संत साहित्यातील सकारात्मकता

संत पळपुटे होते, टाळकुटे होते. त्यांनी समाजाला निष्क्रिय बनवले असा आरोप संतांवर आणि संत साहित्यावर काहीजण वारंवार करत असतात. संत विचाराचे मर्म जाणून न घेता, त्यावर चिंतन मनन न करता संतांच्या वचनांचा विपरीत अर्थ लावला जातो. म्हणूनच संत साहित्य नकारात्मक आहे की सकारात्मक, याचे थोडे चिंतन करुया.

    बहिष्कृत भारत हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ३ एप्रिल, इ.स. १९२७ रोजी सुरु केलेले एक पाक्षिकहोते. डॉ. आंबेडकर स्वतः या पाक्षिकाचे संपादक होते. दुस-या अंकापासून बहिष्कृत भारतावर बिरुदावली म्हणून ज्ञानेश्वरांच्या पुढील ओव्या उद्धृत केलेल्या असत.

आतां कोदंड घेऊनि हाती । आरूढ पां इयें रथीं।

देई आलिंगन वीरवृत्ती । समाधानें ।। १८९ ।।

जगी कीर्ति रूढवी । स्वधर्माचा मानु वाढवी ।

इया भारापासोनि सोडवी । मेदिनी हे ।। १९०।।

आतां पार्था निःशंकु होई । या संग्रामा चित्त देई।

एथ हें वांचूनि कांहीं । बोलो नये ।। ज्ञा. ३/१९१ ।।

    घे ते कोदंड हातात. चढ ह्या रथावर आणि समाधानाने वीरवृत्तीला अलिंगन दे, जगामध्ये कीर्ति वाढव. स्वधर्माचरणाचा कित्ता घालून दे आणि ह्या दुष्टांच्या भाराखाली दडपून गेलेली ही पृथ्वी सोडव. पार्था, आता मनात काहीही शंका ठेवू नको. केवळ ह्या संग्रामावरच लक्ष केंद्रित कर.

    आता केवळ संग्राम, संग्रामाशिवाय दुसरे काहीही नाही! डॉ.बाबासाहेब आंबेडकर अशी युद्धप्रेरणा अस्पृश्यांत चेतवीत होते. आपल्या बांधवांना संग्रामाची प्रेरणा देण्यासाठी डॉ. आंबेडकरही ज्ञानोबा माऊलींच्या या ओव्यांचा प्रेरक म्हणून उपयोग करतात, हे स्पष्ट आहे. मुळात श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतारुपी उपदेश केला तो कुठल्या गिरीकपारी, एकांतात नाही तर प्रत्यक्ष रणभूमीवर! अर्जुनाने संग्राम सोडून पळून जाऊ नये म्हणून श्रीकृष्णाने हा उपदेश केला. हा ग्रंथ जीवन संग्रामाला सामोरे जाण्याचा संदेश देणारा आहे. अशा या गीतेवर ज्ञानेश्वर माऊलींनी केलेले भाष्य म्हणजे ज्ञानेश्वरी. माऊलींचा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ वारकरी सांप्रदायाने धर्मग्रंथ म्हणून स्विकारला आहे. वारकरी संत साहित्याचा तो प्रेरणा स्त्रोत आहे. हा ग्रंथ जीवन संग्रामाला कशी प्रेरणा देतो हे ज्ञानेश्वरीतील वर नमुद ओव्यांवरुन स्पष्ट दिसते. मग संत साहित्य पळपुटे, नकारात्मक कसे?

    संतांचे जीवन व संत साहित्य वेगळे करता येत नाही. आचार व विचार यांच्यातील विसंगती संतांना मान्य नाही. जो विचार पटला तो आचरणात आणला व मगच इतरांना सांगितला हा संतांचा बाणा आहे. आता प्रश्न निर्माण होतात ते असे – मुळात सकारात्मकता म्हणजे काय? संतांनी त्याचा अर्थ काय लावला आहे? तो आपल्या जीवनात कसा उतरवला आहे?

    जीवनात सुखदायक व दुःखदायक वाटणा-या घटना, परिस्थिती प्रत्येकाच्या वाट्याला येत असते. जीवनात सुख दुःख एकामागोमाग येत असतात. कोणतीही निराशाजनक, कितीही दुःखद परिस्थिती वाटली तरी ती कायम राहत नाही. प्रत्येक अंधारलेल्या रात्रीनंतर पहाट उगवतच असते. म्हणून धीराने, हिम्मतीने परिस्थितीला सकारात्मकपणे सामोरे जा, असे तुकोबा सांगतात. केवळ शोक केल्याने, रडत राहिल्याने काय होते? तुकोबा म्हणतात -शोकें शोक वाढे । हिमतीचे धीर गाढे ।। जो विपत्तीत धीर धरतो तोच अखेर विजयी होतो, यशस्वी होतो. तुकोबा विचारतात – तुका म्हणे धीरा । विण कैसा होतो हिरा?

ज्ञानोबा, तुकोबांच्या जीवनात दुःखाचे प्रसंग काही कमी आले काय? पण ते त्यांना ज्या धीराने सामोरे गेले त्यामुळेच ते आज आपल्याला प्रेरक वाटतात.

    राजर्षी शाहू महाराजांचे अत्यंत विश्वासू सहकारी वासुदेव तोफखाने यांनी सांगितलेल्या शाहूंच्या अंतरंगात या आठवणींच्या संग्रहातील ही एक आठवण पहा –

    अवघा महाराष्ट्र ढवळून काढणारा वेदोक्ताचा प्रसंग ज्यावेळी घडला, त्यावेळी राजर्षी शाहूंच्या सोबत राजारामशास्त्री भागवत होते. त्यांनीच महाराजांना पूजा वेदोक्त मंत्राने नसून पुराणोक्त मंत्राने होत असल्याची माहिती दिली होती. त्यावेळी महाराज राजारामशास्त्रींना म्हणाले होते,

बरे देवा कुणबी केलो। नाहीतरी दंभे असतो मेलो ।।

विद्या असती । तरी पडतो अपायी ।।

                      तुका म्हणे थोरपणे। नरक होती अभिमाने ।।                 

      संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांना जेथे अनेक प्रकारे अपरंपार विटंबना व आपत्ती सोसाव्या लागल्या, तेथे आपल्यारख्या अज्ञ जनांची मातब्बरी काय?‘‘ वाईटातील वाईट प्रसंगालाही सामोरे कसे जावे? तुकोबा काय म्हणतात पहा –

 मढे झाकुनिया करिती पेरणी । कुणबियाची वाणी लवलाहे।।

    शेतकरी, कुणबी हे आपल्या घरी कोणी वारले असेल मरण पावले असेल तर ते प्रेत झाकुन ठेवुन अगोदर पेरणी करतात कारण पेरणी महत्त्वाची आहे आणि हीच खरी शेतक-यांची, कुणब्यांची वाणी आहे, खरा धर्म आहे. गाडगेबाबांचा गोविंदा नावाचा मुलगा कुत्रा चावून मेला. बातमी आली तेव्हा बाबा कीर्तन करीत होते. ते म्हणाले, ‘ऐसे गेले कोट्यानुकोटी, काय रडू मी एकासाठी!

    जन्म, मरण हे कुणाच्या हातात आहे? या जगात जन्माला येतो त्याला केव्हा ना केव्हा मरण येणार हे आपण नित्य पाहतो. तरीही आपण काय करतो? यावर ज्ञानेश्वर माऊली वर्णन केलेल्या पदांचा अर्थ असा सांगता येईल – अरे, मरण हा शब्दसुद्धा त्यांना सहन होत नाही. पण असलेले आयुष्य फुकट चालले आहे हे त्यांना समजत नाही. ते संपले की मग मात्र रडत बसतात. बेडकास एकीकडे साप गिळत असतो, तर बेडूक माशी पकडण्यासाठी जीभ वेटाळत असतो. तसे एकीकडून मरण त्यांना असते पण ते मात्र आपली विषयतृष्णा वाढवीतच असतात. काय हा अनर्थ आहे रे! कसे ह्या लोकांना समजावून सांगावे? ह्यांना ह्या गर्तेतून कोण सोडवील बरे? हाय, हाय, अर्जुना, अरे हे किती उफराटे जगणे आहे ह्या लोकांचे? आणि तू अकस्मात इथे कसा रे जन्माला आलास?

    आपण दुस-याचा मृत्यू पाहून शोक करतो, पण आपल्या या शरिरालाही केव्हातरी मृत्यू येणार आहे हे विसरतो. उलट शोक करत न बसता आपण जीवंत असताना सत्कर्मे करत राहणे आणि आयुष्य सत्कारणी लावणे हेच योग्य नाही काय?

    दुस-या बाजूने विचार करता या जगात कोणतीच गोष्ट पूर्णतः नष्ट होत नाही. हे विश्व नित्यनूतन आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात-घडाळ्याचे काटे जसे चक्राकार फिरतात त्याप्रमाणे जे जन्माला येतं ते मृत्यू पावतं आणि मृत्यू पावतं ते पुन्हा जन्माला येतं. मग मृत्यूचा शोक कशासाठी?

    जीवन संग्रामाला न डगमगता, उदासीन न होता सामोरे कसे जावे हे सांगणारे सकारात्मक विचारांचे असे अनेक मोती संत साहित्यात विखुरले आहेत. म्हणूनच संत साहित्य आजही प्ररक आहे.             

    ता.क.- लेख लिहून लेखणी खाली ठेवली आणि एक प्रश्न सहज मनात आला – कुणी वाचक विचारतोय, आपण तर सारी संत महात्म्यांची, थोरा मोठ्यांची उदाहरणे दिलीत. संत साहित्य वाचून, ऐकून मोठ्या दुःखाला सहजपणे सामोरे जाण्याची सकारात्मकता सामान्य माणसातही येते का? आपला काय अनुभव?

    हो येते! कशी ते पहा – लता गेली कित्येक वर्षे आमच्या दिंडीत येते. पायी वारी करते. काही वर्षापूर्वीचा हा प्रसंग. दिंडीच्या वाटचालीचा बहुधा दुसरा दिवस होता. कोणीतरी निरोप घेऊन आला, लताची आई गेली. माझ्या समोरच लता बसली होती. निरोप ऐकताच तिच्या डोळ्यात चटकन पाणी आले. मी तिला विचारले, ‘‘लता, तुला आता गावी परतायचे असेल ना? गाडीची व्यवस्था करतो.‘‘ डोळे पुसत, स्वतःला सावरत ती चटकन मला म्हणाली, ‘‘नको अण्णा! आई जीवंत असताना तिची सर्व सेवा केली. गेले काही महिने अंथरुणातच होती. आई तर गेली, आता ज्ञानेश्वर माऊलींच्या सावलीतच आयुष्याची वाटचाल करायची. आता मागे फिरणे नाही. वारीची वाटचाल आनंदात भजन करत पूर्ण करायची.‘‘ मला तुकोबांचे शब्द आठवले –

भुके नाही अन्न । मेल्यावरी पिंडदान ।।

हे तो चाळवाचाळवी । केले आपणची जेवी ।।

    व्यक्ती जीवंत असताना तिची हेळसांड करायची, मृत्यू नंतर मात्र खोटी रडारड करायची, श्राद्ध पिंडदानाचा सोहळा करायचा याला काय अर्थ? व्यक्ती जीवंत असताना तिची सर्व सेवा करावी, काळजी घ्यावी, औषधोपचार करावे. पण तरीही मृत्यू केव्हा येईल कुणाच्या हातात नाही. तो आलाच तर त्याचा शांतपणे स्वीकार करावा.  

देवदत्त दिगंबर परुळेकर, वेंगुर्ला मोबा. ९४२२०५५२३१

(सौजन्य – ‘थिंक पॉसिटीव्ह‘)     

Leave a Reply

Close Menu