राजकारणात राजकीय भूकंप आणि त्या जोडीला आता लेटरबॉम्बहे शब्द परवलीचे झाले आहेत. कोणत्याही राजकीय पक्षात कोणत्याही कारणाने असलेली खदखद एखाद्या नेत्याच्या तोंडून बाहेर पडते. खरे तर हा पक्षातील अंतर्गत मामला असतो. परंतु, माध्यमांना अशाप्रकारचा एखादा मुद्दाही आपल्याला काहीतरी गवसले आहे, अशा  थाटात तो वाचकांसमोर मांडण्याची स्पर्धा आपण पाहत आलो आहोत. अलिकडे तर वृत्तवाहिन्यांवर असे विषय सातत्याने पहायला मिळतात. त्या विषयाचा खरे खोटेपणा तपासायची गरज असते. त्या विषयाच्या मुळाशी जाण्याची गरज असते. परंतु, माध्यमातून स्पर्धेच्या आजच्या काळात तेवढा वेळही नाही. टीआरपीमिळविण्यासाठी सनसनाटी वृत्तएवढ्या मर्यादेतच या विषयाकडे पाहिले जाते.

       ‘लेटरबॉम्बया अनुषंगाने गेल्या ४ महिन्यात २ घटना समोर आल्या आहेत. पोलिस महासंचालक परमवीरसिंग यांची बदली झाल्यानंतर त्यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विविध मार्गाने १०० कोटी रुपये जमविण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप केला. त्यांनी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांना या संदर्भात पत्र पाठवून चौकशीची मागणी केली. केंद्रशासन आणि राज्यातील आघाडी शासन यांचे संबंध जगजाहीर आहेत. त्यामुळे आयतीच मिळालेली संधी घेतली नसती तरच नवल. परमवीरसिंग यांचा पत्राच्या अनुषंगाने अनिल देशमुख यांच्या दबाव आला आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला. प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर आता अनिल देशमुख यांच्या चौकशीसाठी केंद्रीय तपास यंत्रणा कामाला लागल्या आहेत. गुन्हा नोंदवून चौकशी सुरु करण्यात आली आहे. न्यायालयाच्या स्तरावर याचा काय निर्णय व्हायचा तो होईल. मात्र परमवीरसिंग यांच्या पत्राला लेटरबॉम्बचेस्वरुप आले आणि आठवडाभर माध्यमातून यावरच उलटसुलट चर्चा होत राहिली.

   दुसरा विषय यापेक्षा थोडा अधिक व्यापक म्हणता येईल. केंद्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर असलेले शिवसेनेचे नेते आम. प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एक खुले पत्र पाठवून भाजप आणि केंद्र शासन यांच्याशी मिळतेजुळते घ्यावे तरच आमच्या सारख्या कार्यकर्त्यांचा व कुटुंबियांचा त्रास थांबणार आहे. या पत्राने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडवून दिली. आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरु झाले. यातून भविष्यात आघाडी शासनाच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह लावून चर्चा सुरू केली आहे. आघाडी शासन भक्कम आहे. त्यामुळे अशा एका पत्रातून शासनावर काही परिणाम होणार नाही, असा खुलासा आघाडी शासनातील मंत्री करीत आहेत.

     भाजपने मात्र याबाबत चौकशीची मागणी करुन हे प्रकरण खूपच गंभीर असल्याचे मत व्यक्त केले आहे. अशाप्रकारे एखाद्या पक्षातील नेत्याच्या पत्रामुळे त्याला लेटरबॉम्बचेस्वरुप देऊन चर्चा सुरु आहे. एकूणच राजकारणात कोणता विषय कोणत्या स्तराला जाईल आणि माध्यमातून त्याची कशी चर्चा होईल, याबाबत काही सांगता येणार नाही. दोन्ही प्रकरणे सध्या जोरदार चर्चेत असली तरी यातून नेमकेपणाने काय बाहेर येणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लेटरबॉम्बसमजल्या जाणा-या पत्राचा किती गांभिर्याने विचार करणार? याबाबत आगामी काही काळातच यावर प्रकाश पडण्याची वाट पहावी लागणार आहे.

   दरम्यान, शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरे यांनी तीन पक्षाचे आघाडी शासन समान कार्यक्रमावर उभारले आहे. ते भक्कम आहे. अशा काळात स्वतंत्र निवडणूक लढविण्याची भाषा कोण करीत असेल तर त्याला लोक जोड्याने मारतील, अशा ठाकरीशैलीत त्यांनी केलेली  टीका माध्यमांसाठी आठवडाभर चर्चेचा विषय ठरली.

     ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच भाजपला रोखण्यासाठी महाराष्ट्रात आघाडी शासनाचा प्रयोग केला आहे. परस्पर विचारसरणी असली तरी निश्चित कार्यक्रमावर आधारित स्थापन झालेल्या शासनाने २ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. कोविड सारख्या महामारीच्या गंभीर संकटाची परिस्थिती आघाडी शासनाने मोठ्या धैर्याने आणि सर्वशक्तीने हाताळली आहे. असे असले तरी कोरोना -मुळे महाराष्ट्रात लाखावर बळी गेले आहेत. अशा परिस्थितीत खरे तर पक्षीय मतभेद बाजूला ठेऊन सर्वांनी जनतेचा विचार करायला हवा. राजकारणापलिकडे जाऊन जनतेला दिलासा देण्यासाठी एकत्र येऊन आम्ही तुमच्या पाठिशी आहोत, अशा प्रकारचा संदेश जनतेपर्यंत गेला तर जनतेचे मनोबल वाढविण्यास मदत होणार आहे. परंतु, आघाडी शासन स्थापन झाल्यापासून ते आज पडणार, उद्या पडणार अशाप्रकारची वातावरण निर्मिती करण्यासाठी भाजपने एकही संधी सोडलेली नाही. या सर्व घडामोडी जनता डोळसपणे पाहते आहे. कोण कशी भूमिका घेतो, राजकारणासाठी आपल्याला वेठीस कोण धरते, याबाबत जनता सावधपणे लक्ष ठेऊन आहे. कोणताही विषय असू द्या; परंतु जनतेला दिलासा मिळेल, अशीच भूमिका अपेक्षित आहे. तशी भूमिका घेणे शक्य नसेल तर जनतेच्या त्रासात भर पडणार नाही, एवढी काळजी तरी घेता येईल. परंतु, ही अपेक्षा करायची तरी कोणाकडे? हा खरा प्रश्न आहे.

 

Leave a Reply

Close Menu