साधी लक्षणे उपचार-करण्यायोग्य कर्करोग शोधण्यात मदत करू शकतात

बदलती जीवनशैली आणि चुकीची आहार पद्धती याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. त्यामुळे सध्याच्या काळात पोटाचे विकार, कर्करोग, मधुमेह असे अनेक आजार, समस्या नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहेत. यामध्येच गेल्या काही काळापासून कर्करोगाचं प्रमाण वाढल्याचं दिसून येत आहे.  साधारणपणे ब्रेस्ट कॅन्सर, घशाचा कॅन्सर, ब्लड कॅन्सर याविषयी साऱ्यांनाच माहित आहे. मात्र, प्रोस्टेट, यूरिनरी ब्लॅडर आणि किडनी कॅन्सर म्हणजे मूत्रपिंडाच्या कॅन्सरविषयी अनेक समज-गैरसमज आहेत.

     हे कर्करोग लवकर चिन्हे किंवा लक्षणे दर्शवितात जे रुग्णांकडून नियमितपणे चुकतात आणि म्हणूनच त्यांना लवकर पकडण्यासाठी आणि उपचार करण्यासाठी काही कालावधी गमावला जातो. असे एक सामान्य लक्षण म्हणजे ‘हेमाटुरिया‘ म्हणजे लघवीतील रक्त. मी पाहतो की बरेच रुग्ण माझ्याकडे सल्लामसलत करण्यासाठी येतात आणि मला त्यांचे लघवीचे अहवाल रक्ताची उपस्थिती दर्शविणारे दिसतात. तपासणीत रुग्णाचे वय लक्षात न घेता 20-25% जणांना कर्करोग असल्याचे आढळतात.

     तर ही लक्षणे किती महत्त्वाची आहेत आणि ते लवकर शोधणे का महत्त्वाचे आहे हे पाहूया.

लघवीतील रक्त –लघवीमध्ये रक्त किंवा रक्तपेशी आढळणे याला हेमाटुरिया म्हणतात. लघवीमध्ये रक्त येणे म्हणजे आजाराचे लक्षण असे नेहमीच मानले जात नसले तरी आरोग्याच्या एखाद्या संभाव्य, गंभीर समस्येची सूचना यामधून दिली जात असल्याची शक्यता असते. त्यामुळे याकडे अजिबात दुर्लक्ष केले जाता कामा नये. लघवीमध्ये रक्त आढळून येण्याचे नेमके कारण काय ते समजून घेऊन त्यानुसार हेमाटुरियावरील उपचार केले जातात. वैद्यकीय पार्श्‍वभूमी, शारीरिक तपासणी आणि तपासण्यांचे अहवाल यांच्या आधारे उपचाराचे सर्वोत्तम पर्याय निश्‍चित केले जातात.

हेमाटुरिया म्हणजे काय? – लघवीमध्ये रक्त पेशी आढळून येणे याला हेमाटुरिया म्हणतात. हे एकतर ग्रॉस किंवा मायक्रोस्कोपिक असू शकते.  नुसत्या डोळ्यांनी पाहिले तरी दिसून येईल इतक्या प्रमाणात जेव्हा लघवीमध्ये रक्त असते तेव्हा त्याला ग्रॉस हेमाटुरिया म्हणतात.  अशा प्रकारची लघवी केली गेल्यावर शौचकुपातील पाणी हलके गुलाबी किंवा गडद लाल रंगाचे दिसते. लघवीतील रक्तपेशी फक्त मायक्रोस्कोपच्या साहाय्यानेच दिसू शकतील इतक्याच प्रमाणात जेव्हा असतात तेव्हा त्याला मायक्रोस्कोपिक हेमाटुरिया म्हणतात. जेव्हा युरीन टेस्टस्ट्रिपच्या ऑक्सिडायजेशन मुळे रंग बदलतो तेव्हा त्याला डीपस्टिक हेमाटुरिया असे म्हटले जाते. अशा केसेसमध्ये लघवीमध्ये रक्तपेशी आहेत असा अर्थ प्रत्येक वेळी होतोच असे नाही.

हेमाटुरियाची कारणे कोणती? – लघवीमध्ये रक्त किंवा रक्तपेशी आढळून येण्यामागे अनेक कारणे असू शकतात, त्यापैकी काही कारणे इतरांच्या तुलनेत अधिक गंभीर असतात.  पुढे नमूद करण्यात आलेल्या कारणांव्यतिरिक्त इतरही अनेक गोष्टी याला कारणीभूत ठरू शकतात.

© मूत्रमार्गामध्ये संसर्ग (युटीआय)

© प्येलोनेफ्रिटीस (पार किडनी पर्यंत पोहोचलेला युटीआय)

© मूत्राशयात खडे होण्याचा आजार

© प्रोस्टेट ग्रंथी वाढणे (बिनाइन प्रोस्टॅटीक हायपरट्रॉफी)

© मूत्रमार्गाला इजा होणे

© किडनीचा आजार

© सिकल सेल (रक्तातील लाल पेशींचा) आजार

© मूत्राशयाचा कर्करोग

© किडनीचा कर्करोग

© प्रोस्टेट कर्करोग

     कृपया ध्यानात ठेवा की आपण ज्या प्रकारचे अन्न खातो त्यानुसार लघवीचा रंग बदलू शकतो. बीट, ब्लॅकबेरी, भरपूर रंग घातलेले खाद्यपदार्थ, व्हिटॅमिन टॅबलेट्स यांच्या सेवनामुळे देखील लघवीचा रंग बदलतो.

हेमाटुरियाची लक्षणे कोणती आहेत? – लघवीमध्ये रक्त आढळून येणे हे आजाराचे गंभीर लक्षण आहे असे नेहमीच मानले जात नसले तरी ते एखाद्या संभाव्य आरोग्य समस्येचे महत्त्वाचे सूचक असू शकते.

     लघवी जर रक्ताळलेली दिसत असेल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. खास करून तुम्हाला जर पुढील त्रास होत असतील आणि तुमच्या लघवीमध्ये रक्त दिसत असेल तर तातडीने डॉक्टरशी संपर्क साधावा:

© सतत लघवी होणे, लघवी होताना वेदना किंवा लघवीची भावना अति तीव्र असणे.

© मळमळ, उलट्या, ताप किंवा पोटात वेदना.

हेमाटुरियाचे निदान कसे होते? – जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जाता तेव्हा ते तुमची वैद्यकीय पार्श्‍वभूमी जाणून घेतात आणि तुम्हाला तपासतात. यामुळे डॉक्टरना तुमची लक्षणे अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेण्यात मदत होते.  तुम्हाला पुढील प्रमाणे इतर काही तपासण्या करण्यास डॉक्टर सांगू शकतात –

© युरीनलिसिस: लघवीच्या नमुन्याची केली जाणारी तपासणी

© युरीनकल्चर: काही संसर्ग झाला आहे का हे तपासण्यासाठी केली जाणारी लघवीची तपासणी

© युरीनसायटॉलॉजी: असामान्य दिसणाऱ्या पेशी तपासण्यासाठी केली जाणारी लघवीची तपासणी

© सिस्टोस्कोपी: सिस्टोस्कोप हे उपकरण वापरून मूत्राशय व मूत्रमार्ग यांच्या आत पाहून केली जाणारी तपासणी

© कम्प्युटेड टोमोग्राफी (सीटी) स्कॅन: क्षकिरणे आणि संगणक यांच्या साहाय्याने पोट व ओटीपोटीचे क्रॉस-सेक्शनल फोटो काढले जातात.

हेमाटुरियावर उपचार कसे केले जातात?- हेमाटुरियावरील उपचार हे लघवीमध्ये रक्त का आढळून आले आहे याच्या नेमक्या कारणावर अवलंबून असतात. रुग्णाची वैद्यकीय पार्श्‍वभूमी, शारीरिक तपासणी, इतर तपासण्यांचे अहवाल यांचा अभ्यास करून उपचारांचे सर्वोत्तम पर्याय निश्‍चित केले जातात.  उदाहरणार्थ, युटीआयमुळे होणाऱ्या हेमाटुरियामध्ये अँटिबायोटिक्सचा (प्रतिजैविकांचा) वापर हा मानक उपचार आहे.  प्रतिजैविके युटीआयला कारणीभूत ठरणाऱ्या बॅक्टेरियाला नष्ट करण्यासाठी काम करतात, परिणामी लघवीमध्ये रक्त येणे थांबते.

हेमाटुरियाचा धोका कोणाला असतो? – हेमाटुरियाच्या कारणांमध्ये नमूद करण्यात आलेले आजार ज्यांना आधीपासून आहेत त्यांच्या लघवीमध्ये रक्त किंवा रक्तपेशी आढळून येऊ शकतात. तसेच काही पुढे नमूद करण्यात आलेल्या विशिष्ट कृतींमुळे लघवीमध्ये रक्त येण्याची शक्यता वाढते.

© धूम्रपान

© वेदनाशामक औषधांचे अति सेवन

© काही विशिष्ट रसायनांच्या संपर्कात येणे

© रेडिएशनच्या संपर्कात येणे

© भरपूर अंतर धावणे किंवा जॉगिंग करणे

मी माझ्या डॉक्टरशी संपर्क कधी केला पाहिजे? – लघवीमध्ये रक्त किंवा रक्तपेशी आढळून येणे या गोष्टीकडे अजिबात दुर्लक्ष करता कामा नये.  लघवीमध्ये रक्त आढळून येताच किंवा या आजाराशी संबंधित इतर काही लक्षणे तुमच्यामध्ये आढळून येत असल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा.

– डॉ. संतोष एस वायंगणकर

कन्सल्टन्ट – युरॉलॉजिक ऑन्कोलॉजी अँड रोबोटिक सर्जरी

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबई

Leave a Reply

Close Menu