आरोग्याची लोकचळवळ – ‘माझा वेंगुर्ला’च्या प्रयत्नातून वेंगुर्ला कोविड सेंटरमध्ये डॉ. बार्सेकर नियुक्त

संपूर्ण महाराष्ट्र कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेतून हळुहळू बाहेर येत आहे. तरी डेल्टा व्हेरियंटने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा आजही कोरोनाच्या विळख्यातून पूर्णपणे बाहेर पडलेला नाही. इथल्या मृत्यूदरानेही उच्चांक गाठला. शासनाने पायाभूत सुविधांसाठी किमान प्रयत्न केले. परंतु तातडीच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्‍यक डॉक्टरांची उपलब्धता करण्यात आजपर्यंत मर्यादा आल्या आहेत. हे नेमकेपणाने हेरुन वेंगुर्ला तालुक्यातील समविचारी व्यक्तींनी एकत्र येत ‘माझा वेंगुर्ला‘ या संस्थेमार्फत ‘सक्षम वेंगुर्ला‘ हे आरोग्य अभियान उचलून धरले. शासन, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांनी महाराष्ट्रात एक पथदर्शी आरोग्य अभियान राबविले आहे.

      परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ‘माझा वेंगुर्ला‘ या सामाजिक संस्थेने वेंगुर्ला मेडिकल असोसिएशनच्या मदतीने  गेल्या 2 महिन्यात दूरध्वनीद्वारे 1368 होम आयसोलेशन रुग्णांना समुपदेशन तर 78 रुग्णांना डॉक्टरी सेवेचा घरबसल्या लाभ मिळवून दिला आहे. त्याचबरोबर स्वनिधीतून व लोकसहभागातून गंभीर रुग्णाला हॉस्पिटलमध्ये पोहचेपर्यंत लागणारी तातडीच्या ऑक्सिजनची गरज हेरुन ‘ऑक्सिजन बँक‘ सुरु करुन मोठा दिलासा दिला आहे. (याविषयी अधिक महितीसाठी संपर्क – प्रशांत आपटे 02366-262456, 9422379595, राजन गावडे-9423301310)

      वेंगुर्ल्यात गंभीर कोविड रुग्णांवर उपचार व्हावेत यासाठी आमदार दीपक केसरकर यांनी पुढाकार घेतला. आमदार केसरकर यांनी वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालय इमारतीमध्ये 20 बेड व अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. भौतिक सुविधा निर्माण झाल्या असल्या तरी शासनाच्या मर्यादित मानधनात मोठ्या शहरातून अनुभवी डॉक्टर ग्रामीण भागात काम करण्यासाठी इच्छुक नसतात. तसेच अतिगंभीर रुग्णांवर उपचार करणाऱ्या क्लिष्ट साधनांना हातळणारे तज्ज्ञ नसतील तर सर्व सुविधा असूनही मोठमोठी कोविड सेंटर रुग्णांना आधार देऊ शकणार नाहीत. ही समस्या लक्षात घेऊन ‘माझा वेंगुर्ला‘ या संस्थेने वेंगुर्ल्यात उपजिल्हा रुग्णालयानजिक होणाऱ्या कोविड सेंटरमध्ये डॉक्टर उपलब्ध होण्यासाठी सोशल मिडिया आणि वृत्तपत्राद्वारे आवाहन केले होते. शासनाच्या मर्यादा ओलांडून योग्य मानधन व आवश्‍यक सुविधा तसेच सहाय्यक कर्मचारी उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या खर्चाची जबाबदारी ‘माझा वेंगुर्ला‘ या संस्थेने उचलली. याला वेंगुर्ल्याचे सुपुत्र व मुंबई येथील बांधकाम व्यावसायिक अविनाश चमणकर यांनी प्रतिसाद दिला व वेंगुर्ल्याचे सुपुत्र असलेल्या व मुंबई येथे 100 बेडचे कोरोना सेंटर चालविणाऱ्या डॉ. अमित आजगांवकर यांचे नाव सुचविले. त्यांनीही टेलिमेडिसीन व व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्याची तयारी दर्शविली. तर दोन तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्तीही केली. तसेच 5 जुलै रोजी वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट देत पहाणी करीत येथील डॉक्टर, नर्स यांना मार्गदर्शनही केले.

      यामध्ये वेंगुर्ल्यातील उपजिल्हा रुग्णालयाचा एक भाग कोविड सेंटर म्हणून कार्यरत करताना अन्य भागातही गंभीर रुग्ण हाताळताना येणाऱ्या मर्यादांचा आढावा घेतला व येणाऱ्या रुग्णाला दिलासादायक सुविधा मिळण्यासाठी येथील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याच्या दृष्टीने दिशा दिली.

      यावेळी मार्गदर्शक डॉ. अमित आजगांवकर, नुतन डॉक्टर डॉ. क्रांती बार्सेकर, डॉ. देसाई यांच्यासह वेंगुर्ला तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्‍विनी माईणकर व ज्येष्ठ परिचारिका मांजरेकर यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप, डॉ.अतुल मुळे, डॉ.राजेश्‍वर उबाळे, डॉ.डवले, डॉ.आझाद, डॉ.प्रसाद साळगांवकर, ‘माझा वेंगुर्ला‘चे निलेश चेंदवणकर, राजन गावडे, मोहन होडावडेकर, विवेक खानोलकर, अमोल खानोलकर, ॲड.सूर्यकांत खानोलकर, कपिल पोकळे, सचिन वालावलकर, संजय पुनाळेकर, खेमराज कुबल, अमृत काणेकर, गणेश नार्वेकर, वसंत तांडेल, नगरसेवक प्रशांत आपटे, शिवसेना शहरप्रमुख अजित राऊळ, ल्युपिन फाऊंडेशनचे योगेश प्रभू आदी उपस्थित होते.

      डेरवण-चिपळूण येथील वालावलकर रुग्णालयात व गेली दीड वर्षे कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या डॉ. क्रांती बार्सेकर या वेंगुर्ला कोविड सेंटरमध्ये रुग्णसेवा देणार आहेत. या शिवाय लिलावती हॉस्पिटल, वाडीया येथील लहान मुलांच्या आजारावरील शल्य विशारद राजीव रेडकर, मुंबई येथील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.महेश धारगळकर तसेच बेळगाव, गोव्यासारख्या मोठमोठ्या रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांनी टेलीमेडिसीन व्दारे  उपचार करण्याची तर वेंगुर्ल्यातील डॉक्टरांनी आवश्‍यक भासल्यास कोविड सेंटरला सेवा देण्याची तयारी दर्शविली आहे.

      संस्थेच्या खालील बँक खात्यात निधी गोळा करून आपला आर्थिक सहयोग द्यावा ही नम्र विनंती.

बँक खात्याचा तपशील.

MAZA VENGURLA Saraswat Bank branch VENGURLA

A/c 039100100002615 IFSC : SRCB0000039

अधिक माहितीसाठी संपर्क-मोहन होडावडेकर- 9423884516,

कपिल पोकळे- 7276887772

प्रतिक्रिया – अतिगंभीर रुग्णाला ओरोस किंवा बाहेर फिरावे न लागता वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयांतर्गत सुरू असणाऱ्या DCCH (Dedicated Covid Care Center) मध्ये औषधोपचार घेऊन तो बरा व्हावा; यासाठी सर्व यंत्रणा सक्षम करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग, माझा वेंगुर्ला, वेंगुर्ला मेडिकल असोसिएशन समन्वयाने पावले टाकत आहेत.

– मोहन होडावडेकर, समन्वयक-सक्षम वेंगुर्ला अभियान

      वेंगुर्ल्यात सुरू होणाऱ्या कोविड सेंटरमध्ये सध्या 20 बेडची उपलब्धता असून नगरपरिषदेमार्फत उपलब्ध झालेले जम्बो 14 ऑक्सिजन सिलेंडर तसेच अत्यावश्‍यक इंजेक्शन यांचा साठा आहे. कोरोनाबाधित व्यक्तीला लागणाऱ्या इमर्जन्सी सुविधा वेंगुर्ला वासीयांच्या लोकसहभागातून उभ्या राहिल्या, ही विशेष बाब आहे

– डॉ. क्रांती बार्सेकर

Leave a Reply

Close Menu