत नाही.

महागाईच्या प्रश्‍नाला कितपत न्याय मिळाला?

     पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे वाढलेल्या महागाईची झळ सर्वसामान्यांच्या खिशाला आणि गृहिणींच्या बजेटला बसत आहे. शिवसेनेने हाच महागाईचा मुद्दा उचलत 55 व्या वर्धापन दिनी राज्यात काही ठिकाणी सवलतीच्या दरात पेट्रोल वाटप करण्याची योजना आखली. सिंधुदुर्गात कुडाळ येथे या मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी शंभर रुपयात दोन लिटर पेट्रोल, तसेच भाजप सदस्यत्वाचे ओळखपत्र दाखविल्यास प्रत्येकी एक लिटर पेट्रोल मोफत. अशी जाहिरात सोशल मीडियावर केली. कुडाळमध्ये नारायण राणे यांच्या पेट्रोल पंपासमोर आमदार नाईक यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते कुपन्स वाटत होते. त्यावेळी शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने सामने आले. त्यामुळे काही काळ कुडाळमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या गोंधळात महागाईच्या प्रश्‍नाला कितपत न्याय मिळाला? ते सांगता येत नाही. पण ‘कार्यकर्त्यांमध्ये जुंपली’, ‘कार्यकर्त्यांची धक्काबुक्की….’ अशा प्रकारच्या बातम्या ठळकपणे समोर आल्या. इंधन दरवाढ आणि महागाईचा प्रश्‍न बाजूला पडून कायदा, सुव्यवस्था आणि तणाव यांनीच बातम्यांचे मथळे आणि प्रसार माध्यमातल्या जागा व्यापल्या. सोशल मीडिया, व्हाट्सअप वर कार्यकर्त्यांनी एकमेकांवर यथेच्छ तोंडसुख घेत आपल्या नेत्यांची ‘तळी’ उचलण्यातच धन्यता मानली. दोन्हीकडच्या कार्यकर्र्त्यांवर या प्रकरणात गुन्हे दाखल झाले आहेत.

संदेश जात असतो नेत्यांच्या छोट्याशाही कृतीतून

     19 जून 2021 च्या या घटनेनंतर बरोबर दोन दिवसांनी 22 जून 2021 ला श्रीधर नाईक यांच्या राजकीय सत्तेला तीस वर्षे पूर्ण होत आहेत. कोकणातील या पहिल्या राजकीय हत्येने तत्कालीन परिस्थितीत महाराष्ट्र हादरला होता. त्यानंतर कोकणच्या राजकारणाची दिशा बदलली. यापूर्वीच्या काळात  राजापूर लोकसभा मतदारसंघ हा बॅरिस्टर नाथ पै, मधु दंडवते यांच्यासारख्या अभ्यासू संसदपटूचा आणि बुद्धीवंतांचा मतदारसंघ म्हणून लोकसभेत आणि देशाच्या राजकारणात नावाजलेला होता. त्याच मतदारसंघातील गेल्या तीस वर्षांतील वाटचाल मतदारांना विचार करायला लावणारी आहे. तत्कालीन परिस्थितीत बॅरिस्टर नाथ पै यांची लोकसभेतील मांडणी, त्याला पंडित नेहरू सारख्या तत्कालीन पंतप्रधानांनी दिलेली दाद; नाथ पै यांचा व्यासंग, सामान्यांच्या प्रश्‍नांशी जोडलेली नाळ त्यामुळे ‘सर्वसामान्यांचा नाथ’ ही त्यांची प्रतिमा होती. त्यानंतर मधु दंडवते यांनी हा वारसा समर्थपणे चालवला. कोकणातील सर्वसामान्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल करणारा ‘कोकण रेल्वे’ सारखा प्रकल्प दंडवते यांनी प्रत्यक्षात आणला. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे तत्त्व कायम ठेवून कार्यकर्त्यांसमोर राजकारणातील शालीनतेचा आदर्श ठेवला. त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीत मात्र दंडवतेंचा पराभव झाला. हा पराभव सुद्धा दंडवते यांनी खिलाडू वृत्तीने आणि मोठ्या मनाने स्वीकारला. नेत्यांच्या अशा छोट्या छोट्या कृतीतून कार्यकर्त्यांना एक संदेश जात असतो.

‘भीक नको पण कुत्रे आवरा’

     आता कुडाळच्या घटनेनंतर हा राजकीय बदल प्रकर्षाने समोर येत आहे. संसदेचे विधिमंडळाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींकडून हे प्रश्‍न दांड्या-काठ्यांनी नव्हे तर धारधार संसदीय आयुधांनी, अभ्यासू मांडणीने जनतेच्या निदर्शनास आणून देण्याएवढी गुणवत्ता दाखविणे अपेक्षित असते. मात्र ही जागा जेव्हा अविवेकी विचार आणि आतताईपणा घेतो तेव्हा मूळ प्रश्‍न बाजूला पडतो. याच राजकीय नेतृत्वाकडून कायदा आणि सुव्यवस्थेचे वेगळे प्रश्‍न निर्माण होतात. त्यामुळे जनतेवर ‘भीक नको पण कुत्रे आवरा’ असे म्हणण्याची वेळ आली तर आश्‍चर्य वाटायला नको.

     आपल्या या कृतीने जनतेला नेमके काय दिले याचा विचार कार्यकर्त्यांनी करणे आवश्‍यक आहे. लोकशाहीत कार्यकर्त्यांची कमिटमेंट (बांधिलकी) ही ‘जनतेशी असणे’ अपेक्षित आहे. मात्र ही जागा आपल्या नेत्याच्या ‘नजरेत’ मिळवण्यासाठी आपण कोणत्या थरापर्यंत जात आहोत याचे ‘आत्मपरीक्षण’ होणार आहे का? पण आत्मपरीक्षण करण्यासाठी आपण काही चुकीचे तर करत नाही ना? हे तपासून घेण्याची भावना कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या मनात असणे आवश्‍यक आहे. याउलट राडेबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांचे जाहीर सत्कार सोहळे, त्यांना नेत्यांनी दिलेली शाबासकी, या सर्वांना मिळणारी व्यापक प्रसिद्धी यामुळे कार्यकर्त्याला आपण करतो आहे ते योग्यच आहे ही भावना बळावणे स्वाभाविक आहे. अशा प्रवृत्तीला प्रोत्साहन देणारे आपले नेतृत्वही या राजकीय राडेबाजीसाठी आपला वापर तर करून घेत नाही ना? याचा कार्यकर्ते कधीतरी विचार करणार आहेत का?

     नाथ पै, दंडवते यांच्या काळातील उपाशी-तापाशी फिरणारे आणि प्रसंगी वडापाव खाऊन अहोरात्र प्रचार करणारे कार्यकर्ते आणि आताच्या राजकीय नेतृत्वाकडील कार्यकर्ते यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक पडला आहे. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, त्यातून मिळणारी कंत्राटे यात कार्यकर्ते गुरफटू लागले आहेत. त्यासाठी मग कोणत्याही थराला जाऊन आपल्या नेत्याला ‘खूश’ करण्याचे प्रकार कधीतरी थांबणार आहेत का? याचा जाब आता जनतेनेच विचारायला हवा आहे.

सत्तेतून दिसणारा पैसा समाजाला घातक

     एकेकाळी राजकारण म्हणजे स्वातंत्र्याचा लढा होता, त्यानंतर सामाजिक प्रश्‍नांसाठी राजकीय भूमिका आणि वैचारिक संघर्ष होता, काळानुरूप राजकारण हा शब्द इतका बदनाम झाला की कुठल्याही वाईट कृत्याला ‘राजकारण झाले’ हा वाक्प्रचार त्या घटनेचे वर्णन करण्यासाठी रूढ झाला. सध्याच्या राजकीय परिस्थितीत कार्यकर्त्यांची वैचारिक जडण-घडण करण्याची प्रक्रिया दिसून येत नाही. त्यापूर्वी विद्यार्थी चळवळी, पक्षांच्या युवक संघटना यातून कार्यकर्ते घडत असत. पक्षाचा ‘केडर बेस’ निर्माण होत होता. आता ‘आयाराम-गयाराम’ संस्कृतीमुळे या पक्षातून त्या पक्षात ‘पक्षांतर’ हे काही नवीन नाही. त्यामुळे ‘पक्षनिष्ठा’ हा शब्द जवळपास कालबाह्य झाल्यात जमा आहे. येनकेन प्रकाराने सत्ता आणि सत्तेतून पैसा हेच सूत्र रुढ होऊ नये, असे वाटत असेल तर मतदारांनीही सजग होणे गरजेचे आहे.

     सिंधुदुर्गात आज आरोग्याचा प्रश्‍न गंभीर आहे. या प्रश्‍नावर पक्षीय राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची नितांत गरज आहे. येत्या काळात त्यावर काम झाल्यास कित्येकांचे प्राण वाचतील. जनतेचे प्रश्‍न मांडणे हे विरोधकांचे काम आहे, पण ही मांडणी कशी असावी आणि सत्ताधाऱ्यांनीही ती कशा प्रकारे घ्यावी हे महत्त्वाचे आहे. आरोग्या सारख्या जीवन-मरणाच्या प्रश्‍नावर तरी राजकारण दूर ठेवून चिरस्थायी आरोग्य व्यवस्था उभारणे आणि त्यासाठी कार्यकर्त्यांचे बळ लावणे, नेत्यांनी त्याला पाठबळ देणे हे घडणार आहे का? हा प्रश्‍न आज जनतेच्या मनात आहे. राडेबाजी आणि राजकीय हाणामारीच्या संस्कृतीने कुठे नेऊन ठेवला आहे सिंधुदुर्ग माझा? हा प्रश्‍न विचारण्याची वेळ जनतेवर येऊ नये. त्यासाठी समाजधुरीणांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि ज्येष्ठांनी वेळीच कार्यकर्त्यांना याची जाणीव करून देणे आवश्‍यक आहे.

– यतीन माणगावकर

kirattrust@gmail.com

Leave a Reply

Close Menu