‘अतुल’नीय हुले

साधारण 1985 – 90 दरम्यान एका प्रमुख दैनिकात एक जाहिरात झळकली होती. मुंबई “दूरदर्शन वर मालवणी!“ त्यासाठी नवोदित कलाकारांनी संपर्क साधावा अशी अपेक्षा होती. त्या जाहिरातीत एक रुबाबदार फोटो (स्टाइलिश) होता. तो अतुल हुले साहेबांचा होता ज्यांच्याशी नवोदितांनी संपर्क साधायचा होता. ते कात्रण मी बरेच दिवस जपून ठेवले होते. त्यावेळी माझे महाविद्यालयीन शिक्षण सुरू असल्याने तीर्थरूपांनी नकार दिला.

      कालांतराने ही व्यक्ती मला वेंगुर्ल्यात भेटेल आणि ती वेंगुर्ल्याची असेल असे मला स्वप्नातही वाटले नव्हते. हुले साहेबांबद्दल सांगावयाची आणखी एक आठवण म्हणजे जी मला आप्पा मोरजेनी सांगितली होती. साहेबांच्या प्रगती हुशारीवर जळणाऱ्या काही लोकांनी त्यांची बदली विदर्भात करावयाचे ठरवले. तेव्हा सरांनी, “बदली करायची असेल तर माझ्या विभागात कोकणात करा, मी कोकणासाठी काम करेन.” असे सुनावले आणि कोकणासाठी भरीव काम करणारा अधिकारी वेंगुर्ल्याला मिळाला.

      वेंगुर्ल्यातील एका गुजराती व्यापाऱ्याने त्यांना व मला प्लायवुड खराब घेऊन फसवले होते. ती केस ओरोसला ग्राहक मंचाकडे मधुमेहाने आजारी असताना  त्यांनी पूर्ण स्वखर्चाने चालविली. कोणाही गरजु व्यक्तिची अडचण समजून घेऊन स्वतः जबाबदारी घेऊन ती सोडवणे हा त्यांचा स्वभावच होता.

      मुंबईतील आपल्या ओळखीचा फायदा घेऊन वेंगुर्ल्यातील अनेक प्रश्‍न धसास लावण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ज्यात नारायण तलावाचा पाणी प्रश्‍न असो- सांगलीच्या वालचंद इन्स्टिट्यूटशी संपर्क साधून त्यांच्याकडे शास्त्रोक्त अभ्यासपूर्ण अहवाल मागवला आणि त्याचा पाठपुरावा केला.

      वेंगुर्ला बंदर, सागरी महामार्ग यासाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांचा मुलगा आता ते काम पुढे चालवत आहे. त्यास शुभेच्छा!

      डॉक्टर कोटणीस स्मारक हॉस्पिटल, मंगेश पाडगावकर स्मारक इ. अनेक सार्वजनिक कामांसाठी वेंगुर्ल्यातील सर्व क्षेत्रातील अभ्यासू सुशिक्षित क्रियाशील लोकांना बरोबर घेऊन त्यांनी ‘वेंगुर्ला नागरी कृती समिती’ची स्थापना केली. आणि अनेक कामांना गती दिली. एक कलाकारांचा ग्रुपही स्थापन केला. ते स्वतः एक उत्कृष्ट गायक होते. महाराष्ट्रातील अशी प्रसिद्ध व्यक्ती नाही की जिला त्यांनी स्वतः तयार केलेले शुभेच्छा पत्र पाठवले नाही. वेंगुर्ल्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात चैतन्य निर्माण करण्याचे काम त्यांनी नेहमीच केले. आधारवड असलेल्या वडीलधाऱ्या व्यक्तीला गमावल्यासारखे वाटते. ही हानी कधीही भरून निघणारी नाही. त्यांच्या माझ्यातील एक साम्य म्हणजे जन्म मालवणचा व कार्यक्षेत्र वेंगुर्ला!

      मामांना मुले नाहीत. त्यामुळे मामांची सर्व मालमत्ता त्यांना मिळाली होती. ती त्यांनी भाऊ मालवणचे नगरसेवक अरविंद हुले यांना दिली होती. मालवणच्या समुद्रकिनाऱ्यावर त्यांचा ‘दर्यासारंग’ बंगला दिमाखात उभा आहे. मालवणची आठवण काढली की ते फक्त स्मित करत एवढे ते ‘वेंगुर्लेकर’ झाले होते. त्यांच्याबद्दल सांगण्यासारख्या अनेक आठवणी आहेत, परंतु मर्यादाही आहेत. त्यांच्या प्रथम स्मृतीदिनी त्यांना भावपूर्ण  आदरांजली.

      ता.क.- कीर्तनकार हुले यांच्या पोटी जन्मल्यामुळे समर्थ सृष्टीची निर्मिती करून त्यांनी अध्यात्मिक परंपराही जोपासली. (ख्याल गिरी)

-श्री. शैलेंद्र गाडेकर, कोल्हापूर

Leave a Reply

Close Menu