कृष्ण गोपाळ तथा वासू देशपांडे

अलीकडे माझे वडील कृष्ण गोपाळ तथा वासू देशपांडे यांच्या बद्दल त्यांची नात पूजा देसाई हिने एक छान पोस्ट लिहिली होती. त्यात आजोबा आणि नात यांच्या सुंदर नात्याचा सुरेख आलेख होता. तेव्हा पासून मला पण वाटत होतं आपण पण बाबां बद्दल लिहिले पाहिजे. पण “सांगे वडिलांची कीर्ती तो एक.“ यामुळे लिहायला धजावत नव्हतो. पण शेवटी असं ही वाटलं,  हे मीच सांगितलं पाहिजे.

      बाबा म्हणजे एक comlex व्यक्तिमत्व होतं. म्हणजे त्यांना अनेक विषयांत गती आणि रुची पण होती. पण ते मूलतः राष्ट्र सेवा दलाचे शिस्तबद्ध सैनिक होते. एखाद्या गोष्टीवर अव्यभिचारी निष्ठा म्हणजे काय तर बाबांची सेवादाला वरील निष्ठा. तसेच ते हाडाचे शिक्षक होते. नंदगड, वेंगुर्ला आणि पुणे असा तो प्रवास होता.

      B.Ed. झाल्यावर (जून 1953) आम्ही वेंगुर्ल्याला गेलो. तिथे बाबा कन्याशाळेत नोकरी करू लागले. त्या गावाने आणि शाळेने आम्हाला काय नाही दिलं? अनेक कुटूंबाशी आम्ही कायमचे जोडले गेलो. बाबांनी अनेक विद्यार्थिनींच्या जीवनाला दिशा दिली. योग्य मार्गदर्शन केलं. आजही त्या बाबाचं ऋण मानतात. त्यांच्या एका विद्यार्थिनीचा 80 वा वाढदिवस होता. तिथे मला बाबांची विद्यार्थिनी भेटली. त्या सांगू लागल्या, “सरांनी आम्हाला मराठीची गोडी लावली. मला तर त्यांनी टेबल टेनिस खेळायला शिकवलं. आजही सरांची नेहमी आठवण येते.“ या बाईपण 80 च्या घरातील आहेत. बाबा प्रामुख्याने भाषा विषय शिकवत असत. पण गणिताचीही त्यांना चांगली समज होती. 1967 च्या विधानसभा निवडणुका नंतर आम्हाला वेंगुर्ला सोडावं लागलं.

      त्याच वेळी पुण्याला साने गुरुजी स्मारकावर सेवा दलाच्या विचारांची शाळा सुरु करण्याचा विचार सुरु होता. तिथे बाबांचं नाव पुढे आले. बाबा पुण्यात आले. शाळा सुरु करण्याची तयारी त्यांना करायची होती. न्यू इंग्लिश स्कूल मध्ये एक वर्ष नोकरी केली. त्याच बरोबर मराठी मध्ये पुणे विद्यापीठात M.A. केले. न्यू इंग्लिश स्कूल त्यांना सोडायला तयार नव्हते. त्याचं म्हणणं होतं, आम्ही तुम्हाला फर्ग्युसन कॉलेज मध्ये घेतो. तुम्ही आमच्या कडेच रहा. शेवटी आचार्य भागवत यांनी मध्यस्थी केली आणि बाबांची मुक्तता झाली. या संस्थेने बाबांची योग्य पारख केली असं मला कायम वाटतं.

      रावसाहेब पटवर्धन विद्यालयाचे बाबा संस्थापक मुख्याध्यापक आहेत. पुढे ज्युनिअर कॉलेज सुरु केले. त्याचे पहिले प्राचार्य बाबा होते. ती शाळा बाबांनी खूप कष्टांनी घडवली, मोठी केली. या शाळेत येणारी मुलं प्रामुख्याने स्मारका समोरील झोपडपट्टीमधील आणि आजूबाजूच्या परिसरातील होती. उच्चभ्रू साठीची शाळा नव्हती.

      या शाळेत आपल्या सहकारी शिक्षकांच्या साथीने अनेक उपक्रम सुरु केले. शाळेतील अनेक मुलांच्या घरी रात्री दिवा लागत नसे. बाबांनी या मुलांसाठी रात्री अभ्यासासाठी शाळा उघडी ठेवली. त्याचा मुलांनी पण चांगला उपयोग करून घेतला. पुढे 1972 चा दुष्काळ आला. शाळेत मुलं उपाशी येत. एक दोन मुलांना शाळेत चक्कर आली. बाबांनी मुलांची चौकशी केली. 10/12 मुलं अशी होती. बाबांनी आपल्या सहकाऱ्यांना विनंती केली. आपण आपल्या डब्यातील थोडा वाटा या मुलांना देऊया. आणि मग सर्व शिक्षक या मुलांसाठी घरून डबा आणू लागले. तसेच शाळेतल्या मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीत काम मिळवून दिलं.

      बाबा जसा विद्यार्थ्यांचा विचार करित तसाच विचार आपल्या सहकारी शिक्षकांचा करीत असत. एका सेवादल सर्ववेळ सैनिकाची पत्नी बालवाडीमध्ये शिकवत होती. तिला पदवीधर बनण्यासाठी त्यांनी भाग पाडले. आणि स्वतः सेवानिवृत्त होण्याआधी त्या बाईंना माध्यमिक विभागात आणलं.

      बाबा गेल्यानंतर उषाताई मालकापुरे मला म्हणाली,  “प्रशांत, सरांनी आम्हाला मोठं केलं. आमचा, शिक्षकांचा सर्वांगीण विकास कसा होईल हे पाहिलं. आम्हाला वेगवेगळ्या व्यासपीठावर पाठवलं.”

      असे हे माझे बाबा उत्कृष्ट शिक्षक होते जगासाठी. पण आमचा मात्र गुरु शिष्याचा सूर कधी जुळला नाही. अकरावीच्या पूर्व परीक्षेत मी दोन विषयात काठावर होतो. त्यानंतर त्यांनी माझ्याकडे लक्ष दिलं. असो. पण मी त्यांचा युवराज होतो.

बाबा : एक बहू आयामी व्यक्तिमत्व

      वेंगुर्ल्याला आल्यावर बाबांचं शाळेसोबत सेवादल आणि समाजवादी पक्ष यांचं काम सुरु झालं. याचबरोबर हिंदी प्रचार सभेच्या कामात त्यांचा सहभाग होता. अनेक वर्ष प्रचार सभेचे ते कार्यवाह होते. हिंदीमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जायच्या. हिंदीचा प्रसार व्हावा म्हणून हिंदीच्या परीक्षा सुरु केल्या. हिंदी प्रचार सभा, पुण्याच्या महाराष्ट्र राष्ट्र भाषा सभेच्या परीक्षा घेत असे.

      बाबा वेंगुर्ला नगर पालिकेचे सभासद म्हणून निवडून आले होते. लोकांचं छोटी छोटी कामं अगत्याने करण्यावर त्यांचा भर असे. त्यामुळे त्यांचा शाळेनंतरचा वेळ या उद्योगात जात असे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, म्हणजे बाबा नगर पालिकेच्या वतीने जिल्हा लोकल बोर्डाचे सदस्य बनले. खरं म्हणजे हा एक बहुमान मानला जात असे. त्यावेळी रत्नागिरी जिल्ह्यात प्रजा समाजवादी पक्षाचे चांगले कामं होते. तेंव्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष स. रा. शिखरे (दादा शिखरे) होते. अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्व. त्यांचं घरी येणं, राहणं ही आनंदाची पर्वणी असे. माझ्यासाठी दादा हे कधीही न विसरता येण्याजोगे व्यक्तिमत्व आहे. त्यांचा संत वाङ्मयाचा अभ्यास, इंग्लिशवरील प्रभुत्व हे वाखाणण्याजोगे होते. त्यांची एक सवय होती, झोपेत ते अस्खलित बोलत. सकाळी उठल्यावर माझ्या आईला विचारत, “लीला काल रात्री कोणतं भाषण ऐकलंस?” असे हे दादा, आम्ही पुण्याला आल्यावर आमच्याकडे आले होते. विशेष म्हणजे मी आणि दादा, देहू आळंदीला गेलो होतो. माझ्या आयुष्यातील तो एक सर्वोत्तम आणि अविस्मरणीय असा दिवस होता. दादा सिगारेट ओढत असत. त्यांचा ब्रँड होता Bristol. ते म्हणत, माझ्या जीवनाला Bristol चा सुगंध आहे. आणि त्याच Bristol ने त्यांचा बळी घेतला. त्यांना घशाचा कॅन्सर झाला. टाटा मधली त्यांची भेट ही शेवटची भेट ठरली.

      महाराष्ट्र टाइम्स सुरु झाल्यावर बाबा त्यांचे दक्षिण रत्नागिरी चे वार्ताहर होते. तसेच त्यांनी समाचार भारती साठी पण बातमीदार म्हूणन कामं केलं. रत्नागिरी जिल्ह्यातील समानता, नवकोकण आणि जयानंद मठकर यांच्या वैनतेय साठी ते लेखन करीत. खरं म्हणजे पत्रकारिता त्यांच्या रक्तातच होती. त्यांचे वडील (माझे आजोबा) गोपाळ आप्पाराव देशपांडे हे पण पत्रकार होते.

      नाथमामांच्या निधनानंतर साधना साप्ताहिकाने नाथ पै विशेषांक काढायचे ठरवलं. साधनाचे तत्कालीन संपादक यदुनाथ थत्ते यांनी या अंकाची जबाबदारी बाबांच्यावर सोपवली. बाबांनी हा अंक जीव ओतून तयार केला. वेगवेगळ्या लोकांचे लेख मिळवण्यासाठी भरपूर कष्ट घेतले आणि एक सर्वांग सुंदर अंक तयार झाला. चित्रकार ओके यांनी काढलेले मुखपृष्ठावरील नाथमामांचे चित्रही अप्रतिम होते. या अंकात नानासाहेब गोरे, एस.एम. जोशी, मंगेश पाडगांवकर अशा अनेकांचे लेख होते. माझा पण त्यांच्या आठवणी सांगणारा छोटासा लेख त्या अंकात होता. हा अंक खूप गाजला. त्याची पुन्हा आवृत्ती काढावी लागली होती.

      पुण्यात आल्यावर शाळा साने गुरुजी स्मारकावरच होती. त्यामुळे सेवादलाच्या कामात बाबा लक्ष घालू लागले. थोड्याच दिवसात बाबांकडे राष्ट्र सेवा दल पत्रिकेचे संपादन आले. सेवा दल पत्रिकेला एक वेगळं रूप देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. बाबांनी दल पत्रिकेचा “समाजवादी शिक्षण विशेषांक“ काढण्याचे ठरवले. खरं म्हणजे मुळात हा विषय वेगळा आणि नवीन होता. बाबांनी खूप  प्रयत्न करून नामवंतांचे लेख मिळवले. त्यामध्ये जे. पी. नाईक, चित्राताई नाईक, ग. वि. अकोलकर अशा त्यावेळच्या शिक्षण तज्ज्ञांचे लेख या अंकासाठी मिळवले. पण त्या अंकाचा बीज लेख बाबांचा होता. शिक्षण क्षेत्रात या अंकावर बरीच चर्चा झाली. मला नेहमी असं वाटतं समाजवादी शिक्षण विशेषांक बाबांच्या जीवनातला एक ‘मानबिंदू’ होता. आज अनेक मंडळींना या अंकाची माहिती पण नसेल.

      साधनाचा नाथ पै विशेषांक आणि सेवा दल पत्रिकेचा समाजवादी शिक्षण विशेषांक हे बाबांच्या संपादक कौशल्याची ओळख देण्यासाठी पुरेसे आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही अंकाची दखल महाराष्ट्र टाइम्स या दैनिकाने आपल्या ‘धावते जग’ या सदरातून घेतली होती. दोन्ही वेळी बाबांचा संपादक म्हणून गौरव ही केला.

      नाथ पै विशेषांक नंतर नाथ मामांचे चरित्र लिहिण्याची जबाबदारी बाबांकडे आली. यदुनाथजींचा तसा आग्रहच होता. ही जबाबदारी स्वीकारताना बाबा स्वतः थोडे साशंक होते. त्यांना वाटत होतं, चरित्र लिहिताना चरित्र नायकाविषयी लागणारी तटस्थता नाथच्या बाबतीत मला जमणार नाही. पण यदुनाथजीं नी सांगितलं, आम्हाला, तुला दिसलेला नाथ वाचायचा आहे. बाबांनी अपार कष्ट घेतले. अनेकांच्या भेटी घेतल्या. नाथ मामांच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कामाचा अभ्यास केला. पुस्तकाच्या आकृतीबंधाबद्दल ग. प्र. प्रधान आणि यदुनाथजीं बरोबर अनेकदा चर्चा केल्या. पुस्तकाला प्रस्तावना प्रसिद्ध समीक्षक आणि लेखक प्रभाकर पाध्ये यांनी लिहिली. त्यांनी पण पुस्तक वाचून अनेक सूचना केल्या.

      या जीवन चरित्राचे नाव ‘लोकशाहीचा कैवारी’ असे ठरले. नाथ मामांच्या एकूण जीवनाचे आणि कर्तृत्वाचं यथार्थ वर्णन त्यातून होतं. पाध्येनी प्रस्तावनेमध्ये म्हटले आहे. “श्री. वासू देशपांडे यांनी हे चरित्र लिहून वाचकांवर फार मोठे उपकार केले आहेत. नाथ बद्दलचा जिव्हाळा आणि अभिमान हे या पुस्तकाचे स्थायीभाव आहेत, त्यामुळे काही ठिकाणी  चरित्र एकसुरी झाल्यासारखं वाटतं. हे चरित्र नाथची लाघवी मूर्ती जिवंत करते आणि वाचकांसमोर तिच्या अनेक विभ्रमांसह उभी करते, हे त्यांचं (लेखकाचे) वैशिष्ट्य आहे. यातच या चरित्राचे यश आहे.“ प्रस्तावनेच्या शेवटी पाध्ये म्हणतात, “या पुस्तकाचा मी व्यक्तिशः कृतज्ञ आहे. ज्या नाथला मी माझा नाथ असं म्हणू शकत असे, त्या नाथला या पुस्तकानं समृद्ध करून माझ्यापुढं उभं केलं.“ मला वाटतं यदुनाथजींनी ही जबाबदारी बाबांच्या वर टाकून दाखवलेला विश्‍वास इथेच सार्थ ठरला आहे.

      या चरित्राचे स्वागत चांगले झाले. बाबांना या चरित्र ग्रंथासाठी महाराष्ट्र सरकारचा ‘उत्कृष्ट चरित्राचा’ पुरस्कारही मिळाला. या पुस्तकावर अनेक ठिकाणी परीक्षण आली. त्यातील एक प्रतिक्रिया  प्रा देवदत्त दाभोलकर यांची. समाज प्रबोधन पत्रिकेमध्ये त्यांनी लिहिले होतं, “जर पेंद्याने श्रीकृष्णाचे चरित्र लिहिले असते, तर ते असे झाले असते. “

      लोकशाहीचा कैवारी या पुस्तका बरोबरच नाथमामांच्या सार्वजनिक सभांतील निवडक भाषणांचा संग्रह साधना प्रकाशनने प्रकाशित केला. या पुस्तकाचे संपादन बाबांनी केलं होतं. हे पण एक फार मोठं कामं होतं. या पुस्तकाला नानासाहेब गोरे यांची प्रस्तावना होती. साधना प्रकाशन ने 17 जानेवारी 2019 ला या पुस्तकांची नवीन आवृत्या प्रकाशित केल्या आहेत

– प्रशांत देशपांडे, 9820588373

(क्रमशः)

Leave a Reply

Close Menu